देशातील दिग्गज आयटी कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) सध्या एका विचित्र समस्येचा सामना करीत आहे. कंपनीतील महिला कर्मचारी मोठ्या प्रमाणात राजीनामे देत आहेत. टीसीएस ही कंपनी महिलांना जास्त प्रमाणात नोकरीत सामावून घेण्यासाठी ओळखली जाते. नोकऱ्यांमध्ये कंपनी पुरुषांच्या तुलनेत महिलांना जास्त प्राधान्य देते. TCS च्या एकूण कर्मचाऱ्यांमध्ये महिलांची संख्या ३५ टक्के आहे. त्यामुळेच आता महिलांच्या वेगाने सामूहिकरीत्या राजीनामा देण्याचे एक कारण म्हणजे टीसीएसने वर्क फ्रॉम होम रद्द करणे हे असल्याचंही कंपनीकडून सांगितलं जात आहे.

घरून काम करणे संपवल्यानंतर महिला कर्मचाऱ्यांकडून अधिक राजीनामे दिले जात आहेत, असंही टीसीएसच्या एचआर विभागाचे प्रमुख मिलिंद लक्कड सांगतात. तसेच यामागे इतरही कारणे असू शकतात, पण हेच मुख्य कारण असल्याचे लक्कड यांचं म्हणणं आहे. तसेच महिला कर्मचाऱ्यांच्या राजीनाम्यामागे भेदभाव करण्यासारखे कोणतेही कारण नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. खरं तर TCS मध्ये महिलांचा राजीनामा देण्याचं प्रमाण पुरुषांच्या तुलनेत एरव्ही कमी असते. पण आता त्या पुरुषांपेक्षा जास्त पटीने राजीनामे देत आहेत.

कर्मचाऱ्यांना कार्यालयात यायचे नाही

कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर वर्क फ्रॉम होम सुविधेमुळे महिलांना काम करणे अधिक सोपे झाले आहे. घरातील जबाबदारी सांभाळून महिला आता काम करीत आहेत. परंतु आता ही सुविधा बंद झाल्याने अनेक महिलांना पुन्हा कामावर येण्यास अडचणी येत आहेत. त्यामुळेच त्या राजीनामा देत आहेत. TCS मध्ये ६,००,००० पेक्षा जास्त लोक काम करतात. यापैकी ३५ टक्के महिला आहेत. आर्थिक वर्ष २०२३ मध्ये कंपनीने नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांपैकी ३८.१ टक्के महिला होत्या. आर्थिक वर्ष २०२३ मध्ये नेतृत्वाची जवळपास एक चतुर्थांश पदेदेखील महिलांकडे होती. विशेष म्हणजे गेल्या आर्थिक वर्षाच्या मध्यात टीसीएस कर्मचार्‍यांचा अट्रिशन रेट २० टक्क्यांहून अधिक झाला होता.

हेही वाचाः ‘या’ बँकेच्या ग्राहकांना आता इंटरनेटशिवाय UPI व्यवहार करता येणार; UPI123PAY सेवा लाँच

वर्क फ्रॉम होम करणे केवळ भारतातच नाही तर जगभरात ही सामान्य बाब

कर्मचाऱ्यांना घरून काम करणे खूप आवडू लागले आहे. आता बऱ्याच कंपन्या वर्क फ्रॉम होम बंद करीत आहेत. त्यामुळेच त्या कंपनीत राजीनामे वाढत आहेत. वर्क फ्रॉम होम करणे ही केवळ भारतातच नाही तर जगभरात सामान्य बाब बनली आहे. अमेरिकेतील एका सर्वेक्षणात असे समोर आले आहे की, २५ टक्के कर्मचाऱ्यांनी कधीही कामावर न जाता वर्क फ्रॉम होम करण्याचा निर्णय घेतला आहे.

हेही वाचाः लाखमोलाचा शेअर! ३० वर्षांपूर्वी ११ रुपयांचा शेअर आता झाला १ लाखाचा, हजार रुपये गुंतवणूक करणारे बनले करोडपती

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.