Who is Leena Gandhi Tewari: युएसव्ही कंपनीच्या अध्यक्ष लीना तिवारी सध्या चर्चेत आहेत. मुंबईतील वरळी येथे ६३९ कोटीं रुपयांना डुप्लेक्स फ्लॅट विकत घेतल्यामुळे भारतातील हा सर्वात महागडा फ्लॅट ठरला आहे. लिना तिवारी यांनी फ्लॅट विकत घेतल्यानंतर त्यासाठी ६३.९ कोटींची स्टॅम्प ड्युटी भरली आहे. त्यामुळे फ्लॅटची एकूण किंमत ७०३ कोटींवर पोहोचली. इतका महाग फ्लॅट विकत घेणाऱ्या लीना तिवारी कोण आहेत, त्या कोणता व्यवसाय करतात? हे जाणून घेण्याची अनेकांना उत्सुकता लागली आहे.

कोण आहेत लीना तिवारी?

लीना तिवारी या युएसव्ही या औषध निर्माता कंपनीच्या अध्यक्ष आहेत. युएसव्हीमार्फत ग्लायकोमेट, इकोस्प्रिन आणि रोझडे अशी मधुमेह आणि हृदयरोगाशी निगडित औषधे उत्पादित केली जातात. सामाजिक जीवनात अतिशय साधेपणाने वावरणाऱ्या लीना तिवारी या औषध निर्मिती क्षेत्रातील अब्जाधीश आहेत. मुंबईतील वरळी येथे सीफेस असेलल्या इमारतीत भारतातील सर्वात महागडी मालमत्ता खरेदी केल्याप्रकरणी आता त्यांचे नाव चर्चेत आहे.

इकॉनॉमिक टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, लीना तिवारी या नीता अंबानी यांच्या जवळच्या मैत्रिणींपैकी एक आहेत. त्यांचे पती आणि युएसव्ही कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक प्रशांत तिवारी हेदेखील त्यांच्यासारखेच शांत, संयमी वृत्तीचे असल्याचे सांगितले जाते. दूरदृष्टी ठेवत उद्योगाचे धोरण आखणारे व्यावसायिक अशी त्यांची ओळख आहे. फोर्ब्स यादीतून मिळालेल्या माहितीनुसार लिना तिवारी यांची एकूण संप्पती ३.९ अब्ज डॉलर्स इतकी असून त्या भारतातील सर्वाधिक श्रीमंत महिलांपैकी एक असल्याचे सांगितले जाते.

USV प्रायव्हेट लिमिटेड ही मुंबईस्थित एक बहुराष्ट्रीय कंपनी आहे. कंपनीची स्थापना विठ्ठल बाळकृष्ण गांधी यांनी केली होती. Tracxn च्या आकडेवारीनुसार, आर्थिक वर्ष २०२४ मध्ये कंपनीला ४,८४० कोटींचा महसूल मिळाला होता. युएसव्हीमधील एका माजी अधिकाऱ्याने इकॉनॉमिक टाइम्सशी बोलताना सांगितले की, लीना तिवारी यांच्याकडे १० ते १२ जमांची कोअर टीम आहे. जी युएसव्हीच्या एकूण कारभारावर देखरेख करते. तिवारी या वेळेला अतिशय महत्त्व देतात, तसेच त्या प्रसिद्धीपासून दूर राहण्याचा प्रयत्न करतात.

युएसव्ही ब्रँडचे मधुमेहावरील औषध ग्लायकोमेट याची भारतीय बाजारपेठेतील मागच्या १२ महिन्यातील विक्री ८०६ कोटी रुपये असून या प्रकारातील हे दुसऱ्या क्रमांकांचे औषध आहे. पहिल्या क्रमाकांवर जीएसकेच्या औषध असून त्याची विक्री ८२० कोटी रुपयांच्या घरात आहे. रक्त पातळ करणाऱ्या इकोस्प्रिन या युएसव्हीच्या औषधालाही चांगली मागणी आहे. तर हृदयरोगामध्ये कोलेस्टेरॉलची पातळी करणाऱ्या रोझडे हे औषध लोकप्रिय आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वरळीतील डुप्लेक्स अपार्टमेंट खास का आहे?

लिना तिवारी यांनी वरळी येथे विकत घेतलेला डुप्लेक्स फ्लॅड वरळी सी फेसवरील Naman Xana या ४० मजली इमारातीत आहेत. एकूण २२,५७२ चौरस फूट क्षेत्रफळ असलेल्या या घराची प्रती चौरस फूट किंमत २.८३ लाख इतकी आहे. अरबी समुद्राचे मनमोहक दृश्य, वांद्रे आणि नरिमन पॉइंटला जाण्यासाठी असलेली कनेक्टिव्हीटी यामुळे वरळीतील रिअल इस्टेटच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत.