मुंबई : रिझर्व्ह बँकेच्या पतधोरणापूर्वी तेल आणि वायू तसेच बँकिंग समभागांमध्ये गुंतवणूकदारांनी केलेल्या विक्रीच्या माऱ्यामुळे मंगळवारी प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये घसरण झाली. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स ३०८.४७ अंशांनी घसरून ८०,७१०.२५ पातळीवर बंद झाला. दिवसभरात त्याने ४६४.३२ अंश गमावत ८०,५५४.४० या सत्रातील नीचांकी पातळीला स्पर्श केला होता. दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये ७३.२० अंशांची घसरण झाली आणि तो २४,६४९.५५ पातळीवर बंद झाला.

जागतिक संकेत सकारात्मक असूनही, देशांतर्गत बाजारात मात्र नकारात्मक वातावरण राहिले. रशियातून होणाऱ्या तेलाच्या आयातीमुळे येणाऱ्या अमेरिकी निर्बंधांबद्दलच्या चिंतेमुळे तेल आणि वायू क्षेत्रातील कंपन्यांच्या समभागांमध्ये घसरण झाली. शिवाय भारतीय औषधी उद्योग आणि माहिती-तंत्रज्ञान (आयटी) क्षेत्रासाठी अमेरिका सर्वात मोठा निर्यातदार देश असल्याने त्या समभागांमध्ये घसरण झाली.

डॉलरच्या तुलनेत रुपयातील घसरणीचा देखील बाजार भावनांवर परिणाम झाला. गुंतवणूकदार आता रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण निर्णयाची वाट पाहत आहेत. बाजाराला नजीकच्या काळात दर कपातीची फारशा अपेक्षा नाहीत. सध्या, गुंतवणूकदारांची पसंती देशांतर्गत उपभोगावर आधारित समभाग आणि बाह्य घटकांवर मर्यादित अस्थिरता असलेल्या क्षेत्रांना आहे, असे मत जिओजित इन्व्हेस्टमेंट्सचे संशोधन प्रमुख विनोद नायर यांनी नोंदवले.

सेन्सेक्समध्ये अदानी पोर्ट्स, रिलायन्स इंडस्ट्रीज, इन्फोसिस, आयसीआयसीआय बँक, बीईएल, एचडीएफसी बँक, पॉवर ग्रिड, आयटीसी आणि सन फार्मास्युटिकल या कंपन्यांचे समभाग घसरले. तर टायटन, मारुती, ट्रेंट, भारती एअरटेल, बजाज फायनान्स, टेक महिंद्र, स्टेट बँक, एल अँड टी, एचसीएल टेक्नॉलॉजीज आणि एनटीपीसीचे समभाग तेजीसह बंद झाले. मुंबई शेअर बाजाराच्या आकडेवारीनुसार, सोमवारी परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी २,५६६.५१ कोटी रुपये मूल्याचे समभाग विकले तर देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांनी ४,३८६.२९ कोटी रुपये मूल्याचे समभाग खरेदी केले.

रुपया ८८ नजीकच्या नीचतम स्तरातून बचावला!

मुंबई : मंगळवारी अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपया १६ पैशांनी घसरून ८७.८२ पातळीवर बंद झाला. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियातून तेल खरेदी सुरू ठेवल्याने भारतीय वस्तूंवर कर वाढवण्याची पुन्हा एकदा धमकी दिल्यानंतर बाजारात चिंतेचे वातावरण दिसून आले.

परकीय चलन बाजारात, डॉलरच्या तुलनेत रुपयाने ८७.९५ या नीचतम पातळीवरून मंगळवारी व्यवहाराला सुरुवात केली. तर त्याने सत्रात ८७.७५ हा सत्रातील उच्चांक देखील गाठला. रिझर्व्ह बँकेकडून डॉलरचा पुरवठा वाढविणारा कथित हस्तक्षेपामुळे रुपया डॉलरमागे ८८ च्या पातळीपुढे घसरंगुडीपासून वाचविला गेल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. मंगळवारी दिवसअखेर, डॉलरच्या तुलनेत १६ पैशांनी घसरून ८७.८२ पातळीवर स्थिरावला. सोमवारच्या सत्रातही, रुपया ४८ पैशांनी घसरून ८७.६६ वर बंद झाला होता. सहा चलनांच्या तुलनेत डॉलरच्या ताकदीचे मोजमाप करणारा डॉलर निर्देशांक ०.१८ टक्क्यांनी वधारून ९८.६८ वर पोहोचला आहे.

भारत-अमेरिका व्यापार करारासंबंधाने अनिश्चिततेमुळे देशांतर्गत बाजाराच्या भावनांवरील नकारात्मक परिणामांनी रुपया आणखी घसरण्याची शक्यता असल्याचे परकीय चलन व्यापाऱ्यांनी सांगितले. शिवाय, कमकुवत भांडवली बाजाराने गुंतवणूकदारांना आणखी निराश केले आहे. मात्र, रिझर्व्ह बँकेच्या हस्तक्षेपामुळे रुपयातील घसरण कमी झाली. सत्रात कमकुवत झालेला डॉलर आणि खनिज तेलाच्या किमतीत झालेल्या घसरणीमुळेही रुपयातील घसरण काही प्रमाणात कमी झाली.

  • सेन्सेक्स ८०,७१०.२५ -३०८.४७
  • निफ्टी २४,६४९.५५ -७३.२०
  • तेल ६८.०६ -१.०२ टक्के
  • डॉलर ८७.८२ १६ पैसे