निवडणूक आयोगातर्फे दिल्या जाणाऱ्या मतदार ओळखपत्रासाठी अर्जदारांना सर्वप्रथम नमुना अर्ज भरणे गरजेचे असते. या अर्जामध्ये अर्जदाराचे नाव, पत्ता, त्याचे वय आणि त्याचे छायाचित्र असणे आवश्यक असते. त्यानुसारची कागदपत्रे अर्ज भरताना सादर करावी लागतात.
वयासाठी आवश्यक कागदपत्रे
मतदार ओळखपत्रासाठी सर्वात महत्त्वाची कागदपत्रे म्हणून १८ वर्षे पूर्ण केलेल्या वयाचा पुरावा असणे गरजेचे आहे. यासाठी पालिकेतर्फे देण्यात येणारे जन्म प्रमाणपत्र किंवा शैक्षणिक संस्थेने दिलेले जन्मदिनांक प्रमाणपत्र या अर्जाबरोबर जन्माचा पुरावा म्हणून ग्राह्य धरला जातो किंवा जर अर्जदार इयत्ता दहावी उत्तीर्ण असेल तर ती जन्मतारीख नमूद केलेली दहावीची गुणपत्रिका असणे गरजेचे आहे किंवा जन्मतारीख नमूद केलेली आठवीची गुणपत्रिका आवश्यक कागदपत्रासाठी गरजेचे ठरते.
राहत्या ठिकाणाच्या पुराव्यासाठीची कागदपत्रे
जन्माच्या पुराव्यासाठी अर्जदार ज्या ठिकाणी राहतो, त्या ठिकाणाचा पुरावा असणेही गरजेचे आहे. त्यासाठी निवडणूक आयोगाने विविध कागदपत्रांची यादी जाहीर केली आहे. त्यानुसार यासाठी बँक, किसान, डाक कार्यालयाचे पासबुक हे पुरावा म्हणून ग्राह्य धरता येत; तर इन्कम टॅक्स विभागाचे आदेश, पासपोर्ट, वाहन परवाना किंवा रेशन कार्ड हेही वापरता येऊ शकते. याशिवाय अर्जदाराच्या नावावर किंवा त्याच्या पालकांच्या नावावर फोन, पाणी, वीज, गॅस जोडणीचे बिलही राहत्या पुराव्यासाठी ग्राह्य़ धरले जातात. मुख्य म्हणजे, जी व्यक्ती बेघर असतात, त्यांनी नमूद केलेल्या पत्त्यावर मतदान केंद्रीय कार्यालयातील रात्री भेटी देऊन ते व्यक्ती त्या ठिकाणी राहतात की नाही, याची नोंद केली जाते.
प्रक्रिया
विहित अर्जानुसार संपूर्ण अर्ज प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर हा अर्ज जवळच्या विधानसभा निवडणूक कार्यालय किंवा आयोजित विशेष मोहिमेतील अधिकाऱ्याकडे सादर करणे गरजेचे असते. हा अर्ज सादर केल्यानंतर निवडणूक अधिकारी दिलेल्या अर्जातील पत्त्यावर भेट देऊन खातरजमा करत असतात. त्यानंतर निवडणूक आयोगाच्या वेबसाइटवर हा अर्ज भरला जाऊन एक क्रमांक दिला जातो. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाकडून संबंधित अर्जदाराचा अहवाल निवडणूक अधिकाऱ्याकडे पाठविण्यात येतो. त्याचे ओळखपत्र तयार केले जाते. या ओळखपत्रावर होलोग्राम स्टिकर लावण्यात येतो. त्यानंतर ओळखपत्राची संपूर्ण तयारी पूर्ण करून संबंधित ओळखपत्र बुथ लेव्हल ऑफिसरकडे पाठविण्यात येते. ते हे ओळखपत्र संबंधित अर्जदारांना प्रदान करतात. जर ही संपूर्ण प्रRिया विशेष मोहिमेच्या माध्यमातून राबविण्यात आली, तर यास दोन ते तीन महिन्यांचा कालावधी लागतो. इतर वेळेस साधारण सहा ते सात महिन्यांच्या कालावधीत ही संपूर्ण प्रक्रिया राबविली जाते.