श्रीकांत जाधव

या पेपरचे शीर्षक ‘भारतीय वारसा आणि संस्कृती व इतिहास, जगाचा भूगोल आणि समाज’ असे आहे. याअंतर्गत अभ्यास कराव्या लागणाऱ्या घटकांची यादीही देण्यात आलेली आहे.  या पेपरचे नेमके स्वरूप काय आहे, हे प्रस्तुत लेखामध्ये थोडक्यात समजून घेणार आहोत. २०१३ मध्ये यूपीएससी मुख्य परीक्षेच्या सामान्य अध्ययन अभ्यासक्रमात बदल करण्यात आलेला होता. यानुसार पेपर पहिला हा २५० गुणांसाठी आहे. २०१३ व २०१४ मधील परीक्षेत प्रत्येक वर्षी  २५ प्रश्न विचारण्यात आलेले होते. २०१५ पासून यामध्ये २० प्रश्न विचारण्यात येतात. २०१७ पासून प्रश्न क्रमांक १ ते १० हे प्रत्येकी १० गुणांसाठी असतात आणि या प्रत्येक प्रश्नाच्या उत्तरासाठी १५० शब्दांची मर्यादा असते. तसेच प्रश्न क्रमांक ११ ते २० हे प्रत्येकी १५ गुणांसाठी असतात व प्रत्येक प्रश्नाच्या उत्तरासाठी २५० शब्दांची मर्यादा असते.

भारतीय वारसा आणि संस्कृती व इतिहास

यामध्ये भारतीय वारसा आणि संस्कृतीचा अभ्यास प्राचीन कालखंडापासून ते आधुनिक कालखंडापर्यंत करावा लागतो आणि इतिहासाच्या अंतर्गत आधुनिक भारताचा अभ्यास १८ व्या शतकाच्या मध्यापासून ते सद्य:स्थितीपर्यंत करावा लागतो. तसेच आधुनिक जगाच्या इतिहासाचा अभ्यास १८ व्या शतकाच्या मध्यापासून ते साधारणत: १९९१ पर्यंत म्हणजेच यूएसएसआरचे (वररफ म्हणजे पूर्वाश्रमीचा सोव्हिएत रशिया) विघटन तसेच पूर्व आणि पश्चिम जर्मनीचे एकत्रीकरणपर्यंत करावा लागतो.

भारतीय वारसा आणि संस्कृती यामध्ये प्राचीन भारत ते आधुनिक भारत या कालखंडातील भारतातील विविध स्थापत्यकला, शिल्पकला, चित्रकला, संगीत, नृत्य व नाटय़, साहित्य, हस्तकला, सण व उत्सव इत्यादीशी संबंधित प्रश्न विचारले जातात. या घटकाची तयारी करताना या विविध कलांचा झालेला उगम, साहित्य इत्यादी सर्वागीण पद्धतीने अभ्यासावे लागते. या सर्व कला, साहित्य, सण व उत्सव, हस्तकला यांची पाश्र्वभूमी ही प्राचीन कालखंडापासून अभ्यासावी लागते, कारण या कलांची सुरुवातच प्राचीन कालखंडापासून झालेली आहे व उत्तरोत्तर (प्राचीन, मध्ययुगीन आणि आधुनिक कालखंड) यामध्ये मोठय़ा प्रमाणात विकास झालेला पाहावयास मिळतो. तसेच कालखंडनिहाय या विविध कलांमध्ये घडून आलेले बदल, त्यांची वैशिष्टय़े तसेच या विविध कलांद्वारे भारतीयांची सांस्कृतिक उपलब्धी यांसारख्या माहितीचे आकलन करावे लागते तेव्हाच या विषयावर विचारण्यात येणाऱ्या प्रश्नांची उत्तरे लिहिता येऊ शकतात.

आधुनिक भारताच्या इतिहासाचा अभ्यास करताना या घटकाची विभागणी साधारणत: तीन भागांत करता येऊ शकते. १८ व्या शतकाच्या मध्यापासून ते १९४७ पर्यंत म्हणजेच भारताला स्वातंत्र्य मिळेपर्यंत जो भारतीय स्वातंत्र्य चळवळीचा कालखंड आहे आणि स्वातंत्र्योत्तर भारत (१९४७ पासून ते सद्य:स्थितीपर्यंत). यातील स्वातंत्र्यपूर्व भारतावर सर्वाधिक प्रश्न विचारले जातात व हे प्रश्न महत्त्वपूर्ण घडामोडी, घटना, व्यक्ती आणि त्यांचे योगदान या अनुषंगाने शक्यतो विचारले जातात.

