Sridhar Vembu on Gold Rates: जगभरासह भारतात सोन्याच्या दरात मोठी वाढ होत चालली आहे. धनत्रयोदशीला सोन्याच्या दरात काहीशी घसरण झाली असली तरी जागतिक पातळीवर गेल्या काही काळापासून मौल्यवान धातू असलेल्या सोन्याच्या दरात चढता क्रम पाहायला मिळाला. सोन्याचे दर वाढत असताना झोहो कॉर्पोरेशनचे सह-संस्थापक आणि सीईओ श्रीधर वेम्बू यांनी एक इशारा दिला आहे. सोन्याच्या किमतीत होणारी सततची वाढ आर्थिक समृद्धीपेक्षा जागतिक वित्तीय व्यवस्थेमधील तणावाचे संकेत असल्याचे ते म्हणाले आहेत.
द इकॉनॉमिस्टमध्ये छापून आलेल्या आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या उपव्यवस्थापकीय संचालक डॉ. गीता गोपीनाथ यांच्या लेखावर प्रतिक्रिया देत असताना वेम्बू यांनी आपले मत व्यक्त केले आहे. अमेरिकन इक्विटीज धोक्याच्या पातळीवर पोहोचल्या आहेत. अमेरिकन शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक झाली आहे. त्यामुळे अमेरिकन शेअर बाजार घसरला तर फार मोठे नुकसान होऊ शकते, असे मत गीता गोपीनाथ यांनी व्यक्त केले होते. या मताचे वेम्बू यांनी समर्थन केले.
श्रीधर वेम्बू म्हणाले, मी डॉ. गीता गोपीनाथ यांच्याशी सहमत आहे. अमेरिकन शेअर बाजारात स्पष्टपणे मोठे बुडबुडे दिसत आहेत. जर अमेरिकन बाजार घसरला तर तर २००८-०९ च्या जागतिक आर्थिक संकटासारखी घटना पुन्हा होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
सोने गुंतवणूक नाही तर विमा
वेम्बू पुढे म्हणाले, सोन्याच्या वाढत्या दरातून आपल्याला धोक्याचा इशारा मिळत आहे. सोन्याकडे गुंतवणूक म्हणून न पाहता आर्थिक जोखमीच्या काळातील विमा म्हणून पाहिले गेले पाहिजे. जेव्हा अर्थव्यवस्था किंवा शेअर बाजार धोक्यात असतात तेव्हा लोक सोन्यामुळे सुरक्षित राहू शकतात. अर्थव्यवस्था टिकून राहण्यासाठी विश्वास खूप महत्त्वाचा असतो. पण जेव्हा कर्जाची पातळी खूप वाढते, तेव्हा विश्वास तुटू लागतो.
जागतिक पातळीवर बाजारपेठेचे मूल्यांकन आणि कर्ज वाढत असताना श्रीधर वेम्बू यांची ही टिप्पणी समोर आली आहे. अर्थतज्ज्ञांनी हे अनेकदा लक्षात आणून दिले आहे की, सोन्याच्या वाढत्या किंमती या आत्मविश्वासापेक्षा भीतीचे प्रतिबिंब दाखवतात.
तेव्हा सोन्याचा दर वाढतो…
गुंतवणुकदारांचा वित्तीय बाजारावरचा विश्वास उडतो किंवा चलनवाढ, मंदी आणि बँकिंग अस्थिरतेची अपेक्षा असते तेव्हा सोन्याचे दर वाढतात, असे अर्थतज्ज्ञांचे म्हणणे आहे. स्टॉक किंवा बाँड्ससारख्या कागदी मालमत्ता धोकादायक स्थितीत पोहोचतात, तेव्हा सोने मूल्य जपून ठेवणारी सुरक्षित मालमत्ता म्हणून काम करते.

इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, सोन्याच्या किमतीत सतत होणारी वाढ ही बहुतेकदा व्यापक अर्थव्यवस्थेवरील विश्वासाचा अभाव दर्शवते. गुंतवणुकदार व्यवसाय किंवा इक्विटीमध्ये गुंतवणूक करण्याऐवजी सोन्याकडे वळतात, तेव्हा ते आशावादापेक्षा सावधगिरी आणि भीतीचे संकेत देतात. याचसंदर्भात श्रीधर वेम्बू यांनी हा इशारा दिला आहे. सोन्याच्या दरातील सध्याची वाढ ही केवळ बाजारातील अस्थिरतेपेक्षा जागतिक वित्तपुरवठ्यावरील विश्वास कमकुवत होत असल्याचे द्योतक आहे, असे ते म्हणाले.