मुंबई : रिलायन्स इंडस्ट्रीजच्या दूरसंचार क्षेत्रातील आघाडीची कंपनी असलेल्या जिओ टेलिकॉमने प्रीपेड टॅरिफमध्ये बदल करण्याची घोषणा केली आहे. परिणामी रिलायन्स इंडस्ट्रीजचा समभाग इंट्रा डे व्यवहारात २ टक्क्यांहून अधिक वधारला आहे. शिवाय विविध दलाली पेढ्यांकडून (ब्रोकरेज) खरेदीचा सल्ला दिला जात असल्याने तेजीला अधिक चालना मिळाली आहे.
राष्ट्रीय शेअर बाजारात, रिलायन्स इंडस्ट्रीजचा शेअर २.५० टक्क्यांनी वाढून १,४१५.५० रुपयांवर व्यवहार करतो आहे. रिलायन्स जिओने त्यांचे सुरुवातीचे अर्थात एंट्री-लेव्हल १ जीबी प्रीपेड पॅक बंद केले आहेत ज्यांची किंमत २२ दिवसांसाठी २०९ रुपये आणि २८ दिवसांसाठी २४९ रुपये आहे. आता नवीन प्लॅन २८ दिवसांसाठी प्रतिदिन १.५ जीबी असून २९९ रुपयांपासून उपलब्ध करून देण्यात आला आहे, जो आधी २४९ रुपयांवरून वाढला आहे. हे जिओने आता प्रतिस्पर्धी दूरसंचार कंपनी असलेल्या भारती एअरटेल आणि व्होडाफोन आयडियाच्या किंमतींशी सुसंगत दर केले आहेत, जे आधीच २८ दिवसांच्या प्लॅनसाठी २९९ रुपये आकारतात.
ब्रोकरेज हाऊसचे म्हणणे काय?
– आघाडीची दलाली पेढी असलेल्या आयआयएफएलने म्हटले आहे की, २४९ रुपयांच्या प्लॅनचे जिओच्या एकूण मोबाइल महसुलात १० टक्क्यांपेक्षा कमी योगदान आहे. आता कंपनीने केलेल्या २० टक्के दरवाढीमुळे एकूण महसुलात २ टक्के वाढ अपेक्षित आहे.
– अॅक्सिस कॅपिटलच्या मते, शुल्कातील बदलांमुळे जिओचा आर्थिक वर्ष २०२५-२६ महसूल आणि सरासरी प्रति वापरकर्ता महसूल (एआरपीयू) ४-५ टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे.
– मॉर्गन स्टॅनलीच्या मते, जिओने त्यांचा लोकप्रिय २४९ रुपयांचा प्लॅन (२८ दिवसांसाठी १ जीबी प्रतिदिन) आणि १९९ रुपयांचा प्लॅन (१८ दिवसांसाठी १.५ जीबी प्रतिदिन) काढून टाकला आहे. यासह, २८ दिवसांसाठी सर्वात कमी किमतीचा दैनिक डेटा पर्याय आता २९९ रुपयांपासून सुरू होत आहे. रिलायन्सला १,६९० रुपयांच्या लक्ष्य किमतीसह ‘बाय’ रेटिंग म्हणजेच समभाग खरेदीचा सल्ला दिला आहे.
– जेफरीजने, जिओमधील रोख प्रवाहात सुधारणा, किरकोळ विक्रीत स्थिर वाढीसह अक्षय्य ऊर्जा क्षेत्रात गुंतवणूक वाढीचा उल्लेख करून १,६७० रुपयांच्या लक्ष्य किमतीसह खरेदी करण्याचा सल्ला कायम ठेवला आहे.
मुंबई शेअर बाजाराच्या आकडेवारीनुसार, शेअरच्या बाजारभावानुसार, कंपनीचे बाजारभांडवल १९.१ लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे.