मुंबई : देशांतर्गत भांडवली बाजारात तेजीवाल्यांनी दिवाळीपूर्वीच आतषबाजीला सुरुवात केली असून गुरुवारच्या सत्रात सेन्सेक्सने ८६२ अंशांची मुसंडी मारली. निफ्टीने देखील २५,५८५ अंशांची पातळी ओलांडली. अमेरिकी फेडरल रिझर्व्हकडून व्याजदर कपातीच्या आशेने जागतिक बाजारात तेजीला उधाण आले.

विश्लेषकांच्या मते, अमेरिकेच्या मध्यवर्ती बँकेने व्याजदर कपात केल्यास देशांतर्गत भांडवली बाजारात परदेशी गुंतवणुकीचा ओघ वाढेल आणि त्यापरिणामी बाजारातील आशावाद वाढला आहे. याबरोबर सध्या व्यापार चर्चेसाठी अमेरिकेत भारतीय प्रतिनिधी मंडळासोबत केंद्रीय वाणिज्य सचिव राजेश अग्रवाल सहभागी होणार आहेत. भारताने अमेरिकेतून ऊर्जा आयात वाढवण्याची देखील तयारी दर्शविली आहे.

सत्राअखेर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्समध्ये ८६२.२३ अंशांची वाढ झाली आणि तो १.०४ टक्क्यांनी वधारून ८३,४६७.६६ पातळीवर स्थिरावला. दिवसभरात त्याने १,०१०.०५ अंशांची कमाई करत ८३,६१५.४८ ही सत्रातील उच्चांकी पातळी गाठली होती. दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीने २६१.७५ अंशांची (१.०३ टक्के) भर घालत २५,५८५.३० पातळीवर बंद झाला.

सकारात्मक जागतिक संकेत आणि भारत-अमेरिका व्यापार चर्चेभोवतीच्या आशावादामुळे देशांतर्गत शेअर बाजारांनी अनेक सत्रातील घसरणीला मागे टाकत मजबूत पुनर्प्राप्ती साधली. तिसर्‍या तिमाहीत मागणी पुनरुज्जीवनाची अपेक्षा, परदेशी गुंतवणूदारांकडून (एफआयआय) आवक वाढण्याचे संकेत, अमेरिकी फेडरल रिझर्व्हकडून निर्माण झाल्याने दर कपातीच्या अपेक्षा आणि डॉलर निर्देशांक नरमल्याने भावना आणखी उंचावल्या, असे मत जिओजित इन्व्हेस्टमेंट्स लिमिटेडचे संशोधन प्रमुख विनोद नायर यांनी नोंदवले आहे.

सेन्सेक्समधील आघाडीच्या कंपन्यांपैकी, कोटक महिंद्र बँक, टायटन, अ‍ॅक्सिस बँक, अदानी पोर्ट्स, महिंद्र अँड महिंद्र, रिलायन्स इंडस्ट्रीज, टाटा मोटर्स आणि एचडीएफसी बँकेच्या समभागांची कामगिरी चमकदार राहिली. मात्र इटर्नल आणि इन्फोसिसचे समभागांनी बाजारात तेजीत देखील निराशाजनक कामगिरी केली. मुंबई शेअर बाजाराच्या आकडेवारीनुसार, बुधवारच्या सत्रात देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (डीआयआय) ४,६५०.०८ कोटी रुपये मूल्याचे समभाग खरेदी केले आहेत.

तेजीची प्रमुख कारणे काय?

– भारत-अमेरिका चर्चा निष्कर्षाप्रती पोहोचण्याची आशा

– अमेरिकी फेडरल रिझर्व्हकडून व्याजदर कपातीची अपेक्षा

– परदेशी गुंतवणूदारांकडून (एफआयआय) आवक वाढली

– तिसर्‍या तिमाहीत मागणी पुनरुज्जीवनाचे संकेत