मुंबई : कॅनडास्थित फेअरफॅक्स समूहाची गुंतवणूक असलेल्या डिजिटल विम्याच्या क्षेत्रातील ‘गो डिजिट जनरल इन्शुरन्स लिमिटेड’चा समभाग गुरुवारी भांडवली बाजारात १२.५ टक्के अधिमूल्यासह सूचिबद्ध झाला. क्रिकेटपटू विराट कोहली आणि त्यांची पत्नी बॉलीवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा हे ‘गो डिजिट’चे गुंतवणूकदार असून त्यांनी फेब्रुवारी २०२० मध्ये कंपनीत गुंतवलेले २.५ कोटी रुपयांचे मूल्य यामुळे आता १० कोटी रुपयांवर गेले आहे.

शेअर बाजारात ‘गो डिजिट’च्या समभागाने ३०० रुपये प्रति समभागाचा टप्पा ओलांडल्यानंतर या दाम्पत्याकडील समभागांचे मूल्य सुमारे १० कोटी रुपयांवर पोहोचले आहे. हा समभाग गुरुवारी भांडवली बाजार बंद झाला तेव्हा ३०६.०० रुपयांवर स्थिरावला. आयपीओपश्चात यशस्वी बोली लावलेल्या गुंतवणूकदारांना प्रत्येकी २७२ रुपये किमतीला वितरित करण्यात आला आहे. त्या तुलनेत गुरुवारचा पहिल्या दिवसाचा बंद १२.५ टक्के वाढ दर्शवणारा आहे.

हेही वाचा : महागाई दर मापनाच्या आधारभूत वर्षात बदलाचा केंद्राकडून घाट

क्रिकेटपटू विराटने प्रत्येकी ७५ रुपये याप्रमाणे कंपनीचे २.६६ लाख समभाग, तर अनुष्काने सुमारे ६६ हजार समभाग खरेदी केले होते. कंपनीने प्रत्यक्षात ‘आयपीओ’साठी समभागांसाठी प्रत्येकी २५८ ते २७२ रुपये किमतपट्टा निर्धारित केला होता. आयपीओपश्चात दोघेही त्यांच्याकडील समभागांची विक्री करणार नसले तरी त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य जवळपास चार वर्षांत २६३ टक्क्यांनी वधारले आहे.

हेही वाचा : खासगी क्षेत्रात वाढती सक्रियता! संयुक्त पीएमआय मे महिन्यात ६१.७ गुणांच्या उच्चांकी पातळीवर

‘गो डिजिट जनरल इन्शुरन्स लिमिटेड’ची प्रारंभिक समभाग विक्री १५ मे ते १७ मे या दरम्यान पार पडली असून, या माध्यमातून कंपनीने २,६१५ कोटी रुपये उभारले आहेत. ‘गो डिजिट’ वाहन, आरोग्य, प्रवास, मालमत्ता, सागरी, दायित्व यासंबंधित विमा सेवा पुरविते. मुख्यतः ऑनलाइन माध्यमातून विमा विक्री करणारी ही आघाडीची कंपनी आहे.