मुंबई : रिझर्व्ह बँकेकडून अपेक्षेपेक्षा अधिक झालेल्या अर्ध्या टक्क्यांच्या रेपो दर कपातीमुळे प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टीने एक टक्क्यांहून अधिक उसळी घेतली. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स सात शतकांहून अधिक उसळला, तर निफ्टीने २५,००० अंशांची पातळी पुन्हा गाठली.

नियंत्रित महागाईच्या पार्श्वभूमीवर, रिझर्व्ह बँकेने विकासाला चालना देण्यासाठी पावले उचलली आहेत. शिवाय रोख राखीव प्रमाणात (सीआरआर) टप्प्याटप्प्याने एका टक्क्याची कपात करण्याची घोषणा करत बँकिंग क्षेत्राला २.५ लाख कोटींचा निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे. परिणामी कर्ज स्वस्त होण्याची आशा आहे.

रिझर्व्ह बँकेच्या दरकपातीच्या घोषणेनंतर सकाळच्या सत्रात गमावलेली गती निर्देशांकांनी उत्तरार्धात मिळविली आणि १ टक्क्यांहून अधिक उसळी घेतली. सप्ताहअखेर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स ७४६.९५ अंशांनी वधारून ८२,१८८.९९ पातळीवर बंद झाला. दिवसभरात त्याने ८५७.८५ अंशांची कमाई करत ८२,२९९.८९ या सत्रातील उच्चांकी पातळीला स्पर्श केला. दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीने २५,००० अंशांची पातळी पुन्हा गाठली. तो दिवसअखेर १.०२ टक्क्यांनी वधारून २५,००३.०५ पातळीवर बंद झाला. सर्व प्रमुख क्षेत्रांनी तेजीत योगदान दिले. गृहनिर्माण, वित्त आणि वाहन निर्मिती सारख्या दर-संवेदनशील क्षेत्र सर्वाधिक तेजीत होते.

रिझर्व्ह बँकेच्या आश्चर्यकारक आणि अर्थव्यवस्थेला प्रोत्साहन देण्याच्या आक्रमक धोरणाला शेअर बाजाराने आशावादी प्रतिसाद दिला. मोठी रेपो दर कपात आणि सीआरआर कपातीद्वारे बँकांना कर्जाऊ देण्यासाठी मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध होण्याची अपेक्षा आहे, ज्यामुळे आर्थिक वाढ, गुंतवणूक आणि मागणीला चालना देण्यासाठी रिझर्व्ह बँकेची वचनबद्धता दिसून येते. भूमिकेत ‘तटस्थ’ अशा केलेल्या बदलामुळे भविष्यातील दर कपातीच्या अपेक्षा कमी झाल्या आहेत. सध्याच्या जागतिक अनिश्चिततेमध्ये जलद तरलता विस्तार आणि वाढ-केंद्रित धोरणात्मक उपाययोजना गुंतवणूकदारांच्या आत्मविश्वासाला पाठिंबा देण्याची शक्यता आहे. बँकिंग, गृहनिर्माण, वाहननिर्मिती आणि ग्राहकोपयोगी वस्तूंसह दर-संवेदनशील क्षेत्रांची तेजीचे नेतृत्व केले, असे निरीक्षण जिओजित इन्व्हेस्टमेंट्स लिमिटेडचे संशोधन प्रमुख विनोद नायर यांनी नोंदवले.

सेन्सेक्समध्ये मारुती, इंडसइंड बँक, बजाज फिनसर्व्ह, महिंद्र अँड महिंद्र, टाटा स्टील, कोटक महिंद्र बँक, टायटन, एचडीएफसी बँक आणि एनटीपीसी या कंपन्यांचे समभाग तेजीत होते. तर भारती एअरटेल आणि सन फार्माच्या समभागात घसरण झाली.

बाजार तेजीचे चालक

  • सुवर्ण मूल्याच्या ८५ टक्क्यांपर्यंत कर्ज देण्याच्या निर्णयाने सोने तारण कर्ज देणाऱ्या कंपन्यांच्या समभागात मोठी वाढ
  • मोठ्या व्याजदर कपातीमुळे गृहनिर्माण आणि वाहन निर्मिती क्षेत्रातील कंपन्यांचे समभाग तेजीत
  • वाढलेल्या तरलतेमुळे लोकांहाती अधिक पैसा राहण्याच्या शक्यतेने ग्राहकोपयोगी वस्तू क्षेत्रात उत्साह
  • पोलाद आणि सिमेंटसह भांडवली खर्चाशी संबंधित क्षेत्रांना फायदा होण्याची आशा.

सेन्सेक्स ८२,१८८.९९ ७४६.९५ ०.९२%

निफ्टी २५,००३.०५ २५२.१५ १.०२%

तेल ६५.०४ – ०.४६%

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

डॉलर ८५.६८ -११ पैसे