पीटीआय, नवी दिल्ली

देशातील सेवा क्षेत्राने सरलेल्या जानेवारीमध्ये मागील सहा महिन्यांतील उच्चांकी पातळी गाठणारी कामगिरी केली. सोमवारी प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार, देशांतर्गत आणि परदेशातून आलेल्या कामाचा ओघामुळे सेवा क्षेत्राची सक्रियता वेगाने विस्तारल्याचे मासिक सर्वेक्षणातून समोर आले आहे.

भारतातील सेवा व्यवसायातील खरेदी व्यवस्थापकांचा कल दर्शविणाऱ्या ‘एचएसबीसी इंडिया सर्व्हिसेस पीएमआय’ निर्देशांक जानेवारी महिन्यात ६१.८ गुणांवर नोंदला गेला. या निर्देशांकाने नोंदवलेली ही सहा महिन्यांतील उच्चांकी कामगिरी आहे. गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात हा निर्देशांक ५९ गुणांवर होता. पीएमआय निर्देशांक ५० गुणांच्या वर राहिल्यास अर्थव्यवहारातील विस्तार दर्शविला जातो, तर ५०च्या खाली गुणांक आकुंचनाचे निदर्शक मानले जाते. सेवा क्षेत्रातील सुमारे ४०० कंपन्यांकडून प्रश्नावली भरून घेऊन हे मासिक सर्वेक्षण करण्यात आले आहे.

हेही वाचा >>>Gold-Silver Price on 5 February 2024: सोन्याच्या किमतीत मोठा बदल, मुंबई-पुण्यातील २४ कॅरेटचा भाव लगेचच जाणून घ्या

जानेवारी महिन्यात नवीन व्यवसायांचा वेगाने झालेला विस्तार आणि भविष्यात सक्रियता अधिक वाढण्याचा अंदाज यामुळे सेवा क्षेत्राचा पीएमआय निर्देशांक लक्षणीय उंचावला आहे. नवीन निर्यात व्यवसायात वाढ होत असल्याने देशाची सेवा निर्यात वाढती राहणार आहे. मागील तीन महिन्यांत नवीन निर्यातीत सर्वांत वेगाने वाढ झाली आहे. अफगाणिस्तान, ऑस्ट्रेलिया, चीन, युरोप, संयुक्त अरब अमिराती आणि अमेरिका या देशांमधून प्रामुख्याने ग्राहक वाढले आहेत, अशी माहिती एचएसबीसीच्या अर्थतज्ज्ञ इनेस लॅम यांनी दिली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

किमतवाढीचा वाढता ताण…

सेवा क्षेत्रातील कंपन्यांच्या खर्चात २०२४ च्या सुरूवातीपासून वाढ झाली आहे. खाद्यवस्तू, कामगार आणि मालवाहतूक यांच्या वाढत्या खर्चामुळे प्रामुख्याने किमतीचा दबाव आला आहे. असे असले तरी सर्वेक्षणात सहभागी बहुसंख्य कंपन्यांनी त्यांच्या शुल्कात कोणतीही वाढ केलेली नाही. केवळ ६ टक्के कंपन्यांनी शुल्कात वाढ केली आहे.