मागील काही लेखांतून आपण शाहूराजे व महाराणी ताराबाई यांच्यातील संघर्ष, पेशवेपदाची सुरुवात, पहिले बाजीराव यांची कारकीर्द व पानिपतचे युद्ध यांच्याबाबत माहिती घेतली. या लेखातून आपण मराठा राज्याच्या अस्ताबाबत जाणून घेऊ या ….

पानिपतच्या युद्धातील पराभवानंतर इ.स. १७६१ मध्ये बाळाजी बाजीराव यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात माधवराव पेशवा झाले. माधवराव एक मुत्सद्दी राजकारणी होते. त्यांनी म्हैसूरच्या हैदरअलीला खंडणी देण्यास भाग पाडले. तसेच शहाआलम याला मुघल बादशहा बनवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. त्यामुळे हा मुघल बादशहा एक प्रकारे मराठ्यांच्या हातचा बाहुलाच बनला. माधवरावांनी उत्तर भारतावर पुन्हा मराठ्यांचे वर्चस्व स्थापन करण्याचा प्रयत्न केला. मात्र, इ.स. १७७२ मध्ये क्षयरोगाने त्यांचे निधन झाले.

हेही वाचा – UPSC-MPSC : आधुनिक भारताचा इतिहास : मुघलांच्या पतनानंतर उदयास आलेली राज्ये – भाग ६

माधवरावांच्या निधनानंतर रघुनाथराव आणि नारायणराव यांच्यात पेशवेपदासाठी संघर्ष सुरू झाला. यात नारायणरावांना यश मिळाले. ते पेशवा झाले; मात्र पेशवा झाल्यानंतरही त्यांच्यातील संघर्ष सुरूच होता. काही दिवसांतच या संघर्षाला हिंसक वळण लागले. इ.स. १७७३ मध्ये नारायणरावांची हत्या करण्यात आली. त्यांच्या निधनानंतर त्यांचा मुलगा सवाई माधवराव पेशवा झाले. मात्र, सवाई माधवराव अल्पवयीन असल्याने वास्तविक सत्ता ही नाना फडणवीस यांच्या हातात होती. अखेर रघुनाथरावांनी इंग्रजांशी हातमिळवणी करत पेशवेपद मिळवण्याचा प्रयत्न केला. याच संघर्षातून पुढे मराठा आणि ईस्ट इंडिया कंपनी यांच्यात तीन युद्धे झाली. या युद्धांना इतिहासात ‘अँग्लो-मराठा’ युद्ध या नावाने ओळखले जाते.

पहिला अँग्लो-मराठा युद्ध इ.स. १७७५ ते १७८२ दरम्यान झाले. या युद्धाचा शेवट सालबाईच्या तहाने झाला. यावेळी ग्वाल्हेरच्या सिंधिया यांनी मध्यस्थी केली. पुढे बाजीराव द्वितीय पेशवा झाले. त्यांच्याच काळात मराठा साम्राज्याचे विभाजन होत सिंधिया, गायकवाड, होळकर, भोसले अशी अर्धस्वतंत्र राज्ये उदयास आली. या राज्यांची पेशव्यांवरील निष्ठा नाममात्र होती. पुढे जाऊन ही राज्ये आपल्यावरच आक्रमण करतील या भीतीने बाजीराव द्वितीयने ब्रिटिशांशी एक तह केला. या तहाला इतिहासात ‘बेसिनचा तह’ असे म्हणतात. या तहानुसार ब्रिटिशांनी बाजीराव द्वितीय याच्या सुरक्षेसाठी ६० हजार सैनिकांची तुकडी तैनात केली. त्या बदल्यात बाजीराव द्वितीयने २६ लक्ष रुपयांचे वार्षिक उत्पन्न असलेला प्रदेश ब्रिटिशांना दिला. ‘बेसिनचा तह’ हा अतिशय महत्त्वाचा तह मानला जातो. कारण या तहाने ब्रिटिशांना मराठ्यांच्या अंतर्गत बाबाींमध्ये हस्तक्षेप करण्याची संधी मिळाली.

हेही वाचा – UPSC-MPSC : आधुनिक भारताचा इतिहास : मुघलांच्या पतनानंतर उदयास आलेली राज्ये – भाग ७

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, बाजीराव द्वितीय आणि ब्रिटिश यांच्यामध्ये झालेला ‘बेसिनचा तह’ सिंधिया, होळकर, गायकवाड, भोसले यांसारख्या अर्धस्वतंत्र राज्यांना मान्य नव्हता. यावरून ब्रिटिश आणि या राज्यांमध्ये संघर्ष सुरू झाला. या संघर्षातून इ.स. १८०३ ते १८०६ दरम्यान दुसरे अँग्लो – मराठा आणि इ.स. १८१७ ते १८१८ मध्ये तिसरे अँग्लो – मराठा युद्ध झाले. ब्रिटिशांनी एक-एक करून सर्वच अर्धस्वतंत्र राज्यांचा पराभव केला. तसेच भोसले यांच्याबरोबर देवगावचा तह, सिंधिया यांच्याबरोबर सुर्जी अर्जन गावचा तह, होळकरांशी राजापूर घाटचा तह, तसेच पेशव्यांशी पुण्याचा तह केला. पुण्याच्या तहानुसार ब्रिटिशांनी बाजीराव द्वितीय याला कानपूरजवळील बिठुर या ठिकाणी पाठवले. तसेच त्याला पेन्शन देण्याचे कबूल केले. या तहानेच पेशव्यांची सत्ता संपुष्टात आली.