गट क सेवा मुख्य परीक्षेमधील अर्थव्यवस्था घटकातील समग्रलक्ष्यी अर्थशास्त्र, वृद्धी व विकास, सार्वजनिक वित्त आणि आंतरराष्ट्रीय व्यापार आणि आंतरराष्ट्रीय भांडवल या संकल्पनात्मक मुद्द्यांच्या तयारीबाबत मागील लेखामध्ये चर्चा करण्यात आली. या लेखामध्ये उर्वरित मुद्द्यांची तयारी कशी करावी ते पाहू.

अर्थव्यवस्था घटकातील उद्योग व सेवा क्षेत्र, पायाभूत सुविधा विकास, सहकार आणि महाराष्ट्राची अर्थव्यवस्था या मुद्द्यांमध्ये संकल्पनात्मक आणि चालू घडामोडींवर आधारित अशा दोन्ही प्रकारचे प्रश्न अपेक्षित आहेत. सन २०२३ मध्ये चालू घडामोडींवरील प्रश्नसंख्या नगण्य असली तरी यापुढे अशा प्रश्नांची शक्यता नाकारता येत नाही.

उद्योग व सेवा क्षेत्र

आर्थिक आणि सामाजिक विकासातील उद्योगांचे महत्त्व व भूमिका हा मुद्दा एकूणच उद्योग क्षेत्राचा विचार करून अभ्यासायचा आहे. यामध्ये मोठे, मध्यम, लघू व सूक्ष्म उद्योद, स्वयंरोजगार असे सर्व आयाम लक्षात घेणे आवश्यक आहे.

उद्योगांच्या वृद्धीचे स्वरूप अभ्यासताना त्यांचा growth pattern हा इंग्रजी अभ्यासक्रमातील उल्लेख महत्त्वाचा आहे. उद्योगांची वृद्धी कोणत्या क्षेत्रामध्ये, कोणत्या प्रदेशामध्ये/राज्यांत, कोणत्या कालावधीमध्ये झाली असे मुद्दे यामध्ये लक्षात घ्यावे लागतील.

महाराष्ट्राच्या विशेष संदर्भासह भारतातील मोठ्या उद्योगांची संरचना अभ्यासताना क्षेत्रनिहाय उद्योगांचा स्थानिक विस्तार आणि त्याचे अर्थव्यवस्थेतील योगदान विचारात घ्यावे.

आजारी उद्योगांमागची कारणे, उपाय यांचाच भाग म्हणून औद्योगिक निकास धोरण अभ्यासायला हवे.

सूक्ष्म, लहान व मध्यम उद्योग (MSME) अभ्यासताना या उद्योगांच्या व्याख्या, निकष, अर्थव्यवस्थेतील (रोजगारनिर्मिती, GDP, परकीय व्यापार यातील वाटा) योगदान, समस्या, कारणे, परिणाम हे मुद्दे पाहावेत.

१९९१च्या पूर्वीची व नंतरची औद्योगिक धोरणे पुढील मुद्द्यांच्या आधारे अभ्यासावीतः धोरणाचा कालावधी, पार्श्वभूमी, उद्दिष्टे, ठळक तरतुदी, मूल्यमापन

भारतातील सेवा क्षेत्राची रचना व वृद्धी इतकेच मुद्दे अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट असले तरी सेवा क्षेत्राचा भारतातीय अर्थव्यवस्थेतील (रोजगारनिर्मिति, GDP, परकीय व्यापार यातील) वाटा, सेवा क्षेत्रासमोरील समस्या, त्यांचे स्वरूप, कारणे, परिणाम व उपाय, सेवा क्षेत्राच्या विकासासाठीचे शासकीय प्रयत्न हे मुद्देही पाहायला हवेत.

