मुंबई : जागतिक पातळीवरील भू-राजकीय तणाव कमी झाल्यामुळे आणि गुंतवणूकदारांनी बाजारातील दिग्गज कंपन्यांच्या समभागांत खरेदीचा जोर लावल्याच्या परिणामी गुरुवारच्या सत्रात प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टी १ टक्क्यांहून अधिक वधारले.

गुरुवारी सत्राअखेर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स १,०००.३६ अंशांनी वधारून ८३,७५५.८७ पातळीवर स्थिरावला. दिवसभरात त्याने १,०५६.५८ अंशांची कमाई करत ८३,८१२.०९ या सत्रातील उच्चांकी पातळीला स्पर्श केला. बुधवारच्या सत्रात सेन्सेक्सने ७०० अंशांची मुसंडी मारली होती. दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीने ३०४.२५ अंशांची घातली आणि तो २५,५४९ पातळीवर बंद झाला.

आखातातील युद्धविरामानंतर गुंतवणूकदारांच्या बाजारावरील मजबूत विश्वासाचे प्रतिबिंबित म्हणजे सलग तीन सत्रात सेन्सेक्स १८०० अंशांहून अधिक वधारला आहे.

युद्ध तणाव निवळल्यामुळे संभाव्य पुरवठा साखळी व्यत्ययांवरील चिंता कमी झाल्या आहेत. अमेरिका आणि भारताच्या सरकारी रोख्यांच्या परतावा दर कमी झाल्यामुळे परदेशी गुंतवणूकदारांनी समभाग विक्री सुरू ठेवली आहे. मात्र अर्थव्यवस्थेस अनुकूल परिस्थिती बघता देशांतर्गत गुंतवणूकदार निव्वळ खरेदीदार बनले आहेत. चलनवाढीची चिंता कमी झाल्याने क्षेत्रीय पातळीवर बँकिंग आणि वाहन निर्मितीसारख्या प्रमुख क्षेत्रांमध्ये तेजीचे वातावरण आहे, असे जिओजित इन्व्हेस्टमेंट्स लिमिटेडचे संशोधन प्रमुख विनोद नायर यांनी नोंदवले.

सेन्सेक्समधील आघाडीच्या कंपन्यांपैकी टाटा स्टील, बजाज फायनान्स, भारती एअरटेल, अदानी पोर्ट्स, बजाज फिनसर्व्ह, एनटीपीसी, एचडीएफसी बँक, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि ॲक्सिस बँक यांचे समभाग तेजीत होते. तर बाजार तेजीच्या सत्रात ट्रेंट, स्टेट बँक , टेक महिंद्र, मारुती आणि महिंद्र अँड महिंद्र यांची कामगिरी निराशाजनक राहिली.

गुंतवणूकदारांच्या झोळीत ९.७० लाख कोटींची श्रीमंती

इराण-इस्रायलमधील तणाव कमी झाल्यानंतर वाढत्या आशावादामुळे बाजारातील तेजीच्या तीन सत्रात गुंतवणूकदारांच्या संपत्तीत ९.७० लाख कोटी रुपयांची वाढ झाली. सेन्सेक्सने सलग तीन सत्रात २.२७ टक्के म्हणजेच १,८५९.०८ अंशांची कमाई केली आहे. परिणामी मुंबई शेअर बाजारातील सूचिबद्ध कंपन्यांचे बाजारभांडवल ९.७० लाख कोटी रुपयांनी वाढून ४५७.५२ लाख कोटी रुपयांवर (५.३४ ट्रिलियन डॉलर) पोहोचले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
  • सेन्सेक्स ८३,७५५.८७ १,०००.३६ ( १.२१%)
  • निफ्टी २५,५४९ ३०४.२५ ( १.२१%)
  • तेल ६७.८० ०.१८
  • डॉलर ८५.६८ -४० पैसे