पुणे: कल्याणी समूहाचे अध्यक्ष बाबा कल्याणी यांच्या बाजूने त्यांच्या दिवंगत मातोश्री सुलोचना नीळकंठ कल्याणी यांनी कोणताही मुखत्यारनामा केलेला नव्हता. तसेच, त्या हयात असताना सुरू केलेल्या कोणत्याही कायदेशीर प्रक्रियेशी बाबा कल्याणी यांचा संबंध नाही, असे स्पष्टीकरण कल्याणी समूहाने सोमवारी दिले.

बाबा कल्याणी यांनी त्यांच्या मातोश्रींवर दबाव टाकल्याचा आरोप गौरीशंकर कल्याणी यांनी केला आहे. गौरीशंकर हे बाबा यांचे बंधू आहेत. गौरीशंकर यांनी याप्रकरणी सुलोचना कल्याणी यांचे प्रतिज्ञापत्रही सादर केले आहे. हे सर्व आरोप कल्याणी समूहाने फेटाळून लावले आहेत. हे आरोप खोटे असल्याचे समूहाने म्हटले असून, पुणे जिल्हा न्यायालयात याप्रकरणी खटला सुरू असून, कायदेशीर मार्गाने याला उत्तर देण्याचा इशारा दिला आहे.

हेही वाचा : आयसीआयसीआय प्रु. व्हॅल्यू डिस्कव्हरी फंडाची द्विदशकपूर्ती; गुंतवणुकीवर ‘निफ्टी’च्या तुलनेत दुप्पट लाभ

कल्याणी समूहाच्या प्रवक्त्याने निवेदनात म्हटल्याप्रमाणे, सुलोचना कल्याणी यांच्यावर मुखत्यारनाम्याबाबत खटले दाखल करण्यासाठी बाबा कल्याणी यांनी दबाव आणल्याचा आरोप खोटा आहे. त्यांनी बाबा कल्याणी यांच्या बाजूने कोणताही मुखत्यारनामा केलेला नाही. सुलोचना कल्याणी या गौरीशंकर यांच्या कुटुंबासमवेत त्यांच्या पार्वती निवास या निवासस्थानी राहत होत्या. तेथे असताना त्यांनी २०१२ मध्ये त्यांचे इच्छापत्र केले होते. त्यामुळे बाबा कल्याणी यांनी त्यांच्या आईवर बळजबरी केली आणि अवाजवी प्रभाव पाडल्याचा होणारा आरोप खोटा आहे. सुलोचना कल्याणी यांच्या २०१२ च्या मृत्युपत्राचे मदन टाकळे आणि एस. के. अडिवरेकर हे विश्वस्त आहेत. तथ्यांना टाळून चुकीची माहिती पसरवली जात आहे, असे कल्याणी समूहाच्या प्रवक्त्यांनी म्हटले आहे.

हेही वाचा : Edible Oil : ऐन सणासुदीच्या काळात खाद्यतेल महागणार, आयात शुल्कात २० टक्क्यांची वाढ

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गौरीशंकर कल्याणी यांनी पुणे दिवाणी न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल करून त्यांची दिवंगत आई सुलोचना कल्याणी यांच्या २०१२ च्या मृत्युपत्राच्या अंमलबजावणीला आव्हान दिले आहे.