scorecardresearch

लोकप्रतिनिधींनाच ‘सेल्फीज्ञान’ देण्याची गरज

दुष्काळावरदेखील इतकी चर्चा झाली नसेल तितकी चर्चा पंकजा मुंडे यांनी काढलेल्या सेल्फीवर होत आहे.

सेल्फी काढताना तारतम्य बाळगा, असे नियम जनतेला लागू असताना लोकप्रतिनिधी मात्र संवेदनशीलता गहाण ठेवून सर्रास सेल्फी काढत सुटले आहेत. दुष्काळी भागात जनतेचे प्रश्न सोडविण्याऐवजी ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांना सेल्फी काढण्याचा मोह कसा होऊ शकतो, हा प्रश्न विद्यार्थ्यांकडून विचारला जात आहे. त्यामुळे जनतेपेक्षा लोकप्रतिनिधींनाच ‘सेल्फीज्ञान’ देण्याची जास्त गरज असल्याचे विद्याथ्यांचे मत आहे.

दुष्काळावरदेखील इतकी चर्चा झाली नसेल तितकी चर्चा पंकजा मुंडे यांनी काढलेल्या सेल्फीवर होत आहे. दुष्काळासारखा गंभीर प्रश्न गेली कित्येक वर्षे महाराष्ट्राला भेडसावत आहे. लातूर या दुष्काळी भागामध्ये जलयुक्त शिवाराचे काम पाहण्यासाठी गेलेल्या पंकजा मुंडे सेल्फी काढतात. त्यांना दुष्काळाचे गांभीर्य असते तर त्यांनी सेल्फी काढला नसता असे मला वाटते. ‘यथा राजा तथा प्रजा’ या उक्तीचा यांना विसर पडलेला दिसतो. लोकप्रतिनिधीच जर असे वागत असतील तर जनतेने काय आदर्श घ्यावा? सामाजिक जबाबदारीचे भान न ठेवता ही नेते मंडळी असंवेदनशीलतेने वागत आहेत. दुष्काळग्रस्त भागामध्ये जाऊन तेथील जनतेच्या व्यथा पाहताना पंकजा मुंडे यांना सेल्फी काढावे असे वाटणे म्हणजे असंवेदनशीलतेचे लक्षण आहे. दुष्काळ दौऱ्याऐवजी आपण सहलीस गेलो आहोत असे त्यांना वाटले असावे. मात्र विरोधकांनी याचा गाजावाजा करण्यात वेळ न घालवता विकासात्मक काम करावे.
मानसी जंगम, जोशी-बेडेकर महाविद्यालय

सध्या आपल्या देशात सेल्फीवरून बराच वाद सुरू आहे. तंत्रज्ञानाच्या उगमामुळे माणसाचे जीवन सुखकर झाले असले तरी त्याचा अतिरेक टाळणे केव्हाही हिताचे आहे. पंकजा मुंडे यांनी लातूर या दुष्काळी भागातील मांजरा नदीच्या पात्रात उतरून सेल्फी काढला. या घटनेवरून पंकजा मुंडे यांनी लोकांचे टीकास्त्र सहन करावे लागत आहे आणि ते योग्यच आहे. जनतेला ‘सेल्फीज्ञान’ द्यायचे मात्र मंत्र्यांनी जागेचे आणि परिस्थितीचे तारतम्य न बाळगता कुठेही सेल्फी काढणे चुकीचे आहे. आजची तरुणाई तर सेल्फीला बळी पडलेली आहे. आपण कसे दिसतो हे पाहण्यासाठी आणि बऱ्याचदा सोशल मीडियावर इतरांना दाखविण्यासाठी लोक आनंदाने सेल्फी काढत सुटले आहेत. काही दिवसांपूर्वी मृतदेहासोबत एका तरुणाने काढलेला सेल्फी सोशल मीडियावर प्रसिद्ध झाला होता. मात्र तरुणाईप्रमाणे आपल्या मंत्र्यांनांही सेल्फीज्ञान देण्याची गरज निर्माण झाली आहे.
प्रश्रब्धी जाधव, मुंबई विद्यापीठ

दुष्काळी भागात परिस्थिती अतिशय बिकट असून येथील नागरिकांना पाणी आणण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. दुष्काळ दौऱ्यावर गेले असताना पंकजा मुंडे यांना सेल्फी काढण्याचा मोह कसा होऊ शकतो? घरात दु:खाचे सावट असताना आनंदाने सेल्फी कसा काढला जाऊ शकतो. खरचं आपल्या लोकप्रतिनिधींना जनतेविषयी, त्यांच्या समस्यांविषयी जाणीव आहे की नाही? प्रभावी भाषणे देऊन राज्याचे भविष्य सुधारणार नाही यासाठी संवेदनशीलता असणे गरजेचे आहे. जे आपल्या मंत्र्यांकडे नाही. लोकांना जागृतीचे धडे शिकविणाऱ्या लोकप्रतिनिधींच्या अपूऱ्या ज्ञानाची प्रचिती अशाच घटनांमधून जनतेच्या समोर येत असते.
वैभव जुंद्रे, गुरुनानक महाविद्यालय

पंकजा मुंडे या नेहमीच विविध कारणांवरुन वादग्रस्त राहिल्या आहेत. मात्र जनतेकडून आणि विरोधी पक्षांच्या नेत्यांकडून टीका होत असतानाही त्या जबाबदारीने वागत नसल्याचे समोर आले आहे. दुष्काळी भागातील कामाची चाचपणी आणि प्रश्नांची उत्तरे शोधण्यापेक्षा पंकजा मुंडे यांना सेल्फी काढण्यात जास्त रस होता. यापूर्वी विलासराव देशमुख हे २६/११च्या हल्लानंतर घटनास्थळी छायाचित्र काढल्यामुळे वादाच्या भोवऱ्यात अडकले होते. जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी त्यांच्याविषयी संवेदनशीलता असणे गरजेचे आहे जे आजच्या लोकप्रतिनिधींमध्ये दिसत नाही. भाषणे देऊन आणि आव आणून नेतेपद मिळत नाही तर त्यासाठी जनतेसाठी झटण्याची तयारी असायला हवी हे पंकजा मुंडे विसरल्या आहेत.
पुजा बांगर, कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय

मराठीतील सर्व कॅम्पसकट्टा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 21-04-2016 at 03:05 IST

संबंधित बातम्या