मुंबई: खासगी क्षेत्रातील लघुवित्त बँक असलेल्या एयू स्मॉल फायनान्स बँकेला रिझर्व्ह बँकेने सर्वसमावेशक बँक (युनिव्हर्सल बँक) म्हणून रूपांतरित होण्यासाठी ‘तत्त्वतः’ मान्यता दिली आहे. सुमारे एका दशकांच्या कालावधीनंतर अशा तऱ्हेने खासगी क्षेत्रातून आणखी एका वाणिज्य बँकेच्या वहिवाटीला रिझर्व्ह बँकेने रस्ता खुला केला आहे.
एयू स्मॉल फायनान्स बँकेने गेल्या वर्षी सप्टेंबर २०२४ मध्ये सर्वसमावेशक बँकेचा दर्जा मिळावा यासाठी आवश्यक परवान्यासाठी रिझर्व्ह बँकेकडे अर्ज केला होता. आता त्याला रिझर्व्ह बँकेने दिलेल्या मंजुरीनंतर, या बँकेला मोठी कर्जे वितरित करण्यात, अधिक ग्राहक जोडण्यास आणि उपकंपन्या बनवून तिचे कामकाज वाढविता येणार आहे. लघु वित्त बँक म्हणून तिला हे करणे शक्य नव्हते आणि स्थापित नियमानुसार तिचे कार्यक्षेत्रही मर्यादित होते.
३० जून अखेर सरलेल्या तिमाहीत, एयू स्मॉल फायनान्स बँकेने निव्वळ नफ्यात वार्षिक आधारावर १६ टक्के वाढ नोंदवून तो ५.८१ अब्ज रुपयांवर नेला आहे. एकूण कर्जाच्या टक्केवारीनुसार बँकेचे एकूण बुडीत कर्ज २.४७ टक्के होते. जे गेल्या वर्षी १.७८ टक्के होते.
रिझर्व्ह बँकेने सर्वप्रथम २०१४ मध्ये लघु वित्त बँकांना सर्वसमावेशक बँकांमध्ये रूपांतरित करण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आणि नंतर गेल्या वर्षी एप्रिलमध्ये अधिक तपशीलवार निकषांसह त्या मार्गदर्शक तत्त्वांना अद्ययावत केले गेले. यापूर्वी रिझर्व्ह बँकेने वर्ष २०१५ मध्ये कोलकातास्थित बंधन बँकेला सर्वसमावेशक बँकिंग व्यवसाय करण्यास परवानगी दिली होती, त्याआधी ती लघु वित्त बँक म्हणून कार्यरत होती.
निकष काय?
समाधानकारक कामगिरी करण्याचा पाच वर्षांचा अनुभव, १० अब्ज रुपयांची निव्वळ संपत्ती, भांडवली पर्याप्ततेची आवश्यकता पूर्ण करणारी तसेच, पुरेसा नफा आणि मर्यादित अनुत्पादित मालमत्ता अर्थात बुडीत कर्जाचे प्रमाण असणाऱ्या लघु वित्त बँका या सर्वासमावेश बँक म्हणून रूपांतरणासाठी रिझर्व्ह बँकेने ठरविलेल्या निकषाद्वारे पात्र ठरतात.