मुंबई : दूरसंचार क्षेत्रातील आघाडीच्या भारती एअरटेलची उपकंपनी ‘भारती हेक्साकॉम’च्या समभागांनी शुक्रवारी शेअर बाजारात पदार्पणालाच दमदार ४३ टक्क्य़ांच्या अधिमूल्यासह मुसंडी मारली. आर्थिक वर्षात भांडवली बाजारात सूचिबद्ध होणारी पहिलीच कंपनी असल्याने तिच्या बाजार पदार्पणाकडे गुंतवणूकदारांचे लक्ष लागले होते.

‘भारती हेक्साकॉम’चे समभाग गुंतवणूकदारांना प्रारंभिक समभाग विक्रीच्या माध्यमातून प्रत्येकी ५७० रुपये किमतीला वितरित केले गेले. त्या बदल्यात शुक्रवारी बीएसईवर हा समभाग ३२ टक्के अधिमूल्यासह ७५५ रुपयांवर सूचिबद्ध झाला आणि ८८० रुपयांचा उच्चांकही त्याने अल्पावधीत दाखविला. ‘भारती हेक्सा’ने समभाग विक्रीतून १,९२४ कोटी रुपयांचे भांडवल एप्रिलच्या प्रारंभी योजलेल्या प्रारंभिक भागविक्रीतून उभारले. शुक्रवारी बाजाराचे व्यवहार थंडावले तेव्हा ‘भारती हेक्साकॉम’चा समभाग बीएसईवर ४२.७६ टक्क्यांनी म्हणजेच २४३.७५ रुपयांनी वधारून ८१३.७५ रुपयांवर स्थिरावला होता.

हेही वाचा >>>मारुती सुझुकीकडून निवडक वाहनांच्या किमतीत वाढ

कंपनीची प्रारंभिक समभाग विक्री ३ ते ५ एप्रिलदरम्यान खुली होती आणि त्यासाठी कंपनीने ५४२ रुपये ते ५७० रुपयांचा किंमतपट्टा निश्चित केला होता. भारती हेक्साकॉम मुख्यत: राजस्थान आणि ईशान्य भारतात दूरसंचार मंडळांमधील ग्राहकांना मोबाइल सेवा, फिक्स्ड-लाइन टेलिफोन आणि ब्रॉडबँड सेवा पुरवते. कंपनीने आर्थिक वर्ष २०२३ मध्ये ५४९.२ कोटी रुपयांचा निव्वळ नफा मिळवला होता. त्याआधीच्या वर्षात कंपनीने १,९५१.१ कोटी रुपयांचा नफा नोंदवला होता.