MBAएमबीए अभ्यासक्रमाचे स्वरूपच असे आहे, की प्रत्येक विषयाची थिअरी समजून घेण्याबरोबरच त्या विषयाचा प्रत्यक्ष व्यवहारातील उपयोग म्हणजेच विषयाची व्यावहारिक उपयुक्ततेची बाजूसुद्घा समजायला हवी. विषयांचा नुसता थिअरीचा अभ्यास केल्यास परीक्षा उत्तीर्ण होता येईल. किंबहुना डिस्िंटक्शनसुद्धा मिळेल. पण पुढे नोकरी करताना अथवा स्वत:चा व्यवसाय करताना मात्र अडचणी जाणवतील. यासाठी प्रत्येक विषयाची ‘उपयोजनाची बाजू’ किंवा ‘ज्ञानाचा प्रत्यज्ञ वापर’ हासुद्धा समजून घेणे आवश्यक आहे. यासाठी अनेक बाजूंनी प्रयत्न करता येतात.
मागील लेखात उल्लेख केल्यानुसार वेगवेगळ्या विषयांच्या केस स्टडी सोडवता येतात. केस स्टडी वाचणे हेदेखील खूप महत्त्वाचे आहे. केस स्टडी वाचून त्या सोडवण्याचा प्रयत्न करणे, त्यासाठी मित्रमंडळींमधे चर्चा करणे, वर्गातील चर्चेत भाग घेणे, प्राध्यापकांची मदत घेणे इत्यादी अनेक मार्ग सुचवता येतात. विषयाची प्रॅक्टिकल बाजू समजण्यासाठी केस स्टडीजचा उपयोग निश्चित होतो. मात्र यासाठी केस स्टडीकडे गंभीरपणे बघणे तितकेच आवश्यक आहे.
एम.बी.ए. अभ्यासक्रमाचा विचार केल्यास असे दिसते की वेगवेगळ्या विषयांचे गट तयार करता येतील. यामध्ये सर्वसाधारण व्यवस्थापन (जनरल मॅनेजमेंट) संबंधित विषयांचा एक गट, त्याचप्रमाणे विशेषीकरणाचे (स्पेशलायझेशन) विषय असा गट, या व्यतिरिक्त इतर काही अनिवार्य विषय असलेला असा गट म्हणजे या गटामध्ये स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंट, सस्टेनॅबिलिटी मॅनेजमेंट तसेच मॅनेजमेंट कंट्रोल सिस्टिम्स, व्यवस्थापकीय अर्थशास्त्र, संशोधनाच्या पद्धती, संख्याशास्त्र इ. विषयांचा समावेश करता येईल.
सर्वसाधारण व्यवस्थापन (जनरल मॅनेजमेंट) याच्याशी संबंधित असलेल्या विषयांमधे प्रामुख्याने व्यवस्थापनाची मूलभूत तत्त्वे व कार्ये तसेच ऑर्गनायझेशन बिहेवियर इ. विषयांचा समावेश होतो. यामधे व्यवस्थापन कार्याची मूलभूत तत्त्वे तसेच बदलाचे व्यवस्थापन (चेंज मॅनेजमेंट), संघर्षांचे व्यवस्थापन, कर्मचाऱ्यांची संघटनेतील वागणूक, त्यांचे परस्परसंबंध इ. विषयीची माहिती समाविष्ट असते. याचा अभ्यास करताना संदर्भग्रंथ व पाठय़पुस्तके यांचे सखोल वाचन उपयुक्त ठरतेच पण याचबरोबर आपल्या अवतीभोवती असणाऱ्या असंख्य छोटय़ा मोठय़ा संस्थांतून व्यवस्थापनाचे काम कसे चालते हेसुद्धा निरीक्षण करता येते. अगदी आपल्या घरामधे व्यवस्थापन कशा प्रकारे केले जाते याचेही निरीक्षण करता येईल. आपण स्वत:चे तसेच स्वत:च्या वेळेचे व्यवस्थापन कसे करतो व ते कसे चांगल्या पद्धतीने करता येईल हेसुद्धा शिकता येते. स्वत:चा व्यवसाय असल्यास व्यवस्थापनाची तत्त्वे त्यामध्ये कशी वापरू शकू तेही पाहता येते. आपले नातेवाईक, मित्रमंडळी ज्या संस्थांमध्ये काम करतात तेथे व्यवस्थापन पद्धती कशी आहे आणि आपण जी व्यवस्थापनाची तत्त्वे शिकतो, ती तत्त्वे प्रत्यक्ष व्यवहारात कशी वापरली जातात हेसुद्धा बघणे फायदेशीर ठरते. शक्य तेवढय़ा  छोटय़ा-मोठय़ा संस्थांना भेटी देऊन तेथील कर्मचारी-अधिकारी यांच्याशी संवाद साधता आला तर अनेक गोष्टी शिकता येतात.
