डॉ. श्रीराम गीत

आपण लोकसत्तामध्ये अनेक विद्यार्थ्यांना त्यांच्या करिअर विषयी अतिशय मोलाचे मार्गदर्शन केले आहे. माझा मुलगा अथर्व गायकवाड याने २०२३ मध्ये बारावी विज्ञान परीक्षा ८९ टक्के गुण घेऊन उत्तीर्ण केली आहे. तसेच नीट परीक्षेत त्याचा स्कोर २०२ होता. काही दिवसांपूर्वी ब्राईट फ्युचर एज्युकेशन ग्रुपतर्फे आम्हाला रशिया युनिव्हर्सिटीत एमबीबीएस डिग्रीसाठीची माहिती मिळाली. सहा वर्षांचा हा कोर्स असून परत आल्यानंतर त्याला परीक्षाही द्यावी लागेल. त्याचबरोबर भारतात (महाराष्ट्रात) बी फार्मसी आणि बीएएमएस या दोन्ही अभ्यासक्रमांची आम्ही चौकशी केली आहे. तरी आपण कोणता अभ्यासक्रम निवडून पुढील शिक्षण पूर्ण करावे याविषयी कृपया मार्गदर्शन करावे आम्हाला आपल्या मार्गदर्शनाची नितांत आवश्यकता आहे. – मंजिरी गायकवाड.

हेही वाचा >>> स्पर्धेत धावण्यापूर्वी : आभासी शिक्षण

मुलाची बाहेर परदेशात राहण्याची मानसिक तयारी व किमान ३० लाखांचा खर्च करणार असाल तर एमबीबीएस पदवीपर्यंत त्याचे शिक्षण पूर्ण होईल. या पुढच्या पदव्युत्तर शिक्षणाची संपूर्णपणे अनिश्चितता लक्षात घेऊन यावर आपणच निर्णय घ्यायचा आहे. फक्त एक उल्लेख इथे करत आहे. त्याचे आत्ताचे नीटचे मार्क २०२ आहेत असे आपण कळवले आहे. रशियातून परत आल्यावर जेव्हा तो नेक्स्ट परीक्षा पास होईल त्यावेळी त्याची स्पर्धा साडेपाचशे मार्काने नीट उत्तीर्ण झालेल्या अन्य विद्यार्थ्यांशी असेल. गेल्या पाच वर्षांतील विद्यार्थी व पालकांची मानसिकता हाती प्रथम पदवी पडू देत, इतपतच असते. ती पडल्यानंतर काय याबद्दलची थोडी माहिती आपल्या प्रश्नाच्या निमित्ताने इतर वाचकांना देत आहे. पुढच्या कोणाच्याही पदवीचा खर्च किमान एक ते दीड कोटी रुपयांच्या पुढे जातो. प्रवेशाची अनिश्चितता असते ते वेगळेच. इतर रस्त्यांचा विचार मुलगा करेलसे मला वाटत नाही.

मी २२ वर्षांची आहे. २०२२ मध्ये बीकॉम ७.९१ सीजीपीएने पूर्ण झाले. नंतर मी बॅंकिंगची परीक्षा दिली. पण त्यामुळे पुढचा शिक्षणात १ वर्ष खंड झाला. आता मला बॅंकिंग परीक्षांबरोबर यूपीएससी परीक्षा द्यायची आहे. मला अकाऊंट आवडत नाही. म्हणून त्यामध्ये करियर करावे असे वाटत नाही. पण पुढे शिकायचे आहे. इतिहास आवडतो म्हणून मी या वर्षी एम.ए. इतिहासला प्रवेश घेतला आहे. त्यासोबत कोणता तरी डिप्लोमा कोर्स करण्याचा विचार आहे. मग पुढे पीएच.डी.करून प्रोफेसर किंवा त्याच संबंधी काहीतरी करण्याचा विचार आहे. पण नक्की काय करावे समजत नाही. मार्गदर्शन करा. – स्पृहा पाटील

हेही वाचा >>> यूपीएससीची तयारी : सांख्यिकीय व्यवस्था व आर्थिक धोरण निर्मिती

तुझे बी.कॉम.चे मार्क मी वाचले. ते चांगले असले तरी तुझ्या मनातील स्वप्नांना गवसणी घालण्यासाठी अजिबात पुरेसे नाहीत. बँकांची परीक्षा असो किंवा यूपीएससी असो दोन्हीमध्ये यश मिळण्यासाठी कमीत कमी तीन प्रयत्नांची गरज असते. जे विद्यार्थी सातत्याने दहावीपासून बी.कॉम.पर्यंत किमान ८० टक्के सोडत नाहीत त्यांना कदाचित पहिल्या प्रयत्नात यश मिळू शकते. मला अकाउंट आवडत नाही हे मला कळले. पण इतिहास आवडतो त्याचा संदर्भ लागला नाही. एम.ए. इतिहास करून तू काय करणार? हा विचार सुद्धा तुझ्या मनात येत नाही. खरे तर एमए इतिहास केलेल्या कोणालाही भेटून या प्रश्नाचे उत्तर तुला सहज मिळू शकते. पीएच.डी.चा विचार सध्या नको. तुझ्या इच्छेनुसार पीएच.डी. कधीही तिशी नंतर होऊ शकते. अन्यथा सर्व प्रकारच्या नोकऱ्या किंवा स्पर्धा परीक्षातून तू बाहेर फेकली जाशील हे लक्षात घे. जे जे करावेसे वाटते त्यातील माणसे शोधून त्यांचेकडून माहिती घेण्याकरिता वेळ देणे हे महत्त्वाचे काम तुला येत्या महिनाभरात करावयाचे आहे.

सर मी माझे  B.com शिक्षण पूर्ण करून पुण्यातील रानडे इन्स्टिटय़ूट येथे डिप्लोमा इन डिजिटल मीडिया या पार्ट टाईम कोर्सचे शिक्षण घेत आहे. तर डिजिटल मीडियातील करिअरच्या संधी आणि मी आता कुठे उमेदवारी करू शकतो का? या बद्दल माहिती हवी होती. आणि ती मिळवण्यासाठी काय करावं लागेल? – विनय महाजन

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मित्रा, तुझा अभ्यासक्रम तर पूर्ण होऊ देत ना. अभ्यासक्रम चालू असताना इंटर्नशिप  करण्याकरिता संस्थेतर्फेच झाली तर मदत होऊ शकते. तुझ्या अभ्यासक्रमानंतरच्या विविध दिशा नीट माहिती करून घे. कंटेंट, सोशल मीडिया, एन्फ्लुएन्सर, मार्केटिंग, यू-टय़ूबर, अशा विविध पद्धतीत कामे करणारी माणसे आणि कंपन्या आहेत. ते सारे समजावून घे. शिकवणाऱ्यांशी गप्पा मार. कामे करणाऱ्यांची नावे शोध. तुझा रस्ता तुला हळूहळू सापडेल.