News Flash

करिअरमंत्र

जाहिरात संस्थांना चांगल्या भाषांतरकारांची गरज भासते.

 

मी हिंदी विषयात एम.ए. केले आहे. तसेच विशेष शिक्षणात डी.एड (व्हिज्युएल एम्पेअरमेंट)केले आहे. करिअर उत्तम बनवण्यासाठी मी पुढे काय करू?                          

उमाकांत कांबळे

आपले हिंदी भाषेवर प्रभुत्व असल्यास आपण पत्रकारिता आणि हिंदी वृत्तवाहिन्यांच्या क्षेत्रात करिअर करू शकता. अध्यापनाच्या क्षेत्रात आवड असल्यास नेट/सेट करून शासकीय महाविद्यालयांमध्ये नोकरी मिळवू शकता. जाहिरात संस्थांना चांगल्या भाषांतरकारांची गरज भासते. हिंदी भाषेत नागरीसेवा परीक्षासुद्धा तुम्हाला देता येईल. आकाशवाणी वा एफ.एम. चॅनेल्सवर हिंदी भाषेवर प्रभुत्व असलेल्या रेडिओ जॉकींची गरज सातत्याने भासते. या संधीसुद्धा तुम्हाला मिळू शकतात. तुम्ही ज्या विषयात डी.एड (व्हिज्युएल एम्पेअरमेंट) केले आहे, त्या अनुषंगाने तुम्हाला नोकरीच्या संधी थेट मिळतील असे संभवत नाही. त्यासाठी तुम्हाला अशा शैक्षणिक अर्हतेच्या पदांकडे सातत्याने लक्ष ठेवावे लागेल. पदे कमी आणि उमेदवार अधिक ही बाब या क्षेत्रातही लागू असल्याने, मोठय़ा स्पर्धेला तोडे द्यावे लागेल ही बाब लक्षात ठेवावी.

 

मी संगणक अभियांत्रिकी पदवीधर आहे. मी पदविका अभियांत्रिकी महाविद्यालयात दहा वर्षे लेक्चरर म्हणून काम केले आहे. मला आता माझी नोकरी सोडून लहान उद्योग स्थापन करायचा आहे. किंवा माझी शैक्षणिक अर्हता आणि अनुभव लक्षात घेऊन अंशकालीन काम करायचे आहे. त्या दृष्टीने मला मार्गदर्शन कराल का?                  

प्राजक्ता यादव

आपणास अध्यापनाच्या क्षेत्रातून नेमके कशासाठी बाहेर पडायचे आहे, ही बाब स्पष्ट होणे आवश्यक आहे. तुम्हाला शिकवण्याचा आनंद मिळत नाही की तुम्ही सध्या काम करत असलेल्या महाविद्यालयाचे व्यवस्थापन तुमच्या परिश्रमाचे तुम्हास अपेक्षित असलेले वेतन देत नाही. शासकीय शिक्षणसंस्था व काही नामवंत खासगी संस्था वगळल्यास अपेक्षित वेतन मिळणे ही स्वप्नवत बाब आहे. दहा वर्षांनंतर नोकरी सोडण्याचा निर्णय आपण आपल्या कुटुंबीयांच्या सल्लामसलतीनेच घेतला असण्याची शक्यता आहे. तसे असेल तर ही नोकरी सोडण्याचे वित्तीय तोटेसुद्धा आपण लक्षात घेतले असतील. एकाएकी कमी होणारा वित्तीय ओघ कोणत्याही प्रकारची अडचण निर्माण करणारा नसल्याची आपली व आपल्या कुटुंबीयांची खात्री असल्यास आपण लघुउद्योग किंवा अंशकालीन कामाचा पर्याय स्वीकारावा. आपण अभियांत्रिकी पदवी घेऊन दहा वर्षे झाली आहेत. संगणकीय ज्ञान हे दर सहा महिन्यांनी उन्नत होत असते. त्या दृष्टीने आपण तयार आहात का, ही बाब स्वत:लाच विचारावी. तसे असेल तर आपण संगणकीय ज्ञानावर आधारित विविध प्रकारचे स्टार्टअप सुरू करू शकता. संगणकीय अभियंते सध्या विविध प्रकारच्या दैनंदिन गरजा भागवण्यास साहाय्य करू शकणारे अ‍ॅप्स बनवत आहेत. तुम्हीसुद्धा असा विचार करू शकता. सॉफ्टेवअर टेिस्टगच्या क्षेत्रातही अद्याप संधी मिळू शकते.

 

मी १२ वीमध्ये आहे. मला इंटिरिअर डिझाइन डिप्लोमा करता येईल का?

अश्विन सोनोने

तुम्ही इंटिरिअर डिझाइन पदविका किंवा पदवी अभ्यासक्रम करू शकता. चांगल्या संस्थेतील हा अभ्यासक्रम केल्यास उत्तम करिअर करता येणे शक्य आहे. काही महत्त्वाच्या संस्था-

(१) नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ डिझाइन- http://www.nid.edu/,

(२) इंडस्ट्रियल डिझाइन सेंटर- स्कूल ऑफ डिझाइन आयआयटी मुंबई http://www.idc.iitb.ac.in/

(३) एमआयटी इन्स्टिटय़ूट ऑफ डिझाइन- http://www.mitid.edu.in/

(४) सिम्बॉयसीस ऑफ डिझाइन- http://sid.edu.in/

तुमचे अभ्यासक्रम अथवा करिअरसंबंधीचे प्रश्न career.vruttant@expressindia.com या पत्त्यावर पाठवा.)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 16, 2017 12:24 am

Web Title: career guidance 19
Next Stories
1 नोकरीची संधी
2 एमपीएससी मंत्र  : इतिहासाचा अभ्यास
3 नोकरीची संधी
Just Now!
X