विद्यापीठ विश्व : प्रथमेश आडविलकर

कोरिया अ‍ॅडव्हान्स्ड इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्स अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजी, दक्षिण कोरिया.:- विद्यापीठाची ओळख : दक्षिण कोरियामधील ‘कोरिया अ‍ॅडव्हान्स्ड इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्स अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजी’ (केएआयएसटी) हे आशियातील एक प्रमुख विद्यापीठ आहे. देजाऊ शहरामध्ये स्थित असलेले हे जागतिक दर्जाचे विद्यापीठ क्यूएस वर्ल्ड युनिव्हर्सटिी रँकिंगनुसार जगातले चाळिसाव्या क्रमांकाचे तर दक्षिण कोरियामधील प्रथम क्रमांकाचे विद्यापीठ आहे. या विद्यापीठाची स्थापना १९७१ मध्ये झाली. हे शासकीय संशोधन विद्यापीठ असून ते साडेतीनशे एकरच्या कॅम्पसमध्ये पसरलेले आहे. विद्यापीठामध्ये सहाशेहून अधिक प्राध्यापक-संशोधक आहेत तर जवळपास दहा हजार पदवी व पदव्युत्तर विद्यार्थी येथे त्यांचे शिक्षण पूर्ण करत आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर सर्वात अभिनव विद्यापीठांच्या यादीमध्ये केएआयएसटी विद्यापीठाची सहाव्या ते सातव्या क्रमांकाचे विद्यापीठ म्हणून गणना केली जाते. तसेच अगदी अलीकडे स्थापन झालेल्या जागतिक विद्यापीठांपकी सर्वाधिक अभिनव हे विद्यापीठ आहे.

अभ्यासक्रम : या विद्यापीठामध्ये एकूण सहा कॉलेजेस, दोन स्कूल्स आणि तेहतीस विभाग आहेत. विद्यापीठातील पदवी अभ्यासक्रम तीन ते चार वर्षांचे असून पदव्युत्तर अभ्यासक्रम हे दोन, तीन वा चार वर्षांच्या कालावधीचे आहेत. पदवी अभ्यासक्रमास प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना चार वर्षांमध्ये एकूण १३० क्रेडिट्स पूर्ण करावयाचे आहेत. विद्यापीठामध्ये एकूण सहा प्रमुख विभाग (कॉलेजेस) कार्यरत आहेत. यामध्ये नैसर्गिक विज्ञान, अभियांत्रिकी, जैवविज्ञान, व्यापार, लिबरल आर्ट्स अ‍ॅण्ड कन्व्‍‌र्हजस, ट्रान्सडिसिप्लीनरी स्टडीज या विभागांचा समावेश आहे. विद्यापीठाची पदवी, पदव्युत्तर आणि पीएचडी अभ्यासक्रमांना आवश्यक असलेली प्रवेशाची प्रक्रिया अत्यंत सुलभ आहे.

सुविधा : केएआयएसटीने आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना विद्यापीठाच्या परिसरात खात्रीशीर निवासाची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. विद्यापीठामध्ये विद्यार्थ्यांसाठी एकूण २२ वसतिगृहे आहेत, तर विवाहित विद्यार्थ्यांसाठी अपार्टमेंटमध्ये कुटुंबासमवेत स्वतंत्र राहण्याची सोयही केलेली आहे. या विद्यापीठामध्ये आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती,पाठय़वृत्ती, शैक्षणिक शुल्कामधील सवलत, अल्प कालावधीचे कर्ज, विद्यापीठ परिसरातील नोकऱ्या, कमवा आणि शिका कार्यक्रम, विद्यार्थी आदानप्रदान कार्यक्रम इत्यादी विविध माध्यमांतून आíथक मदत करण्याचा प्रयत्न करत आहे. यांमधील बहुतांश सुविधा विद्यापीठाने शैक्षणिक गुणवत्तेनुसार दिलेल्या आहेत. विद्यापीठातील पदव्युत्तर अभ्यासक्रमास प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांपकी बहुतांश विद्यार्थ्यांना विद्यापीठाकडून शिष्यवृत्ती दिली जाते. याशिवाय शिक्षणासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना (वैयक्तिक व कुटुंब असेल तर कुटुंबासहित) हेल्थ इन्शुरन्स, आवश्यक लसीकरण व नियमित आरोग्य तपासणीचा लाभ घेता येतो. विद्यार्थी एकमेकांच्या सहकार्याने विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करतात. त्यांना खेळाच्या उत्तम सुविधा, विद्यार्थ्यांना विविध उपक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी स्टुडंट क्लब्स, विद्यार्थ्यांच्या समस्यांमध्ये लक्ष घालण्यासाठी ग्रॅज्युएट स्टुडंट असोसिएशन्स यांसारखे पाठबळ विद्यापीठाकडून दिले गेलेले आहे.

वैशिष्टय़ : केएआयएसटी आपल्या अभिनव संशोधनासाठी जगभर ज्ञात आहे. विद्यापीठाने डय़ुएल डिग्री कार्यक्रमांसाठी अनेक आंतरराष्ट्रीय संशोधन संस्था व विद्यापीठांबरोबर स्वत:ला संलग्न केलेले आहे. आशिया खंडामधील चौथ्या क्रमांकाच्या असलेल्या या विद्यापीठाचे जवळपास सर्वच विभाग क्यूएस युनिव्हर्सटिी सब्जेक्ट रँकिंगनुसार जगातल्या पहिल्या पन्नास विभागांमध्ये राहिले आहेत. पन्नास वर्षांपेक्षा किमान वय असलेल्या विद्यापीठांमध्ये, २०१५ साली टाइम्स हायर एज्युकेशनच्या यादीमध्ये केएआयएसटी विद्यापीठाने जगात तिसरा क्रमांक पटकावला होता.

केएआयएसटी विद्यापीठ संशोधनासाठी उत्कृष्ट वातावरण प्रदान करते. गेली तीन वष्रे मी येथे माझे पदवीचे शिक्षण घेत आहे. विद्यापीठामधील प्रवेश स्पर्धात्मक आहेत. आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांनी येथील विद्यार्थी आदानप्रदान कार्यक्रमाच्या माध्यमातून जरूर प्रवेश घ्यावा असे मी सुचवीन. संशोधन अभ्यासक्रम असल्याने पदवी अभ्यासक्रमादरम्यान आतापर्यंत अभ्यासलेल्या सर्व विषयांमध्ये प्रचंड स्पर्धात्मकता होती. प्राध्यापकांनी दिलेला अगदी साधा गृहपाठदेखील अचूकता व उत्कृष्टतेने (Accuracy and Precision) करावा लागतो. यावरून संस्थेतील संशोधनावर प्राध्यापक-संशोधकांकडून घेतली जाणारी मेहनत लक्षात येते.

– अभिषेक कुमार, औद्योगिक अभियांत्रिकीचा विद्यार्थी – itsprathamesh@gmail.com

संकेतस्थळ :    http://www.kaist.edu/html/en/