पुणे : टोयोटा किर्लोस्कर मोटार कंपनीच्या स्पोर्ट युटीलिटी व्हेईकल (एसयूव्ही) मोटारींना ग्रामीण भागातून मागणीत चांगली वाढ सुरू असून, आगामी काळात शहरी भागाएवढीच मागणी ग्रामीण भागातून मागणी येण्याची शक्यता आहे, असा विश्वास कंपनीचे उपाध्यक्ष सिमांत अरूण यांनी येथे व्यक्त केला.
सिमांत अरूण हे कंपनीचे पश्चिम विभागाचे प्रमुख आहेत. ‘लोकसत्ता’शी बोलताना ते म्हणाले की, देशभरातील टोयोटाच्या मोटारींच्या एकूण विक्रीपैकी २२ टक्के विक्री ही पश्चिम विभागात होते. त्यात महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गुजरात आणि गोवा या राज्यांचा समावेश आहे. या विभागातील विक्रीपैकी तब्बल ५३ टक्के विक्री एकट्या महाराष्ट्रात होते. टोयोटाच्या मोटारींच्या विक्रीबाबत पुण्याने आघाडी घेतली आहे.
पुण्याच्या आजूबाजूच्या परिसरातून मोटारींना मागणी अधिक आहे. याचवेळी मराठवाड्यातूनही मोटारींना मागणी वाढत आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक तालुक्यात आमचे सेवा केंद्र सुरू करण्याचा मानस आहे. त्यामुळे ग्राहकांच्या त्यांच्या जवळच्या केंद्रात सेवा मिळू शकेल, असे अरूण यांनी सांगितले.
टोयोटोच्या मोटारींची विक्री शहरी भागात ६७ टक्के असून ग्रामीण भागात ३३ टक्के आहे. आगामी काळात ग्रामीण भागातील विक्रीत आणखी वाढ होण्याचा अंदाज आहे. हे प्रमाण शहरी आणि ग्रामीण भागात समान पातळीवर येण्याचा अंदाज आहे. समृद्धी महामार्ग आणि या सारख्या पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या क्षेत्रात आमच्या मोटारींना मागणी अधिक आहे. याचबरोबर नव्याने नागरीकरण होत असलेल्या भागातूनही मोटारींना मागणी वाढत आहे. कंपनीकडून जुन्या वापरलेल्या मोटारींची विक्री केली जाते. त्यालाही चांगला प्रतिसाद मिळत आहे, असे अरूण यांनी स्पष्ट केले.
नवरात्रीनिमित्त विशेष सवलत
केंद्र सरकारने वाहनांवरील वस्तू व सेवा करात (जीएसटी) कपात केली आहे. यामुळे टोयोटा कंपनीने ग्लान्झा, टायझर आणि हायरायडर मोटारींवर सणासुदीच्या काळात ग्राहकांना विशेष सवलत योजना सुरू केली आहे. त्यात ‘आता मोटार घ्या आणि पुढील वर्षी जानेवारीपासून हप्ता भरा,’ या योजनेचा समावेश आहे. त्यामुळे मोटारीची आता नोंदणी करून ग्राहक ती नवरात्रीत घरी नेऊ शकतात. याचबरोबर ग्राहकांना मोटारींवर पाच वर्षांची अतिरिक्त वॉरंटी आणि सेवा दिली जात आहे. जीएसटी कपातीनंतर आमच्या मोटारींच्या किमती ६० हजार ते ३.५ लाख रुपयांनी कमी होणार आहेत, असेही सिमांत अरूण यांनी नमूद केले.