लोकसत्ता व्यापार प्रतिनिधी
मुंबई : भांडवली बाजारातील प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टीने बुधवार सत्रात ६५,३११ या मजबूत पातळीवरून व्यवहाराला सुरुवात केली. मात्र संमिश्र जागतिक संकेतांमुळे बँकिंग आणि ऊर्जा कंपन्यांच्या समभागात झालेल्या विक्रीच्या माऱ्यामुळे निर्देशांक किरकोळ वाढीसह स्थिरावले. सत्रातील उच्चांकी पातळीपासून निर्देशांकात घसरण झाली तरी सेन्सेक्स ६५,००० पातळीवर टिकून आहे.
दिवसअखेर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स ११.४३ अंशांनी वधारून ६५,०८७.२५ पातळीवर बंद झाला. सलग तिसऱ्या सत्रात प्रमुख निर्देशांक सकारात्मक पातळीवर बंद झाले. सेन्सेक्सने दिवसभरातील सत्रात ६५,४५८.७० या सत्रातील उच्चांकी पातळीला स्पर्श केला. तर दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये ४.८० अंशांची किरकोळ वाढ झाली आणि तो १९,३४७.४५ पातळीवर विसावला.
आणखी वाचा-भारत, न्यूझीलंडदरम्यान व्यवसाय सुलभतेसाठी ‘यूपीआय’ वापरावर चर्चा
अमेरिकेतील रोजगार वाढीची अनुकूल आकडेवारी आणि रोख्यांवरील परतावा दर कमी झाल्याने व्याजदर वाढीची चिंता कमी झाली. परिणामी, या सकारात्मक भावनेने सुरुवातीला देशांतर्गत भांडवली बाजाराला चालना दिली. चीनमधील बँकांनीदेखील विद्यमान कर्जदर कमी करण्याच्या हालचाली सुरू केल्याने सकारात्मक दृष्टिकोनाला बळकटी मिळाली. शिवाय देशांतर्गत धातू कंपन्यांचे समभाग वधारले. मात्र युरोपातील नकारात्मक घडामोडींमुळे आणि देशांतर्गत आघाडीवर बँकिंग समभागात विक्रीचा मारा झाल्याने बाजाराने तेजी गमावली, असे निरीक्षण जिओजित फायनान्शिअल सर्व्हिसेसचे संशोधनप्रमुख विनोद नायर यांनी नोंदवले.
सेन्सेक्समध्ये फायनान्शिअल सर्व्हिसेसचा समभाग ४.९९ टक्क्यांसह सर्वाधिक तेजीत होता. त्यापाठोपाठ टाटा स्टील (२.०९ टक्के), मारुती सुझुकी (१.८७ टक्के), महिंद्र अँड महिंद्र (१.३१ टक्के) आणि इन्फोसिसचे (१.१९ टक्के) समभाग वधारून बंद झाले.
सेन्सेक्स ६५,०८७.२५ ११.४३ ( ०.०२ टक्के)
निफ्टी १९,३४७.४५ ४.८० ( ०.०२ टक्के)
डॉलर ८२.७४ -६
तेल ८५.९६ ०.५५