पीटीआय, नवी दिल्ली : शेअर घोटाळ्याचा आरोप असलेल्या अमेरिकेतील गुंतवणूकदार संस्था ‘जेन स्ट्रीट’ने सोमवारी ‘सेबी’च्या नावे विशेष खात्यात ४,८४३.५७ कोटी रुपये जमा केले. दंडापोटी ही रक्कम जमा करताच, बाजार नियंत्रकांनी लादलेले निर्बंध उठवण्याची विनंतीही तिने केली. या तिच्या विनंतीची योग्य त्या प्रक्रियेनुसार चाचपणी केली जाईल, असे नियंत्रकांनीही सत्वर स्पष्ट केले.
जेन स्ट्रीट (जेएस) या संस्थेने रोख (कॅश) तसेच वायदे (फ्युचर्स आणि ऑप्शन्स) बाजारात एकाच वेळी मोठ्या प्रमाणात ठरावीक समभागांवर सौदे लावून मोठ्या प्रमाणात नफा मिळविल्याबद्दल आणि निर्देशांकांमध्ये फेरफार केल्याचा दोषारोप आहे. ‘सेबी’ने तपासाअंती ३ जुलै रोजी दिलेल्या अंतरिम आदेशात जेएस समूहाच्या बाजारातील व्यवहारांवर बंदी आणली. शिवाय अशा बेकायदेशीर व्यवहारनीतीतून जानेवारी २०२३ ते मे २०२५ या कालावधीत जेएस समूहाने ३६,६७१ कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावल्याचे चौकशीत आढळून आले. त्या नफ्यातील ४,८४३ कोटी रुपयांवर जप्तीचाही ‘सेबी’चा आदेश होता.
अंतरिम आदेशाचे पालन करून, सेबीच्या नावे असलेल्या विशेष खात्यात ४,८४३.५७ कोटी रुपये जेएस समूहाकडून जमा करण्यात आले आहेत, असे नियामकांनी स्पष्ट केले. तथापि, अंतरिम आदेशाखाली लादलेले काही सशर्त निर्बंध हटवावेत आणि ‘सेबी’ने या संदर्भात योग्य निर्देश जारी करावेत, असेही जेएस समूहाकडून विनवणी करण्यात आल्याचे नियामकांनी म्हटले आहे. या विनंतीला अनुसरून नियामकांनी म्हटले आहे की, रोखे बाजाराच्या सचोटीने कारभाराला सुनिश्चित करण्याच्या वचनबद्धतेला ध्यानात ठेऊन या विनंतीचा विचार केला जाईल आणि योग्य त्या प्रक्रियेचे पालन केले जाईल.