सामान्य अध्ययन पेपर एक आणि दोन यांचे आयोग आणि उमेदवार यांच्या दृष्टिकोनातून वेगवेगळे महत्त्व आहे. आयोगाला पेपर एकमधून उमेदवारांची माहिती आणि महत्त्वाच्या विषयांबाबतची सजगता तपासायची असते, तर पेपर दोनमधून उमेदवारांची आकलनक्षमता, तर्कक्षमता आणि व्यवस्थापकीय निर्णयक्षमता तपासायची असते. उमेदवारांच्या दृष्टिकोनातून पेपर एकमध्ये पारंपरिक पद्धतीने उत्तरे शोधण्याची लवचीकता बऱ्याच प्रमाणात मिळते, तर पेपर दोनमध्ये पाच निगेटिव्ह मार्किंग नसलेले प्रश्न मदतीस येतात. तसेच ज्या विषयांवर पकड आहे अशा विषयांवरील उतारे आणि चांगला सराव असलेले ठरावीक पद्धतीचे बुद्धिमत्ता चाचणीचे प्रश्न आत्मविश्वास वाढवतात. रूढार्थाने पेपर एकपेक्षा जास्त लांबीचा, जास्त अवघड, जास्त आव्हानात्मक समजला जाणारा पेपर दोन हा वास्तवात मात्र परीक्षा उत्तीर्ण होण्यामध्ये जास्त योगदान देतो. सन २०१३ पासूनच्या राज्यसेवा पूर्वपरीक्षेतील कट ऑफ लाइन १७७, १३८, १२५, १५३ अशी दिसते. या गुणांचे विश्लेषण केले असता उमेदवारांना पेपर एकमध्ये सर्वसाधारणपणे ६० ते ८५ तर पेपर दोनमध्ये ७० ते १२० पर्यंत गुण मिळाले आहेत. त्यामुळे सी सॅट हा विषय कोणतेही दडपण न घेता अभ्यासायचा आणि सोडवायचा विषय आहे हे नेहमी लक्षात ठेवावे.

या पेपरमध्ये जास्तीत जास्त मार्क मिळवायचे असतील तर सरावाशिवाय पर्याय नाही. हा सराव केवळ बरोबर उत्तरे शोधण्यापुरता मर्यादित असून चालणार नाही. वेळेचे नियोजन करून बरोबर उत्तरे शोधण्याचे तंत्र आत्मसात करावे लागेल. यासाठी सर्वात सोपा आणि परिणामकारक पर्याय म्हणजे मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका. या प्रश्नपत्रिका वेळ लावून सोडवून पाहाव्यात आणि मिळालेल्या गुणांचे विश्लेषण करावे. यातून कमी आणि जास्त गुण देणारे घटक ओळखण्यास मदत होईल. कोणत्या घटकावर आपले प्रभुत्व आहे, कोणता घटक अजून तयारी केल्यास जमू शकतो, कोणता घटक खूपच अवघड वाटतो या बाबी व्यवस्थित समजून घ्याव्यात. या विश्लेषणातून तयारीची दिशा ठरविण्यास मदत होते. यामध्ये सर्वात जास्त भर द्यावा थोडय़ाफार तयारीने आत्मविश्वास वाढू शकेल अशा घटकांवर, त्यानंतर आत्मविश्वास असलेल्या घटकांच्या सरावावर. पेपर दोनमध्ये ५६ पानी पेपर व ऐन वेळी आकलन व विश्लेषण करून सोडविण्याचे प्रश्न असे स्वरूप असल्याने खूपच कठीण वाटणारे प्रश्न ऐन वेळच्या तयारीचा भाग होऊ शकत नाहीत. अशा घटकांसाठी थोडा जास्त वेळ लागतो व दीर्घकालीन व्यवस्थापनामध्ये त्यांचा समावेश असणे आवश्यक असते.

सी सॅटमध्ये जर १०० ते १२५ पर्यंत गुण प्राप्त करायचे असतील तर साधारणपणे ४० ते ५० प्रश्न बरोबर येणे आवश्यक असते. आयोगाचा पेपर साधारणपणे ५६ पानांचा असतो आणि तो १२० मिनिटांत वाचून सोडवायचा असतो. त्यामुळे वेळेचे आणि घटकांचे नियोजन ही हा पेपर सोडविण्याची गुरुकिल्ली आहे. आयोगाचा इतका विस्तृत पेपर सलग सोडवत गेले तर ८० व्या प्रश्नापर्यंत पोहोचण्यासाठी दिलेला वेळ कधीच पुरणार नाही. उमेदवारांचा हा अनुभव आहे की, सलग क्रमाने प्रश्न सोडविल्यास काही प्रश्न हमखास सोडवायचे राहून जातात. यासाठी अवघड वाटणारे उतारे आणि प्रश्न बाजूला ठेवून गुण मिळवून देणारे प्रश्न आधी सोडविणे आवश्यक असते. पुरेसा सराव केलेला असेल तर उतारा किंवा प्रश्नाच्या सुरुवातीलाच तो वेळेत सोडविता येईल की नाही हे चटकन   लक्षात येते.

अवघड प्रश्न/ उतारा बाजूला ठेवून गुण देणाऱ्या प्रश्नाकडे वळता येते. वेगवेगळ्या कट ऑफचा विचार करता उत्तीर्ण होण्यासाठी निगेटिव्ह मार्किंगचे गुण वजा करता एकूण किमान ३५ ते ४० प्रश्नांचे गुण आवश्यक असतात. या दृष्टीने शेवटचे पाच प्रश्न वगळता आणखी किमान ६० ते ६५ प्रश्न सोडविणे आवश्यक असते. निगेटिव्ह मार्किंग नसलेले प्रश्न आधीच सोडवून घेऊन मग उरलेल्या पेपरमधील ६०-६५ प्रश्न सोडवण्याची पद्धत प्रभावी ठरते.

सी सॅट हा बुद्धिमत्तेचा कस पाहणारा नाही तर सर्व अभ्यास तंत्रांचा कस पाहणारा विषय आहे. त्यामुळे स्वतची अभ्यासतंत्रे विकसित करण्यासाठी प्रश्नपत्रिका सोडवून आपापले कच्चे दुवे हेरून घ्यावेत, त्यांची तयारी करावी. सराव प्रश्नपत्रिकांमधून आपली तयारी जास्त परिणामकारक करून घ्यावी. या दृष्टीने राष्ट्रचेतना प्रकाशनाचे राज्यसेवा अभ्यास प्रश्नपत्रिका हे पुस्तक उपयोगी ठरेल. जितका पेपर सोडविण्याचा सराव जास्त असेल तितक्या प्रमाणात यशाची शक्यता जास्त असते. परंतु जेवढय़ा प्रश्नपत्रिका सोडविल्या असतील त्यांचे विश्लेषण करून स्पध्रेत आपण कुठे आहोत आणि अजून किती आणि कोणती तयारी गरजेची आहे याचा वारंवार आढावा आवश्यक आहे.