– डॉ. नितीन करमळकर, नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण सुकाणू समिती अध्यक्ष
करिअरविषयक नव्या संघी उलगडून दाखविणारी लोकसत्ता मार्ग यशाचा ही करिअर कार्यशाळा नुकतीच ठाणे आणि दादर येथे पार पडली. या कार्यशाळेत तज्ज्ञांनी केलेल्या मा वर्गदर्शनाचा सारांश.
आजपर्यंत कला, विज्ञान, वाणिज्य, व्यवस्थापन यापैकी कोणत्याही एका विद्याशाखेत प्रवेश घेतल्यावर दुसऱ्या विद्याशाखेतील विषय शिकता येत नव्हते. शिक्षणव्यवस्थेतील या विषयानुरूप भिंती तोडण्याचे काम हे बहुशाखीय असलेल्या नव्या शैक्षणिक धोरणातून होत आहे. कला शाखेत शिकत असताना आपण विज्ञान शाखेतील काही आवडीच्या विषयांचाही अभ्यास आता करू शकणार आहोत. उदा. कला शाखेत शिकत असताना इतिहास हा प्रमुख विषय आणि विज्ञान शाखेतील भौतिकशास्त्र हा विषय अल्प स्वरूपातील विषय म्हणून घेऊ शकतो. तर एका वर्षांनंतर अल्प स्वरूपातील विषय हा प्रमुख विषय म्हणूनही निवडण्याची मुभा देण्यात आली आहे. एकाच महाविद्यालयात प्रवेश घेऊन ५० टक्के अभ्यासक्रम पूर्ण करू शकता आणि उर्वरित ५० टक्के अभ्यासक्रम हा दुसऱ्या महाविद्यालयातूनही पूर्ण करता येणार आहे. शैक्षणिक श्रेयांक बँक खात्यामुळे आता संबंधित अभ्यासक्रमचे श्रेयांक साठवून विद्यार्थ्यांला एका विद्याशाखेतून दुसऱ्या विद्याशाखेत जाता येणार आहे. पूर्वीच्या अभ्यासक्रमाचे श्रेयांक फुकट जाणार नाही. १२ डिसेंबर २०२२ रोजी या नवीन शैक्षणिक धोरणासंबंधित एक आराखडा विद्यापीठ अनुदान आयोगाने दिला. यामध्ये ३ व ४ वर्षांच्या पदवी अभ्यासक्रमाचा समावेश होता. तीन वर्षांची पदवी ही १२० श्रेयांक आणि चार वर्षांची पदवी ही १६० श्रेयांकांची आहे.
नवीन शैक्षणिक धोरणामध्ये मल्टिपल एंट्री आणि एक्सिट हा पर्याय पहिल्यांदाच देण्यात आलेला आहे. तुम्ही तीन व चार वर्षांचा कोणताही पदवी अभ्यासक्रम हा सात वर्षांमध्ये पूर्ण करू शकतात. आर्थिक अडचणींमुळे जर संबंधित पदवी अभ्यासक्रमातून एका वर्षांनंतर बाहेर पडायचे असल्यास, कार्यानुभव घेऊन विद्यार्थी बाहेर पडू शकतो. स्वत:ची उपजीविका भागवू शकेल असे प्रमाणपत्र त्याला यावेळी दिले जाईल. तर दोन वर्षांनंतर पदविका, तिसऱ्या वर्षी पदवी आणि चौथ्या वर्षी बाहेर पडल्यानंतर ऑनर्ससह इंटर्नशिप व संशोधन पदवी देण्याची व्यवस्था केली आहे. संबंधित क्षेत्रात ५० वर्षांचा दांडगा अनुभव असलेली मंडळी तुम्हाला कॅम्पसमध्ये येऊन मार्गदर्शन येतील, तुमच्यासोबत संशोधनात काम करतील. ही १६० ते १७४ श्रेयांकांची चार वर्षांची पदवी घेतल्यानंतर विद्यार्थी पदव्युत्तर शिक्षण घेण्यासाठी परदेशात जाऊ शकतो. कामानिमित्त पालकांना शहर बदलावे लागते आणि विद्यापीठ बदलल्यामुळे विद्यार्थ्यांचे शिक्षण अर्धवट राहायचे. आता विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान थांबणार असून विद्यापीठांमधील पदवीचे श्रेयांकही समान असल्यामुळे विद्यार्थी सदर अभ्यासक्रम दुसऱ्या विद्यापीठातून पूर्ण करू शकतील. तर एकाच विद्यापीठात राहून दुसऱ्या विद्यापीठातील अभ्यासक्रमही एकाचवेळी शिकता येणार आहे. राज्यातील १३ विद्यापीठांमध्ये शैक्षणिक वर्ष हे एकाचवेळी सुरू होणार असून. शिक्षणामध्ये लवचिकता व समानता आणण्याचे काम या धोरणाच्या माध्यमातून होणार आहे. कला, क्रीडा, एनएसएस, एनसीसी अशा अभ्यासेतर उपक्रमांनाही आता श्रेयांक दिले जाणार आहेत.
