यूपीएससीची तयारी : भावनिक बुद्धिमत्ता

डेव्हिड वेश्लर, कद चे जनक, यांनी हुशारी केवळ बुद्धिमत्तेवर अवलंबून नसल्याचे मत मांडले.

सुश्रुत रवीश

आजच्या लेखात आपण भावनिक बुद्धिमत्ता (Emotional Intelligence) या विषयाबद्दल चर्चा करणार आहोत. यूपीएससीने दिलेल्या मुख्य परीक्षेतील चौथ्या पेपरमधील हा एक महत्त्वाचा घटक आहे. आपण अनेकदा सभोवताली अशा व्यक्ती बघतो ज्या अतिशय बुद्धिमान आणि हुशार असतात, मात्र आयुष्यातील साधी आव्हाने स्वीकारणे त्यांना अतिशय अवघड जाते. अनेकदा बुद्धिमत्ता परीक्षेमध्ये गुण मिळवून देऊ शकत नाही अथवा कामाच्या ठिकाणी पुरेशी बुद्धिमत्ता असूनही फारशी प्रगती साधता येत नाही. या आणि अशा अनेक वेगवेगळ्या घटनांमधून आपणास हे पाहता येते की,  बुद्धिमान व्यक्ती ही यशस्वी व्यक्ती असतेच असे नाही. किंबहुना त्यांच्या अपयशाचे गमक हे त्यांच्या बुद्धिमत्तेच्या असण्याशी किंवा नसण्याशी जोडलेले नसून वेगळ्याच घटकांशी संबंधित असते. हा घटक म्हणजे भावनिक बुद्धिमत्ता असल्याचे अनेकांच्या लक्षात आले आहे. मात्र इथे एक गोष्ट विशेष लक्षात घ्यायला हवी, ती म्हणजे – व्यक्तीने भावनिक असणे आणि भावनिकदृष्टय़ा बुद्धिमान असणे या दोन संपूर्ण भिन्न गोष्टी आहेत. अनेकदा हा फरक बारकाईने लक्षात घेतला जात नाही. भावनिक बुद्धिप्रामाण्याच्या अभ्यासाचे मूळ आपल्याला डार्विनच्या सद्धांतिक कामामध्ये आढळून येते. डार्विनने हे सर्वात प्रथम मांडले की, भावनिकरीत्या व्यक्त होता येणे हे तग धरून ठेवण्यासाठी (Survival) आवश्यक असते.

अनेक वर्षांच्या अभ्यासानंतर शास्त्रज्ञांना हे लक्षात आले आहे की, केवळ बुद्धिमत्ता तपासून बघणे (जी बुद्धिमत्ता चाचण्या/बुद्धय़ांक – Intelligence test/Intelligence quotient यामधून तपासली जाऊ शकते.) यामधून एखाद्या व्यक्तीच्या क्षमतांची पूर्ण पारख होऊ शकत नाही. सर्वसामान्यत: बुद्धिमत्ता या शब्दामधून ज्या प्रकारच्या क्षमतांची अपेक्षा केली जाते त्यापलीकडे जाऊन मानवी भावनांवर आधारित बुद्धिमापनाची नवीन प्रणाली विकसित करण्यात आली. भावनिक बुद्धिमत्ता (Emotional Intelligence) हा तुलनेने नवीन असा संशोधनाचा व अभ्यासाचा विषय आहे. परंतु, चौकटीत म्हटल्याप्रमाणे या विचाराचे बीज आपल्याला डार्वनिच्या संशोधनातदेखील दिसून येते. भावनिक बुद्धय़ांक (Emotional Quotient) जास्त असणाऱ्या व्यक्ती कामाच्या ठिकाणी अधिक यशस्वी होतात, असे अनेक पाहणीअंती सिद्ध झाले आहे.