भारतीय श्रम क्षेत्राच्या समस्या, त्यांची कारणे, स्वरूप, परिणाम, उपाय या मुद्द्यांच्या आधारे अभ्यास करायला हवा. श्रामिकांसाठीच्या सामाजिक सुरक्षा योजना, श्राम क्षेत्रातील सुधारणा हा पारंपरिक आणि चालू घडामोडी असे दोन्ही आयाम असलेला मुद्दा आहे.

पायाभूत सुविधा विकास:

पायाभूत सुविधांचे प्रकार, आवश्यकता, महत्त्व, विकासातील समस्या, कारणे, उपाय अशा मुद्द्यांच्या आधारे टेबलमध्ये नोट्स काढून अभ्यास करता येईल.

पायाभूत सुविधांसाठीचा वित्तपुरवठा हा मुद्दा आवश्यकता, समस्या, आव्हाने आणि सार्वजनिक – खासगी क्षेत्र भागीदारी (PPP), थेट परकीय गुंतवणूक व विकासाचे खासगीकरण इत्यादी पर्याय या मुद्द्यांच्या आधारे अभ्यासावा. याबाबतची सध्या लागू असलेली व ठळकपणे योगदान देणारी जुनी अशा दोन्ही प्रकारची केंद्र आणि राज्य सरकारची शासकीय धोरणे यांचा अभ्यास आवश्यक आहे.

सहकार:

सहकार ही संकल्पना, तिचा अर्थ, विकास, तिची उद्दिष्टे, सहकाराची नवीन तत्त्वे हे पारंपरिक मुद्दे आधी अभ्यासायला हवेत. त्यानंतर महाराष्ट्र आणि भारतातील सहकार चळवळीची वाढ व विविधीकरण लक्षात घ्यावे.

सहकार क्षेत्राबाबत राज्याचे धोरण आणि कायदे, यांतील तरतुदी समजून घ्यायला हव्यात.

सहकारी संस्थांचे पर्यवेक्षण, लेखापरीक्षण याबाबतच्या तरतुदी माहीत करून घ्याव्यात.

महाराष्ट्रातील सहकार क्षेत्रासमोरील समस्या अभ्यासताना सर्वसाधारणपणे या क्षेत्रालाच जाणवणाऱ्या समस्या आणि विशिष्ट क्षेत्रातील सहकारी संस्थांच्या स्वतःच्या समस्या अशा दोन्ही आयामांनी विचार करावा. या समस्यांची करणे, स्वरूप, परिणाम आणि उपाय असे मुद्दे लक्षात घ्यावेत.

जागतिक स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर सहकाराचे भवितव्य हा मुद्दा विश्लेषणात्मक आणि चालू घडामोडींवर आधारित असा आहे. याच्या तयारीसाठी संकल्पनात्मक अभ्यास पक्का असणे आवश्यक आहे.

महाराष्ट्राची अर्थव्यवस्था:

राज्यातील कृषी, उद्योग व सेवा क्षेत्राची वैशिष्ट्ये, त्यांचे राज्याच्या रोजगारनिर्मिति, GDP, परकीय व्यापार यातील योगदान, त्यांची अद्ययावत आकडेवारी असे मुद्दे पाहायला हवेत.

महाराष्ट्र सरकारची कृषी, उद्योग व सेवा क्षेत्रासाठीची धोरणे अभ्यासताना त्यांची पार्श्वभूमी, उद्दिष्टे, साध्ये, मूल्यमापन हे मुद्दे पाहावेत.

उर्वरित भारताच्या तुलनेत महाराष्ट्र हा मुद्दा त्या त्या वर्षीच्या आर्थिक पाहणी अहवालामधून अभ्यासणे व्यवहार्य ठरेल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वरील मुद्दे हे एकाच वेळी पारंपरिक व अद्ययावत मुद्दे अशा दोन्ही आयामांनी अभ्यासणे आवश्यक आहे. त्यामुळे आधी मूलभूत संकल्पना समजून घेऊन त्या त्या क्षेत्रामध्ये त्या त्या मुद्द्याबाबत घडणाऱ्या ठळक चालू घडामोडी माहीत करून घेणे आवश्यक आहे.