पालक-मुलांमध्ये मनमोकळा संवाद गरजेचा –– डॉ. हरीश शेट्टी, मानसोपचार तज्ज्ञ
आपल्या पाल्याला परीक्षेत जर गुण कमी मिळाले, तर त्याच्यावर पालकांनी शाब्दिक अत्याचार करू नये. अशा वेळी मिठी मारून त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा. कारण या दरम्यान मुलांना आई-बाबांची सर्वाधिक गरज असते. आई-बाबांनी स्वत:च्या आयुष्यात घडलेल्या वाईट गोष्टी मुलांना सांगितल्या पाहिजेत. कारण यानंतर मुलेही मन मोकळे करीत स्वत:च्या अडीअडचणी सांगतात, त्यांच्या मनावर कसलेही दडपण राहत नाही. पालक व मुलांमध्ये मनमोकळा संवाद होणे गरजेचे आहे. तुमची मुलं जर चुकत असतील किंवा ताणतणावातून जात असल्यास, त्यांना आधार देणे गरजेचे आहे. कोणत्याही समस्येवेळी जवळच्या व्यक्तींनी एकत्र बसून जर चर्चा केली, तर समस्या लगेच सुटते. मुलांना जर टोमणे मारले तर त्यांचा आत्मविश्वास खचतो.
करोनाकाळानंतर आळस, एखाद्या गोष्टीत रस नसणे, विश्वासाचा अभाव, आत्मविश्वासाचा अभाव, ध्येयांचा अभाव या गोष्टीही वाढल्या आहेत. तर मुलांना छोटे दु:ख सहन करण्याचा अनुभव देणे तितकेच गरजेचे आहे. त्यांनी एखाद्या गोष्टीसाठी हट्ट केल्यास त्यांना न ओरडता सरळ नाही सांगा. त्यांना लहानपणापासूनच नाही ऐकण्याची सवय करा.
आपल्याला भावनांबद्दल जागरूकता हवी. झोप कमी असल्यास माणसाला राग येतो आणि त्याची चिडचिड वाढते. कोणत्याही वेळी ८ ते १० तास झोपले म्हणजे, व्यवस्थित झोप पूर्ण होत नाही. सूर्यास्तानंतर ४ ते ५ तासांनी झोपणे आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत फायदेशीर आहे. कारण रात्री १ नंतर झोपल्यावर तुम्हाला कमी वयात म्हणजे वयाच्या पस्तिशीपर्यंत रक्तदाब, मधुमेहासारखे विविध आजार होऊ शकतात. रंगरूपावरून विद्यार्थ्यांमध्ये नेहमी चर्चा होत असते. परंतु तुम्ही जसे आहेत तसे स्वत:ला स्वीकारल्यास आत्मविश्वास वाढतो. विद्यार्थ्यांनी अभियोग्यता चाचणी करावी. तुम्ही एखाद्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करू शकत नसाल तर योग, प्राणायम करा. आयुष्य हे सुंदर आहे, परीक्षा सोप्या आहेत या गोष्टी पालकांनी विद्यार्थ्यांना सांगितल्या पाहिजेत. मानसिक आरोग्य हे एक शास्त्र आहे, तत्त्वज्ञान नाही. मनाचे फ्रॅक्चर कोणाचेही होऊ शकते, यावेळी ताबडतोब उपचार घेणे गरजेचे आहे. आपण भारतात जन्माला हे आपले भाग्य आहे. भारतीय पालक छान आहेत. पालकांमुळे व शाळेतील संस्कारांमुळे भारतीय जगभर चमकदार कामगिरी करीत आहेत. नेहमी आनंदी राहाल तर आयुष्यात पुढे जाल.