scorecardresearch

एमपीएससी मंत्र : पॅटर्न बदल, वाढत्या संधी

सध्याच्या आयोगाच्या निर्णयामुळे उमेदवारांसाठी संधींमध्ये मोठय़ा प्रमाणात वाढ होणार आहे.

एमपीएससी मंत्र : पॅटर्न बदल, वाढत्या संधी
(संग्रहित छायाचित्र) ; फोटो- लोकसत्ता

रोहिणी शहा   

राज्य लोकसेवा आयोगामार्फत आयोजित विविध स्पर्धा परीक्षांच्या पद्धतीमध्ये सुधारणा करण्याचा निर्णय आयोगाने घेतला आहे. हे बदल सन २०२३ करिता आयोजित परीक्षांपासून लागू करण्यात येतील असे आयोगाने जाहीर केले आहे. आयोगाकडून वेळोवेळी अभ्यासक्रम, परीक्षा पद्धत, गुणांकन, प्रश्नप्रकार अशा बाबतीत कालानुरुप बदल करण्यात येतात. या बदलांचे कधी स्वागत होते तर कधी नाराजीचे सूर उमटतात. काही वेळा उमेदवारांकडून आयोगाबाबत काही अपेक्षाही व्यक्त केल्या जातात.

२०२१ मध्ये आयोगाकडून वेगवेगळय़ा प्रवर्गातील उमेदवारांना कमाल किती वेळा संधी घेता येईल आणि या संधी कशा प्रकारे मोजल्या जातील याबाबतची घोषणा करण्यात आली तेव्हा संधींची मर्यादा आखण्याचे  वढरउ चे धोरण तर आयोगाने स्वीकारले, पण मग याच धर्तीवर पूर्व परीक्षेतील सी सॅट पेपर क्वॉलिफाइंग स्वरूपाचा करण्याबाबत निर्णयही आयोगाने घ्यावा, परीक्षाही वेळच्या वेळी नियमितपणे घ्याव्यात, भरतीसाठी भरपूर पदेही उपलब्ध करून द्यावीत असा सूर उमटू लागला. यातील बऱ्याच अपेक्षा आयोगाकडून पूर्ण होताना दिसत आहेत. संधींची मर्यादा घालून देणारा निर्णय आयोगाने नंतर मागे घेतला आहे. आयोगाने  वढरउच्या धर्तीवर सीसॅट पेपर क्वॉलिफाइंग स्वरूपाचा करण्याच्या निर्णयाची घोषणा केलेली आहे आणि त्याचे सर्वच उमेदवरांकडून जोरदार स्वागतही झाले आहे.

सध्याच्या आयोगाच्या निर्णयामुळे उमेदवारांसाठी संधींमध्ये मोठय़ा प्रमाणात वाढ होणार आहे. सर्व राजपत्रित संवर्गासाठी एक आणि अराजपत्रित संवर्गासाठी एक सामायिक पूर्व परीक्षा म्हणजे कमी कष्टात, एका अभ्यासामध्ये वेगवेगळय़ा मुख्य परीक्षांसाठी पात्र ठरण्याची संधी. राजपत्रित पदांसाठीच्या परीक्षेमध्ये राज्य सेवेची ३३ संवर्गातील पदे आणि तांत्रिक सेवांसाठीची पात्रता असल्यास तांत्रिक सेवांमधील पदे अशा किमान ३५ पदांसाठी एकाच पूर्व परीक्षेतून पहिला टप्पा पार पडेल. अराजपत्रित सेवांच्या सर्व संवर्गासाठीच्या मुख्य परीक्षेचे स्वरूपही एकसारखेच आहे. त्यामुळे एका वेळी अभ्यास झाला की एकूण नऊ पदांसाठीची मुख्य परीक्षाही देता येणार आहे.

तांत्रिक सेवांसाठी होणाऱ्या पूर्व परीक्षांसाठीचा अभ्यासक्रम आधी वेगवेगळा होता. त्यामुळे या सेवांच्या परीक्षांची तयारी करणाऱ्या उमेदवारांना पूर्व परीक्षेसाठी जास्तीची तयारी करावी लागणार आहे. पण त्याबरोबर जास्तीची ३३ पदेही त्यांच्यासाठी त्याच अभ्यासामुळे उपलब्ध होणार आहेत. मुख्य परीक्षा आधीप्रमाणेच होणार असल्यामुळे आणि अभ्यासक्रम तांत्रिक मुद्यांवर भर देणारा असल्यामुळे कमी कष्टात तांत्रिक सेवेची तयारी होईलच. त्याच बरोबर राज्य सेवा मुख्य परीक्षेची तयारी केली तर  वढरउ ची पण तयारी होऊ शकणार आहे. केंद्रीय नागरी सेवेच्या पदांच्या रुपात संधींचे नवे दालन उघडणार आहे.

२०१२ मध्ये मुख्य परीक्षा वस्तुनिष्ठ स्वरुपाची करण्यात आली तर सन २०१३ मध्ये पूर्व परीक्षेत सीसॅट पेपर समाविष्ट करण्यात आला. मागील वर्षी राज्यसेवा परीक्षेचे स्वरूप वर्णनात्मक करण्याचा निर्णय घेण्यात आला. २०१३ पासून सुरू झालेले आयोगाच्या परीक्षा पद्धती आणि अभ्यासक्रमातील बदल हे टप्प्याटप्प्याने विकसित होत आता एका सुटसुटीत पॅटर्नवर स्थिरावले आहेत असे दिसते. घेतलेले निर्णय, त्यांचे प्रशासकीय आणि उमेदवारांवर होणारे परिणाम या सगळय़ा बाबींचा आढावा घेत व्यवहार्य तोडगे काढत हे बदल करण्यात येतात. आयोग वेळोवेळी काल सुसंगत ठरतील असे निर्णय घेत आलेला आहे आणि घेत राहील. त्याबाबत वस्तुनिष्ठ व व्यावहारीकदृष्टय़ा विचार करणे आवश्यक आहे. आयोगानेच प्रसिद्धीपत्रकात म्हटल्याप्रमाणे या नव्या पद्धतीमुळे उमेदवारांवरचा अतिरिक्त ताण कमी होणे हा या बदलांचा हेतू नक्कीच साध्य होणार आहे. एक तर सुटसुटीतपणे एकूण मिळून दोनच पूर्व परीक्षा दिल्या की आपापल्या पसंतीच्या पदांच्या मुख्य परीक्षेची तयारी करता येणार आहे. प्रत्येक पदासाठी/ सेवेसाठी वेगळी पूर्व परीक्षा, वेगळी मुख्य परीक्षा, प्रत्येक परीक्षेचा वेगळा अभ्यासक्रम हा ताण खूप मोठय़ा प्रमाणात हलका होणार आहे.

मराठीतील सर्व करिअर वृत्तान्त ( Career-vrutantta ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 06-01-2023 at 06:34 IST

संबंधित बातम्या