मुंबई : भारताने इंग्लंडमध्ये ठेवलेले १०० टन सोने सरलेल्या आर्थिक वर्षात देशाच्या तिजोरीत हलवले आहे, अशी माहिती सूत्रांनी शुक्रवारी दिली. वर्ष १९९१ मध्ये परकीय चलनाचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे देशाला इंग्लंडकडे सोने गहाण ठेवावे लागले होते. मात्र नंतर कर्जाची परतफेड केल्यानंतरही ते सोने इंग्लंडमध्येच ठेवण्यात आले होते.

आता रिझर्व्ह बँकेकडील सोन्याचा साठा ८२२ मेट्रिक टनांवर पोहोचला असून सरलेल्या आर्थिक वर्षात त्यात २७.४६ मेट्रिक टन सोन्याची भर पडली आहे. मौल्यवान धातू असलेल्या सोन्याचा बराचसा भाग परदेशात साठवला जातो. इतर देशांप्रमाणे देशाचे सोने ब्रिटनची मध्यवर्ती बँक असलेल्या बँक ऑफ इंग्लंडमध्ये आहे.

हेही वाचा…दशकभरात दहा लाख कोटींच्या थकीत कर्जाची वसुली – अर्थमंत्री

देशात १०० टन सोने पुन्हा आणल्यामुळे रिझर्व्ह बँकेकडील देशांतर्गत गंगाजळीतील सुवर्ण-साठा ४०८ टनांपेक्षा अधिक झाला आहे, याचा अर्थ रिझर्व्ह बँकेकडील देशात असलेला सोन्याचा साठा आणि परदेशी असलेला सोन्याचा साठा आता समान पातळीवर आला आहे.

हेही वाचा…RBI चं १०० टन सोनं लंडनमधून भारतात दाखल; का? कुठून? आणि कशी झाली वाहतूक? दिलं ‘हे’ कारण!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रिझर्व्ह बँकेच्या गुरूवारी जाहीर झालेल्या वार्षिक अहवालानुसार, जारी केलेल्या रोख्यांसाठी तरतूद म्हणून ३०८ टनांहून अधिक सोने भारतात आहे, तर आणखी १००.२८ टन सोने बँकिंग विभागाची मालमत्ता म्हणून राखीव ठेवण्यात आले आहे. एकूण सोन्याच्या साठ्यापैकी ४१३.७९ मेट्रिक टन सोन्याचा साठा परदेशात आहे, असे वार्षिक अहवालात म्हटले आहे. देशात सध्या मुंबई आणि नागपूर येथे रिझर्व्ह बँकेकडे मोठ्या सुरक्षा व्यवस्थेखाली सोने सुरक्षित ठेवण्यात आले आहे.