Navi Mumbai International Airport : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचा पहिला टप्पा स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते विमानतळाचे उद्घाटन करण्याच्या हालचाली सुरू आहेत. दरम्यान, या पहिल्या टप्प्यात व्यावसायिक उड्डाणे सुरू करणारी इंडिगो ही पहिली एअरलाईन कंपनी असेल, असं एअरलाइन आणि अदानी एअरपोर्ट होल्डिंग्ज लिमिटेड (एएएचएल) यांनी बुधवारी संयुक्त निवेदनात सांगितलं. फायनान्शिअल एक्स्प्रेसने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.
इंडिगो पहिल्या दिवसापासून १५ हून अधिक भारतीय शहरांमध्ये दररोज १८ उड्डाणे (३६ हवाई वाहतूक हालचाली) चालवेल. नोव्हेंबर २०२५ पर्यंत १४ आंतरराष्ट्रीय उड्डाणांसह ७९ दैनिक उड्डाणे आणि नोव्हेंबर २०२६ पर्यंत ३० आंतरराष्ट्रीय उड्डाणांसह १४० दैनिक उड्डाणे करण्याची कंपनीची योजना आहे.
इंडिगोचे सीईओ पीटर एल्बर्स म्हणाले, “इंडिगो ही एनएमआयए वरून काम करणारी पहिली एअरलाइन असेल आणि आम्हाला हे जाहीर करताना खूप आनंद होईल. हा विस्तार प्रवाशांच्या वाढत्या गरजा आणि भारताच्या विमान वाहतूक क्षेत्राच्या वाढीप्रती आम्ही कटिबद्ध आहोत.”
एएएचएलचे सीईओ अरुण बन्सल पुढे म्हणाले, “इंडिगोसोबतची आमची भागीदारी एनएमआयएला एक प्रमुख विमान वाहतूक केंद्र बनवण्याच्या दृष्टीने एक महत्त्वाचा टप्पा आहे.”
इंडिगोची यशस्वी लँडिंग
११ ऑक्टोबर २०२४ रोजी नवी मुंबई विमानतळावर भारतीय हवाई दलातर्फे इन्स्ट्रूमेन्ट लॅंडिंगची चाचणी आणि २९ डिसेंबरला इंडिगोतर्फे प्रवासी विमानाची यशस्वी लॅंडिंग चाचणी धावपट्टीवर पार पडली होती. यावेळी नागरी विमान वाहतूक सुरक्षा मंडळाचे प्रादेशिक संचालक प्रकाश निकम आणि सिडकोचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल, सिडकोचे सह व्यवस्थापकीय संचालक शान्तनु गोयल, सिडकोच्या परिवहन व विमानतळ विभागाच्या मुख्य महाव्यवस्थापक गीता पिल्लई, एनएमआयएएलचे अधिकारी उपस्थित होते. यापूर्वी सोमवारी २४ फेब्रुवारी नागरी विमान वाहतूक महासंचलनालय आणि भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी संपूर्ण दिवस विमानतळाची पाहणी केली होती.