सागर भस्मे

मागील लेखातून आपण वाळवंटी प्रदेशात पाण्यामुळे निर्माण होणाऱ्या भूरूपांविषयी माहिती घेतली. या लेखातून आपण सागरी लाटांच्या निक्षेपणामुळे निर्माण होणाऱ्या भूरूपांविषयी जाणून घेऊया.

पुळण (Beaches)

ज्यावेळी समुद्रामध्ये लाटा स्वतःबरोबर खडकाचे तुकडे आणि वाळूंचे कण घेऊन येतात, तसेच ज्यावेळी समुद्राच्या उथळ भागात लाटांचा वेग कमी होतो, त्यावेळी बरोबर आणलेल्या गाळाचे निक्षेपण होऊन, ज्या भागाची निर्मिती होते त्याला ‘पुळण’ असे म्हणतात. तरंगघर्षीत जबुतर्‍यावर लाटांमुळे वाहत येणाऱ्या पदार्थाच्या निक्षेपणामुळे बनलेला पुळण तात्कालीक स्वरूपाचा असतो. पुळणच्या निर्मितीसाठी लाटांबरोबर वाहून येणाऱ्या गाळाचे प्रमाण, लाटांची तीव्रता हे दोन घटक अतिशय महत्त्वाचे आहेत.

हेही वाचा – UPSC-MPSC : पठार म्हणजे काय? त्याचे प्रकार कोणते?

तरंगनिर्मित चबुतरा ( Wave Build Tarrace )

सागरी लाटांबरोबर वाहणारे पदार्थ परत जाणाऱ्या लाटांद्वारे समुद्राकडे वाहत जाऊन लाटांचा वेग मंदावल्यानंतर काही पदार्थांचे निक्षेपण समुद्राच्या उथळ भागात होते. या निक्षेपणातून कालांतराने समुद्रबुडास एका चबुतऱ्यासारखा आकार प्राप्त होतो, त्याला तरंगनिर्मित चबुतरा, असे म्हणतात.

वाळूचे दांडे ( Barriers )

लाटांनी वाहून आणलेल्या गाळाचे सागराच्या उथळ भागांमध्ये निक्षेपण होऊन किनाऱ्याला समांतर अशी कटक म्हणजे उंचवट्याची निर्मिती होते. कालांतराने त्या साठवलेल्या गाळाची उंची वाढत जाऊन किनाऱ्याला समांतर टेकड्या निर्माण होतात, त्यांनाच ‘वाळूचे दांडे’ असे म्हणतात. हे वाळूचे दांडे किनाऱ्याजवळ किंवा किनाऱ्यापासून दूर किंवा किनाऱ्याला समांतर किंवा लंबरूपीही असू शकतात. या वाळूच्या दांड्यांमुळे सागरी मार्गाने होणाऱ्या जलवाहतुकीमध्ये अडथळा निर्माण होतो.

खाजन ( Lagoon )

जेव्हा वाळूचा दांडा व भूसंलग्न दांडा निर्माण करणारी लाटांची क्षमता अधिक होऊन भूसंलग्न दांड्याचे समुद्रात शिरलेले तोंड अधिक कलते व ते समुद्रकिनाऱ्यात जाऊन मिळते आणि वाळूचे दांडे व सागर किनाऱ्यांच्यादरम्यान खाऱ्या पाण्याची उथळ सरोवर निर्माण होतात, अशा सरोवराला ‘खाजण’ असे म्हटले जाते. भारतामध्ये ओरिसाच्या किनाऱ्यालगत चिलखा, तर तामिळनाडूच्या किनाऱ्यावर पुलिकत सरोवर हे खाजण सरोवराचे उदाहरण आहे.

भूसंलग्न दांडा ( Split )

जर वाळूच्या दांड्याच्या निर्मितीमध्ये एक टोक समुद्रकिनाऱ्याला जोडले आणि दुसरे टोक खुल्या समुद्रामध्ये असेल तर त्याला भूसंलग्न दांडा असे म्हणतात. भूसंलग्न दांड्याचे भूरूप दंतूर किनाऱ्यावर मोठ्या प्रमाणात आढळते.

भूसंलग्न दांड्याचे खालील चार प्रकार पडतात.

हूक (Hook) : भूसंलग्न दांड्याचा जो समुद्राकडील भाग असतो, तो वक्राकार होऊन किनार्‍याकडे वळल्यास त्याला एखाद्या हुकासारखा आकार प्राप्त होतो, म्हणून अशा दांड्यास हूक असे म्हटले जाते.

संयुक्त हूक ( Compound Hook ) : भूसंलग्न दांड्यातील समोरच्या भागांमध्ये अनेक फाटे फुटून ते वक्राकार होऊन समुद्राच्या किनाऱ्याकडे वळतात, तेव्हा त्याला संयुक्त हूक असे म्हटले जाते.

वक्राकार दांडा ( Looped ) : ज्यावेळेस दांड्याच्या अंकुशाचा आकार किनाऱ्याकडे वाढत जाऊन किनार्‍यास मिळतो आणि एका वर्तुळाकार भूरूपाची निर्मिती करतात, तेव्हा त्या वर्तुळाकार भूरूपाला वक्राकार दांडा असे म्हणतात.

संयोजक दांडा ( connecting bar ) : ज्यावेळेस एखादा भूसंलग्न दांडा आणि बेटापासून भूभागाकडे वाढत जाणारा दांडा जेव्हा एकमेकांमध्ये मिसळतात, तेव्हा त्या दांड्याला संयोजक दांडा असे म्हटले जाते. संयोजक दांड्यामुळे समुद्रकिनारा व सागरातील बेटे यांच्या दरम्यान एक वाळूचा मार्ग निर्माण होतो.

हेही वाचा – UPSC-MPSC : वाळवंटी प्रदेशात पाण्यामुळे भूरूपे कशी निर्माण होतात?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सागर किनारी वालुकागिरी ( Coastal Sand Dunes ) :

सागर किनाऱ्यावर साचलेली वाळू वाऱ्याने ढकलली जाऊन लहान मोठ्या आकाराच्या टेकड्या तयार होतात, त्याला सागर किनारी वालुकागिरीची असे म्हणतात. वालुकागिरीची निर्मिती वारे, गाळाचा पुरवठा आणि जवळच्या किनार्‍याचे आणि समुद्रकिनाऱ्यावरील वातावरणातील भूरूपविज्ञान यांच्यातील गुंतागुंतीच्या परस्पर संवादावर अवलंबून असते. सर्वात मूलभूत स्तरावर समुद्रकिनाऱ्यावरील गाळाच्या थेट पुरवठ्यातून प्राथमिक ढिगारे तयार होतात, याची उंची २० ते ४० मीटरपर्यंत असू शकते.