मुंबई: वित्त, वाहन निर्मिती आणि माहिती-तंत्रज्ञान कंपन्यांच्या समभागांमध्ये गुंतवणूकदारांनी केलेल्या चौफेर खरेदीमुळे गुरुवारी सेन्सेक्सने मोठ्या फेरउसळीसह १,४३६ अंशांची कमाई केली. दोन्ही निर्देशांक जवळपास दोन टक्क्यांनी उधळले आणि त्यांची गत महिन्याभरातील ही सर्वोत्तम कामगिरी आहे.

दिवसअखेर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्समध्ये १,४३६.३० अंशांची भर पडली आणि तो ७९,९४३.७१ पातळीवर स्थिरावला. दिवसभरात त्याने १,५२५.४६ अंशांची मुसंडी घेत ८०,०३२.८७ या सत्रातील उच्चांकी पातळीला स्पर्श केला. मात्र निर्देशांकाला ही ८०,०००ची पातळी टिकवून ठेवता आली नाही. दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये ४४५.७५ अंशांची वाढ होऊन तो २४,१८८.६५ पातळीवर बंद झाला.

हेही वाचा : मोदी सरकारच्या काळात रोजगारात १० वर्षांत ३६ टक्के वाढ, केंद्रीय कामगार मंत्री मनसुख मंडाविया यांची माहिती

येत्या आठवड्यात कंपन्यांच्या तिमाही आर्थिक कामगिरीचा हंगाम सुरू होणार आहे. कंपन्यांची सरलेल्या डिसेंबर तिमाहीतील कामगिरी समाधानकारक राहण्याच्या आशावादामुळे देशांतर्गत बाजारपेठेत उत्साहाचे वातावरण राहिले. बहुतेक क्षेत्रीय निर्देशांक सकारात्मक पातळीवर विसावले. बँकिंग आणि आयटी समभागांनी बाजाराच्या तेजीचे नेतृत्व केले, असे निरीक्षण जिओजित फायनान्शियल सर्व्हिसेसचे संशोधनप्रमुख विनोद नायर यांनी नोंदवले.
सेन्सेक्समधील आघाडीच्या कंपन्यांमध्ये बजाज फिनसर्व्हने ८ टक्क्यांनी वाढ नोंदवली, तर बजाज फायनान्स ६ टक्क्यांहून अधिक वधारला होता. त्यापाठोपाठ मारुती, टायटन, महिंद्र अँड महिंद्र, इन्फोसिस, एचसीएल टेक, झोमॅटो, अल्ट्राटेक सिमेंट आणि कोटक महिंद्र बँक यांचे समभाग तेजीसह बंद झाले. निर्देशांकातील ३० पैकी केवळ एकमेव सन फार्माच्या समभागात घसरण झाली.

तेजीला चालना कशामुळे?

१) जीएसटी संकलन: सरलेल्या डिसेंबरमध्ये वस्तू आणि सेवाकर (जीएसटी) संकलन ७.३ टक्क्यांनी वाढून १.७७ लाख कोटी रुपयांवर पोहोचले.

२) निर्मिती क्षेत्राचा वेग: डिसेंबरमध्ये निर्मिती क्षेत्राच्या सक्रियतेचा वेग ५६.४ गुणांवर नोंदवला गेला, जो १२ महिन्यांतील नीचांकी पातळीवर घसरला असला तरी ५४.१ या दीर्घकालीन सरासरी पातळीवर, तसेच रोजगारवाढीचा मजबूत दर उत्साहवर्धक.

३) कमाईचा आशावाद: वाहन निर्मिती क्षेत्र आणि वित्तीय सेवा या प्रमुख क्षेत्रांमधील कंपन्यांच्या वाढलेल्या व्यवसायाने तिसऱ्या तिमाहीतील कमाईच्या अपेक्षांमध्ये वाढ.

४) आयटी क्षेत्राला चालना : स्थिर मागणी तसेच डॉलरच्या तुलनेत रुपयातील घसरण आयटी कंपन्यांच्या पथ्यावर पडण्याची आणि डिसेंबर तिमाहीत त्यांची आर्थिक कामगिरी दमदार राहण्याची आशा.

हेही वाचा : निर्मिती क्षेत्राच्या वाढीचा दर १२ महिन्यांच्या तळाला, डिसेंबर २०२४ मध्ये ५६.४ गुणांकाची नोंद

गुंतवणूकदार ८.५२ लाख कोटींनी श्रीमंत

बाजारातील सलग तेजीच्या दोन दिवसांत गुंतवणूकदारांच्या संपत्तीमध्ये ८.५२ लाख कोटी रुपयांची भर पडली आहे. दोन सत्रात सेन्सेक्स आणि निफ्टी सुमारे २ टक्क्यांहून अधिक वधारले. परिणामी मुंबई शेअर बाजारात सूचिबद्ध कंपन्यांचे बाजार भांडवल ८.५२ लाख कोटी रुपयांनी वधारून ४५०.४७ लाख कोटी रुपयांवर (५.२५ ट्रिलियन डॉलर) पोहोचले आहे.

सेन्सेक्स ७९,९४३.७१ १,४३६.३० ( १.८३%)

निफ्टी २४,१८८.६५ ४४५.७५ ( १.८८%)

डॉलर ८५.७३ ९ पैसे

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तेल ७५.४७ १.०९