मॅनेजमेंट अकौंन्टिंग आणि वित्तीय व्यवस्थापन या विषयांबाबतसुद्धा असेच म्हणता येईल. मॅनेजमेंट अकौन्टिंगमधे जे वेगवेगळे पैलू शिकवले जातात त्यांचा व्यवहारातील उपयोग प्रत्यक्ष बघता येतो. आपल्या ओळखीच्या किंवा नातेवाईक मंडळीत असलेल्या कॉस्ट अकौन्टंट/चार्टड अकौन्टंट यांच्या ऑफिसमध्ये जाऊन प्रत्यक्ष कॉस्टिंग/ अकौन्टिंग सिस्टीम कशी चालते याची माहिती घेता येते. कॉम्प्युटराईज्ड अकौन्टिंग कशा पद्धतीने चालते हेही पाहाता येईल. वित्तीय व्यवस्थापनामध्ये बँकिंग, स्टॉक मार्केटस्, प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष कर, वित्तविषयक वेगवेगळे कायदे इ. अनेक विषयांचा समावेश होतो. बँकिंगचा अभ्यास करताना, प्रत्यक्षात बँक कर्जे देताना कोणत्या बाबींचा विचार करते, कर्जासाठीचा अर्ज कसा मंजूर-नामंजूर केला जातो. बँका कोणत्या वेगवेगळ्या सेवा देतात इ. अनेक गोष्टी पाहता येतात. तसेच प्रत्यक्ष कर (डायरेक्ट टॅक्सेस) यामध्ये आयकरविषयक वेगवेगळ्या गोष्टी स्वत: करून शिकता येतात. उदा. स्वत:चा पॅन नंबर स्वत: काढणे, कुटुंबातील व्यक्तीचे ई-रिटर्न भरणे तसेच करविषयक वेगवेगळ्या तरतुदींविषयी कुटुंबातील व्यक्तींना मार्गदर्शन करणे इ.मधे स्वत: भाग घेता येतो. अप्रत्यक्ष करांच्या बाबतीत सेंट्रल एक्साईज, सव्‍‌र्हिस टॅक्स यांचे रिटर्न्‍स भरणे शिकता येते. शेअर मार्केटसंबंधीचे बारकावे ब्रोकरच्या ऑफिसमधे जाऊन शिकता येतात. हे सर्व सांगण्याचा उद्देश असा की जे वित्तीय व्यवस्थापन आपण पुस्तकावरून शिकतो ते प्रत्यक्ष पाहिले पाहिजे. पुढील करिअरच्या दृष्टीने हे अत्यावश्यक आहे. स्वत:च्या वैयक्तिक जीवनातदेखील वित्तीय व्यवस्थापन वापरता येते. उदा. फायदेशीर गुंतवणूक कशी करावी, त्यामधील धोके व परतावा याची सांगड कशी घालावी, स्वत:चे करनियोजन कसे करावे, रोख रकमेचे व्यवस्थापन कसे करावे इ. अनेक बाबी शिकता येतात. मात्र यासाठी इच्छाशक्तीची मात्र गरज आहे. इच्छाशक्ती असल्याशिवाय काही शक्य नाही हे समजले पाहिजे.
एम.बी.ए.ला काही विद्यापीठांमध्ये ‘शाश्वततेसाठीचे व्यवस्थापन’ (मॅनेजिंग फॉर सस्टेनॅबिलिटी किंवा सस्टेनॅबिलिटी मॅनेजमेंट) हा एक नवीन व अत्यंत महत्त्वाचा विषय सामाविष्ट करण्यात आला आहे. यामधे कोणतीही व्यावसायिक अगर इतर कोणतीही संस्था, व्यवसाय व शाश्वत (सस्टेनेबल) कसा होईल यासंबंधीची माहिती शिकवली जाते. या विषयाचे प्रमुख पैलू म्हणजे सामाजिक जबाबदारी (कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी), पर्यावरण संरक्षण तसेच कॉर्पोरेट गव्हर्नन्स, शाश्वततेची प्रमुख त्रिसूत्री म्हणजे ज्याला ‘ट्रिपल बॉटमलार्दून’ म्हटले जाते. म्हणजे पीपल, प्लॅनेट आणि प्रॉफिट (ळँ१ी ‘स्र्’२) एखादा व्यवसाय जर शाश्वत व्हायचा असेल तर त्यामध्ये काम करीत असलेले कर्मचारी तसेच पर्यावरण संरक्षण याकडे लक्ष पुरवले पाहिजे तरच मिळणारा नफा हा शाश्वत असेल अशी ही त्रिसूत्री सांगते. हा विषय अभ्यासताना वेगवेगळ्या कंपन्या वार्षिक अहवालाबरोबरच शाश्वततेचा अहवाल (सस्टेनॅबिलिटी रिपोर्टस) आपल्या वेबसाईटवर टाकीत असतात. हे रिपोर्टस् जरूर पाहावेत. तसेच पर्यावरण संरक्षणासाठी आपल्या वैयक्तिक पातळीवर काय प्रयत्न करता येतील, वीज, पाणी इ.चा वापर कसा जपून करता येईल याचाही विचार करता येईल. तसेच सामाजिक जबाबदारीविषयी वेगवेगळ्या कंपन्या कोणते उपक्रम चालवतात हेही पाहता येईल.
सारांश एम.बी.ए.च्या अभ्यासक्रमातील वेगवेगळ्या विषयांचा प्रत्यक्ष व्यवहारातील वापर समजून घेणे हे अवघड नाही. ते आवश्यक मात्र आहे. काही विषयांबाबत या लेखात विवेचन केले आहे. बाकीच्या विषयासंबंधी पुढील लेखामध्ये विचार करू.    
nmvechalekar@yahoo.co.in  (लेखक पुण्याच्या इंडसर्च संस्थेचे अधिष्ठाता आहेत.)

tuberculosis marathi news, tuberculosis genetic sequencing marathi news
क्षयरोग उपचारामध्ये जनुकीय क्रमनिर्धारण महत्त्वपूर्ण, औषध प्रतिरोधकातील बदल समजण्यासाठी मदत
mpsc mantra study current affairs State National International Level Events
mpsc मंत्र: चालू घडामोडी अभ्यासाचा ‘आधार’
wife
पत्नीने तक्रार दाखल करणे क्रुरता नाही…
Professor arrested for taking bribe to accept PhD thesis
विद्येच्या माहेर घरात शिक्षणाचा बाजार! पीएचडीचा प्रबंध मान्य करण्यासाठी लाच घेणारी प्राध्यापिका अटकेत