आधुनिक जगाचा इतिहास अभ्यासताना याची साधारणत: दोन भागांत विभागणी करता येऊ शकते. १८ व्या शतकाच्या मध्यापासून ते दुसऱ्या जागतिक महायुद्धाच्या समाप्तीपर्यंत म्हणजे १९४५ पर्यंत आणि संयुक्त राष्ट्रसंघाच्या स्थापनेपासून (१९४५) ते १९९१ पर्यंत. यामध्ये मुख्यत्वे युरोप, अमेरिका, आफ्रिका आणि आशिया या खंडांमधील महत्त्वपूर्ण घडामोडी, घटना, व्यक्ती व त्यांचे योगदान यावर प्रश्न विचारले जातात.

समाज

यामध्ये भारतीय विविधतेची आणि समाजव्यवस्थेची महत्त्वाची वैशिष्टय़े, तसेच  महिलांची भूमिका, महिला संघटना, लोकसंख्या व संबंधित मुद्दे, गरिबी आणि विकासात्मक मुद्दे, नागरिकीकरण इत्यादीशी संबंधित समस्या व त्यावरील उपाययोजना. याव्यतिरिक्त सामाजिक सक्षमीकरण, सांप्रदायिकता, प्रादेशिकता आणि धर्मनिरपेक्षता हे महत्त्वाचे मुद्दे आणि जागतिकीकरणाचा भारतीय समाजावर झालेला परिणाम इत्यादी महत्त्वाच्या मुद्दय़ांचा अभ्यास यात करावा लागतो.

या विषयातील काही नमूद मुद्दे निबंध लेखनालाही उपयुक्त ठरतात म्हणून हा विषय सर्वागीण आणि सखोल पद्धतीने अभ्यासल्यास अधिक उपयुक्त ठरू शकतो. या विषयाचे स्वरूप विश्लेषणात्मक असल्यामुळे योग्य आकलन करणे आवश्यक आहे.

 जगाचा भूगोल

यामध्ये प्राकृतिक भूगोलाची वैशिष्टय़े, महत्त्वाच्या भूप्राकृतिक घटना/घडामोडी, भौगोलिक वैशिष्टय़े, वनस्पती आणि त्यांच्या प्रजाती, नैसर्गिक साधनसंपत्तीचे वितरण, जगाच्या विविध प्रदेशांतील प्राथमिक, द्वितीय आणि तृतीय क्षेत्रातील उद्योग स्थाननिश्चितीसाठी जबाबदार असणारे घटक आणि त्यांचे स्थान इत्यादी महत्त्वपूर्ण बाबींचा समावेश होतो.

या सर्वाचा अभ्यास करताना साधारणत: याची विभागणी जगाचा भूगोल आणि भारताचा भूगोल अशी करावी लागते. जगाच्या भूगोलाचे प्राकृतिक आणि मानवी भूगोल (सामाजिक आणि आर्थिक भूगोल) असे वर्गीकरण करावे लागते आणि भारताच्या भूगोलालाही हेच वर्गीकरण लागू होते. या वर्गीकृत पद्धतीने या विषयाचा सखोल अभ्यास करावा लागतो. भारताच्या भूगोलावर जास्त प्रश्न विचारले जातात.

या पेपरमध्ये विषयाच्या पारंपरिक माहितीच्या अनुषंगाने अधिक प्रश्न विचारले जातात. उदाहरणार्थ भारतीय वारसा आणि संस्कृती व इतिहास, भारतीय समाजरचनेची वैशिष्टय़े, प्राकृतिक भूगोल (जगाचा आणि भारताचा) इ. याचबरोबर या पेपरमध्ये चालू घडामोडीच्या अनुषंगानेही प्रश्न विचारण्यात येतात.

उदाहरणार्थ भारतीय वारसा आणि संस्कृती, भारतीय समाजव्यवस्थेशी संबंधित लोकसंख्या व संबंधित मुद्दे, गरिबी आणि विकासात्मक मुद्दे, नागरिकीकरण व जागतिकीकरणाचा भारतीय समाजावर झालेला परिणाम आणि भूगोल, यामध्ये मानवी भूगोल (सामाजिक आणि आर्थिक भूगोल) इत्यादी.

या पेपरचा अभ्यास करताना विषयाच्या पारंपरिक ज्ञानाबरोबरच चालू घडामोडींची जोड द्यावी लागते, हे तितकेच महत्त्वाचे आहे. पुढील लेखामध्ये या पेपरची घटकनिहाय विस्तृत चर्चा करू या.