मुंबई: जागतिक बाजारपेठेतील मजबूत कल आणि त्याला अनुसरून धातू, वस्तू आणि वाहन क्षेत्रातील समभागांमध्ये झालेल्या खरेदीमुळे भांडवली बाजाराचा सप्ताहारंभ सकारात्मक राहिला. गुंतवणूकदारांच्या खरेदीला अनुकूल मूड पालटल्याने सोमवारी सेन्सेक्स ४१९ अंशांनी वधारून, ८१,००० च्या पातळीवर बंद झाला. अलीकडच्या दिवसांमधील भीतीदायी घसरणीनंतर गुंतवणूकदारांना हा मोठा दिलासाच आहे.
गत सप्ताहातील सलग दोन दिवसांची घसरण मोडून काढत, सेन्सेक्स ४१८.८१ अंशांनी (०.५२ टक्के) वाढून ८१,०१८.७२ पातळीवर दिवसअखेरीस स्थिरावला. बाजारात खरेदीचा जोरदार बहर होता, याचा प्रत्यय म्हणजे सेन्सेक्समधील ३० पैकी २६ समभाग वधारले आणि केवळ चार घसरणीत राहिले. दिवसभरात, सेन्सेक्स ४९३.२८ अंशांनी उसळला होता आणि दिवसअखेर त्यांनी उच्चांकी पातळीनजीकच विश्राम घेतल्याचे दिसून आले. दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी १५७.४० अंशांनी ०.६४ टक्के वधारून २४,७२२.७५ वर बंद झाला. या निर्देशांकानेही सत्रांतर्गत १६९.३ अंशांचा उच्चांक गाठणारी कमाई, सत्राच्या समाप्तीपर्यंत जवळपास टिकवून ठेवली.
विशेषतः देशांतर्गत वित्तीय संस्था आणि म्युच्युअल फंडांकडून सुरू राहिलेल्या खरेदीने व्यापक बाजारात सकारात्मक भावना टिकून राहिल्या. सेन्सेक्स-निफ्टी या प्रमुख निर्देशांकांच्या तुलनेत व्यापक बाजाराचे प्रतिनिधित्व करणाऱ्या मिडकॅप आणि स्मॉलकॅप या दोन्ही निर्देशांक एकेसमयी जवळपास प्रत्येकी दीड टक्क्यांनी झेपावले होते. बाजार बंद होताना, बीएसई स्मॉलकॅप निर्देशांक ०.७६ टक्के आणि मिडकॅप निर्देशांक १.११ टक्क्यांच्या वाढीसह बंद झाला. सेन्सेक्स निर्धारीत करणाऱ्या कंपन्यांमध्ये टाटा स्टील ४.३१ टक्क्यांनी वधारला आणि वधारलेल्या प्रमुख समभागांमध्ये तोच आघाडीवर होता. बरोबरीने, बीईएल, अदानी पोर्ट्स, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, टेक महिंद्र, भारती एअरटेल, एचसीएल टेक्नॉलॉजीज, ट्रेंट, महिंद्र अँड महिंद्र, रिलायन्स इंडस्ट्रीज, अल्ट्राटेक सिमेंट आणि लार्सन अँड टुब्रो हे प्रमुख वाढ साधलेले शेअर्स होते.
निर्देशांकाची कमाई कशामुळे?
मजबूत मासिक वाहन विक्री आणि आघाडीच्या वाहन उत्पादकांच्या उत्साहवर्धक तिमाही निकालांमुळे या क्षेत्राबाबत गुंतवणूकदारांमध्ये आस्था आणि खरेदीचा रस पुन्हा निर्माण झाल्याचे आढळून आले. दरम्यान, अमेरिकेत वाढती बेरोजगारी आणि मंदावलेली रोजगार निर्मिती यामुळे तेथील मध्यवर्ती बँक ‘फेड’कडून संभाव्य व्याजदर कपातीची अपेक्षा वाढली आहे, असे सोमवारच्या मूडपालटाची जिओजित इन्व्हेस्टमेंट्सचे संशोधन प्रमुख विनोद नायर यांनी कारणे नमूद केली.
परकीय गुंतवणूकदारांची पाठ कायम
एक्सचेंज कडून उपलब्ध माहितीनुसार, शुक्रवारी परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (एफआयआय) ३,३६६.४० कोटी रुपयांचे शेअर्स विकले होते. परिणामी एनएसई निफ्टी २०३ अंकांनी घसरून २४,५६५.३५ वर बंद झाला होता. सोमवारच्या सत्रात त्यांना मोठ्या प्रमाणावर विक्री करून बाहेर पडणे पसंत केले. परिणामी सोमवारी भारतीय चलन रुपया ५२ पैशांनी घसरून प्रति डॉलर ८७.७० तळाला बंद झाला. कारण परदेशी गुंतवणुकीने सततचा बाहेर रस्ता धरल्याने आणि अमेरिकी व्यापार शुल्काच्या अर्थव्यवस्थेवरील परिणामांच्या अनिश्चिततेचा गुंतवणूकदारांच्या भावनांवर परिणाम झाला आहे. परिणामी नव्याने खरेदीकडे त्यांनी पाठ केल्याने चैतन्यहीन बाजारात झालेली ती सलग दुसरी घसरण होती.