मुंबई : देशांतर्गत भांडवली बाजारात तेजीवाल्यांनी पुन्हा सक्रिय होताना, चार सत्रातील घसरणीच्या मालिकेला मंगळवारी लगाम लावला. किरकोळ महागाई दरात घट होऊन ती सहा वर्षांच्या नीचांकी रोडावल्याने रिझर्व्ह बँकेकडून आणखी एका व्याजदर कपातीच्या आशावादाने झालेल्या खरेदीतून प्रमुख निर्देशांक सेन्सेक्सने ३१७ अंशांची कमाई केली.
वाहन निर्मिती, औषध निर्माण क्षेत्रातील समभागांमधील तेजीमुळे मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स ३१७.४५ अंशांनी वधारून ८२,५७०.९१ पातळीवर स्थिरावला. दिवसभरात त्याने ४९०.१६ अंशांची कमाई करत ८२,७४३.६२ या सत्रातील उच्चांकी पातळीला स्पर्श केला. दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये ११३.५० अंशांची वाढ झाली आणि तो २५,१९५.८० पातळीवर बंद झाला. या आधीच्या चार सत्रात, सेन्सेक्सने १,४५९.०५ हून अधिक अंश गमावले. तर निफ्टी १.७२ टक्क्यांनी म्हणजेच ४४० अंशांनी घसरला आहे.
जागतिक आणि देशांतर्गत आघाडीवरील घडामोडींमुळे बाजारातील भावना सुधारण्याची चिन्हे दिसत आहेत. अमेरिकेसोबत व्यापार करार होण्याची शक्यता असल्याने आशावाद वाढत आहे, ज्यामुळे आयात कराशी संबंधित जोखीम कमी होण्याची आशा निर्माण झाली आहे. त्याच वेळी, देशांतर्गत किरकोळ महागाई दर अनेक वर्षांच्या नीचांकी पातळीवर पोहोचला आहे, ज्यामुळे रिझर्व्ह बँकेकडून आणखी दर कपातीची अपेक्षा वाढली आहे. भविष्यातील आर्थिक वाढीला गती देणाऱ्या सुधारणेची चिन्हे सध्याचा काळ दर्शवित आहे, असे मत जिओजित इन्व्हेस्टमेंट्स लिमिटेडचे संशोधन प्रमुख विनोद नायर यांनी व्यक्त केले.
सेन्सेक्समध्ये सन फार्मा, ट्रेंट, टाटा मोटर्स, बजाज फिनसर्व्ह, महिंद्र अँड महिंद्र आणि बजाज फायनान्स यांची कामगिरी चमकदार राहिली. तर एचसीएल टेक, टाटा स्टील, कोटक महिंद्र बँक आणि ॲक्सिस बँकेच्या समभागांनी गुंतवणूकदारांची निराशा केली.
सेन्सेक्स ८२,५७०.९१ ३१७.४५ ( ०.३९%)
निफ्टी २५,१९५.८० ११३.५० ( ०.४५%)
तेल ६९.०९ -०.१७ टक्के
डॉलर ८५.८२ -१० पैसे