बुद्धिमत्तेचे प्रकार व त्यासंबंधीची वैचारिक मांडणी गेल्या शतकापर्यंत बुद्धिमत्ता या संकल्पनेच्या कक्षा केवळ स्मरणशक्ती, आत्मसात करण्याचा वेग अथवा समस्या सोडवणूक म्हणजेच Cognitive Abilities (संज्ञानात्मक क्षमता) इथवरच रुंदावल्या होत्या. मात्र, २०व्या शतकाच्या सुरुवातीच्या काळात काही शास्त्रज्ञांनी बुद्धिमत्तेचे स्वरूप केवळ संज्ञानात्मक (Cognitive) नसून त्यापेक्षा पुष्कळच विस्तृत असल्याचे सिद्ध केले.

वरील चौकटीमध्ये भावनिक बुद्धिमत्तेवरील संशोधनाचा इतिहास मांडला आहे. यामधील काही सद्धांतिक चौकटी या काळाच्या मोजपट्टीवर जास्त खऱ्या उतरल्या आहेत. जसे की, हॉवर्ड गार्डनर यांनी केलेले काम Frames of Mind The theory of multiple intelligence :  यामध्ये त्यांनी मनुष्याकडे एकापेक्षा अधिक प्रकारच्या बुद्धिमत्ता असल्याची संकल्पना मांडली.

एकूण सात विविध प्रकारच्या बुद्धिमत्तांचे त्यांनी मुख्यत: वैयक्तिक (Intrapersonal) आणि आंतरवैयक्तिक (Interpersonal) प्रकार पाडले. तसेच डॅनियल गोलमन यांनी Emotional Intelligence : Why it can matter more than कद हे पुस्तक १९९५ मध्ये प्रसिद्ध केले. त्यांच्या या अतिप्रसिद्ध पुस्तकानंतर Emotional Intelligence अथवा भावनिक बुद्धिमत्ता ही संज्ञा अधिक प्रचलित झाली. वरील यादीमध्ये दिलेल्या संशोधकांच्या कामाची उमेदवारांना तोंडओळख असणे अपेक्षित आहे. मुळामध्ये भावनिक बुद्धिमत्तेचा अभ्यास करण्याआधी भावना या विषयावर झालेल्या मूलभूत संशोधनाकडे, त्यातील उलटसुलट दृष्टिकोनांकडे पाहणे आवश्यक आहे. पुढील लेखात आपण भावनांसंबंधी झालेल्या अभ्यासाचा आढावा घेणार आहोत. तसेच या अभ्यासातून उगम पावलेल्या भावनिक बुद्धिमत्तेचा प्रशासकीय सेवांमध्ये कोणता मोलाचा वाटा आहे, हे पाहणार आहोत.

भावनिक बुद्धिमत्तेचा इतिहास

१९२० – एडवर्ड थॉर्नडाईक यांनी सर्वप्रथम ‘सामाजिक बुद्धिमत्ता’ अशी संकल्पना मांडली.

१९४० – डेव्हिड वेश्लर, कद चे जनक, यांनी हुशारी केवळ बुद्धिमत्तेवर अवलंबून नसल्याचे मत मांडले.

१९६६ – ल्यूनन (Leunen) यांनी एक (Emotional Intelligence) वर आधारित शोधनिबंध प्रसिद्ध केला.

१९७४ – क्लॉड स्टायनर यांनी ‘भावनिक साक्षरता’ या विषयावरील लेख प्रसिद्ध केला.

१९८३ – हॉवर्ड गार्डनर यांनी Multiple Intelligence वरील लिखाण प्रसिद्ध केले.

१९९० – पीटर सॅलोवे व जॅक मेयर यांनी आपली ‘भावनिक बुद्धिमत्ते’ची मांडणी केली.

१९९५ – डॅनियल गोलमन यांनी भावनिक बुद्धिमत्तेवर आधारित पुस्तक प्रसिद्ध केले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Upsc exam guidance preparation of upsc exam upsc exam tips zws