मुंबई : सरलेल्या आर्थिक वर्षात भांडवली बाजारातील पोषक वातावरणाचा फायदा घेत, ७६ कंपन्यांनी प्रारंभिक समभाग विक्रीच्या (आयपीओ) माध्यमातून ६२,००० कोटींची निधी उभारणी केली. मुख्य बाजार मंचावर ‘आयपीओ’च्या माध्यमातून करण्यात आलेली निधी उभारणी ही मागील आर्थिक वर्षाच्या तुलनेत १९ टक्क्यांनी अधिक राहिली आहे.

सुरू झालेल्या नवीन आर्थिक वर्षात देखील गुंतवणूकदारांकडून प्राथमिक बाजारात उत्साह कायम राहण्याची अपेक्षा आहे. देशांतर्गत आघाडीवर सुधारलेली अर्थस्थिती, भांडवल वाढ, उद्योजकांमधील वाढलेला उत्साह, अनुकूल सरकारी धोरणांमुळे वाढलेली थेट परदेशी गुंतवणूक (एफडीआय) या घटकांच्या संगमाने बाजारातील एकंदर आशावाद वाढला आहे, असे पँटोमथ फायनान्शियल सर्व्हिसेस समूहाने अहवालात म्हटले आहे.

हेही वाचा… गुंतवणूकदारांच्या वाढत्या आस्थेमुळे भांडवली बाजाराला उच्च मूल्यांकन – सेबी

आर्थिक वर्ष २०२४-२५ या वर्षात आता प्रारंभिक समभाग विक्रीतून १ लाख कोटींहून अधिक निधी उभारला जाण्याची आशा आहे. जागतिक पातळीवरील प्रतिकूल धक्क्यांचा भारतीय बाजारपेठेवर कोणताही आघात न झाल्यास १ लाख कोटींची निधी उभारणी शक्य आहे, असे पँटोमथ कॅपिटल ॲडव्हायझर्सचे व्यवस्थापकीय संचालक महावीर लुनावत यांनी सांगितले.

अहवालानुसार, वर्ष २०२३-२४ मध्ये एकूण ७६ कंपन्यांनी मुख्य मंचावर सुमारे ६२,००० कोटी रुपये उभारले, त्याआधीच्या आर्थिक वर्षात ३७ कंपन्यांनी ५२,११५ कोटी रुपयांपेक्षा अधिक निधी उभारणी केली होती. विशेष म्हणजे, अनेक क्षेत्रांतील कंपन्यांनी आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये प्राथमिक बाजारातून निधी उभारणी केली. मात्र, पारंपरिकरीत्या वर्चस्व असलेल्या वित्त क्षेत्राने ९,६५५ कोटी रुपये उभारले, जे २०२२-२३ मधील या क्षेत्रातील कंपन्यांनी उभारलेल्या निधीच्या तुलनेत ५१ टक्क्यांनी कमी राहिले. गेल्या आर्थिक वर्षात यात्रा, मामाअर्थ आणि झॅगलचे या नवीन तंत्रज्ञान युगातील तीन कंपन्यांनी निधी उभारणी केली.

एकंदरीत, सूचिबद्धतेच्या पहिल्या दिवसाचा सरासरी नफा मागील आर्थिक वर्षातील ९ टक्क्यांच्या तुलनेत सरलेल्या वर्षात (२०२३-२४) २९ टक्के होता. दरम्यान, ७० टक्क्यांहून अधिक म्हणजेच ५५ कंपन्यांचे समभाग हे ‘आयपीओ’द्वारे वितरित किमतीच्या वर व्यवहार करत आहेत. सरलेल्या आर्थिक वर्षात बाजारातील तेजीची दौड आणि किरकोळ गुंतवणूकदारांचा उत्साही सहभाग आणि संस्थात्मक गुंतवणूकदारांचा जोरदार प्रवाह यासारख्या अनेक घटकांमुळे प्राथमिक बाजारात मोठी निधी उभारणी शक्य झाली. मागील आर्थिक वर्षाच्या तुलनेत किरकोळ गुंतवणूकदारांचा प्रतिसाद अधिक होता. किरकोळ अर्जांची सरासरी संख्या मागील आर्थिक वर्षातील सुमारे ६ लाखांवरून दुपटीने वाढत १३ लाखांवर पोहोचली आहे.

हेही वाचा… Gold-Silver Price on 3 April 2024: सोन्याने विक्रमी उच्चांक गाठला; चांदीचा भावही वाढला, खरेदीवर होणार खिसा रिकामा

एसएमई आयपीओ मंचावरही उत्साह

दरम्यान, ‘प्राइम डेटाबेस’द्वारे संकलित आकडेवारीनुसार, लघू आणि मध्यम श्रेणीतील अर्थात ‘एसएमई आयपीओ’ मंचावर देखील २०० कंपन्यांनी ५,८३८ कोटींची निधी उभारणी केली. त्याआधीच्या वर्षात म्हणजेच २०२२-२३ मध्ये १२५ कंपन्यांनी २,२३५ कोटींची निधी उभारणी केली होती. एसएमई मंचावर केपी ग्रीनने १८० कोटी रुपयांचा सर्वाधिक निधी उभारला. विद्यमान २०२३ सालातील सूचिबद्ध एसएमई कंपन्यांच्या एकत्रित बाजार भांडवलाने १ लाख कोटी रुपयांचा महत्त्वपूर्ण टप्पा ओलांडला असून, यात नव्याने दाखल कंपन्यांचा सिंहाचा वाटा आहे. मागील वर्षाच्या तुलनेत २०२३ मध्ये ‘आयपीओ’ घेऊन येणाऱ्या एसएमई कंपन्यांची संख्याही दुपटीने वाढली आहे.