मुंबई : प्रारंभिक सार्वजनिक भागविक्री अर्थात आयपीओ बाजारपेठेला पुन्हा ज्वर चढला असून, अनेक नवनव्या कंपन्या प्राथमिक बाजारात गुंतवणूकदारांना आजमावत आहेत. सोमवारपासून सुरू झालेल्या नवीन सप्ताहात सूक्ष्म, लघु व मध्यम (एसएमई) उद्योग क्षेत्रातील दोन प्रथितयश कंपन्यांनी ‘आयपीओ’ प्रस्तावित केला आहे.

‘स्टुडिओ एलएसडी’चा ७४.२५ कोटींचा आयपीओ

ठळक वैशिष्ट्ये:

⦁ इश्यू आकार – प्रत्येकी २ रुपयांचे १,३७,५०,००० इक्विटी शेअर्स
⦁ एकूण निधी उभारणी – ₹७४.२५ कोटी (कमाल)
⦁ किंमत पट्टा – ₹५१ – ₹५४ प्रति शेअर
⦁ लॉट साईज – २,००० इक्विटी शेअर्स
⦁ विक्री कालावधी – १८ ऑगस्ट ते २० ऑगस्ट २०२५

अस्सल आणि मनमोहक आशयाची निर्मिती करणारे मल्टीमीडिया निर्मिती – गृह असलेल्या स्टुडिओ एलएसडी लिमिटेडने १८ ऑगस्टपासून सुरू केलेल्या प्रारंभिक समभाग विक्रीच्या (आयपीओ) माध्यमातून ७४.२५ कोटी रुपये उभारणे प्रस्तावित केले आहे. बुधवार, २० ऑगस्ट २०२५ रोजी हा आयपीओ बंद होणार आहे.

मनोरंजन उद्योगात मजबूत वाढ आणि तंत्रज्ञान-चालित आशयाच्या मागणीत वाढ होत असताना, स्टुडिओ एलएसडीने, आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून विकसित केलेल्या विविधांगी इन-हाऊस उत्पादन क्षमतेतून ठसठशीत वेगळेपण निर्माण केले आहे. प्रस्तावित आयपीओतून उभारला जाणारा निधी कार्यविस्तारासाठी, इन-हाऊस पोस्ट-प्रॉडक्शन सुविधा आणि व्हीएफएक्स, एआय आणि इमर्सिव्ह व्हिडिओ सारख्या प्रगत तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यासाठी भांडवली खर्च म्हणून वापरला जाईल.

कंपनीचे शेअर्स आयपीओनंतर ‘एनएसई इमर्ज’ या एसएमई बाजारमंचावर सूचिबद्ध केले जातील. कॉर्पविस अॅडव्हायझर्स ही कंपनी या भागविक्रीचे व्यवस्थापन पाहत आहे. गुंतवणूकदारांना ५१ रुपये ते ५४ रुपये या किंमत पट्ट्यात किमान २,००० समभागांसाठी बोली लावणारा अर्ज करावा लागेल. या आयपीओद्वारे कंपनी २ रुपये दर्शनी मूल्याचे १,३७,५०,००० शेअर्स विक्रीसाठी खुले केले आहेत. २०१७ पासून कार्यान्वयन सुरू केलेल्या या कंपनीने आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये,१०४.४७ कोटी रुपयांच्या महसूलावर, ११.६७ कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला आहे.

एलजीटी बिझनेस कनेक्शन्सची भागविक्री मंगळवारपासून

ठळक वैशिष्ट्ये:

⦁ इश्यू आकार – प्रत्येकी १० रुपयांचे २६,२५,६०० इक्विटी शेअर्स
⦁ एकूण निधी उभारणी – ₹२८.०९ कोटी
⦁ आयपीओ किंमत – प्रति शेअर ₹१०७
⦁ लॉट साईज – १,२०० इक्विटी शेअर्स
⦁ विक्री कालावधी – १९ ऑगस्ट ते २१ ऑगस्ट २०२५

पर्यटन आणि प्रवासाशी संलग्न एकात्मिक उपाययोजना प्रस्तुत करणाऱ्या एलजीटी बिझनेस कनेक्शन्स लिमिटेडने मंगळवार, १९ ऑगस्टपासून प्रारंभिक समभाग विक्रीद्वारे (आयपीओ) २८.०९ कोटी रुपये उभारणे प्रस्तावित केले आहे. ‘बीएसई एसएमई’ बाजारमंचावर समभागांच्या सूचिबद्धतेसाठी असलेल्या या आयपीओसाठी प्रत्येकी १०७ रुपये किमतीवर गुंतवणूकदारांना बोली लावता येईल.

एलजीटी बिझनेस ही थेट किंवा आघाडीच्या अ‍ॅग्रीगेटर्सद्वारे तिच्या ग्राहकांना थर्ड-पार्टी हॉटेल, हवाईसेवा प्रदान करते, त्याचप्रमाणे एजंटांमार्फत व्हिसासह प्रवास आणि पर्यटनाशी संलग्न समग्र सेवा आणि उपाय प्रस्तुत करते. देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय ठिकाणी विस्तार, त्याचप्रमाणे नवोपक्रम, सेवा उत्कृष्टता आणि धोरणात्मक भागीदारी यावर लक्ष केंद्रित करण्यासाठी आवश्यक भांडवल म्हणून आयपीओमधून मिळणाऱ्या निधीचा वापर करण्याचे कंपनीचे नियोजन आहे. गुरुवार, २१ ऑगस्ट २०२५ पर्यंत सुरू राहणाऱ्या आयपीओचे व्यवस्थापन मार्क कॉर्पोरेट ॲडव्हायझर्स ही कंपनी पाहात आहे. सरलेल्या २०२४-२५ आर्थिक वर्षात कंपनीने १००.४३ कोटी रुपयांच्या महसुलावर, ५.२१ कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला आहे.