मुंबई: राज्य सहकारी बँकेचे प्रशासक आणि ज्येष्ठ बँकिंग तज्ज्ञ विद्याधर अनास्कर यांनी लिहिलेल्या ‘गोष्ट रिझर्व्ह बँकेची’ या पुस्तकाचे प्रकाशन सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे हस्ते झाले.
विधानभवनातील मंत्रिमंडळ सभागृहात आंतरराष्ट्रीय सहकार वर्षानिमित्त आयोजित बैठकीपूर्वी झालेल्या या प्रकाशनाप्रसंगी राज्याचे सहकारमंत्री बाबासाहेब पाटील, कृषीमंत्री माणिकराव कोकाटे, अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ, गृहनिर्माणमंत्री अतुल सावे, पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे, मत्स्य व बंदरे विकासमंत्री नितेश राणे, सहकार राज्यमंत्री पंकज भोयर तसेच राज्याचे मुख्य सचिव राजेशकुमार उपस्थित होते.
वर्ष १७७३ पासून रिझर्व्ह बँकेचा इतिहास गोष्टरूपाने विशद केलेले हे भारतातील पहिले पुस्तक ठरावे. यामध्ये सर वॉरेन हेस्टिंग्स यांच्या काळापासून मध्यवर्ती बँकेची संकल्पना, त्या नंतरचा प्रवास, रिझर्व्ह बँकेचे नामकरण आणि बोधचिन्ह इत्यादीपासून १९८२ सालापर्यंतचा इतिहास अत्यंत रोचक शब्दात मांडण्यात आला आहे. ‘लोकसत्ता-अर्थवृत्तान्त’मध्ये प्रसिद्ध झालेल्या लेखमालेचे हे पुस्तक म्हणजे ५१ प्रकरणांतील विस्तारीत रूप आहे. पुस्तकास ज्येष्ठ अर्थतज्ञ डॉ. नरेंद्र जाधव यांची प्रस्तावना लाभली असून, पुणे येथील राजहंस प्रकाशनाने ते प्रकाशित केले आहे.