सर्वसामान्यपणे ‘गाठोडे’ हा शब्द म्हटला की माझ्या डोळ्यांसमोर बोहारीणच येते. जुने कपडे देऊन घासाघीस करून अगदी चकचकीत स्टीलची नवी भांडी मिळाली की आपल्याही चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहतो. हा आनंद दोन कारणांसाठी. घरातील अडगळ निघाल्याचा आणि काही नवीन मिळाल्याचा!
सहज मनात विचार आला. आपण सगळेच आपल्याबरोबर वासनांचे गाठोडे घेऊनच जन्माला आलो आहोत. ‘वासनाक्षय’ म्हणजे हळूहळू घरातील रद्दी बाहेर काढणे. या वासनांचे गाठोडे सहजपणे बाहेर निघत नाही. वासना वळण देऊनच बाहेर काढाव्या लागतात. रिप्रेशन म्हणजे दाबून टाकणे आणि चॅनेलायजेशन म्हणजे वळण लावणे, तिसरे म्हणजे डिफेन्स रिअ‍ॅक्शन. बेलसरे फार सुंदर सांगतात, प्रपंचात राहूनच हे करणे शक्य आहे. तुकारामांनी आपले गाठोडे रिकामे करण्यासाठी पांडुरंगाचा रस्ता धरला आणि म्हणाले. ‘माझे मनोरथ पावविले जैं सिद्धी, माझ्या वासना सिद्धी पावल्या आणि समाधाने जीव राहिला निश्चल’. जीव समाधानी झाला. म्हणजे वासनांचे गाठोडे रिकामे केल्यावर मिळते ती शांती, तृप्ती आणि समाधान आणि परमानंद!
कटी चक्रासन
आज आपण कटी चक्रासन करू या. दोन्ही पायांत अंतर घेऊन दंडस्थितीत उभे राहा. आता डावा हात उजव्या खांद्यावर ठेवा आणि उजवा हात पाठीमागे घ्या. आता उजव्या खांद्यावरून जास्तीतजास्त मागे पाहण्याचा प्रयत्न करा. अंतिम स्थितीत मानेला व पोटाच्या स्नायूंना बसणारा पीळ यांवर लक्ष एकाग्र करा. श्वास रोखू नका. विरुद्ध बाजूला ही कृती पुन्हा करा. या आसनाच्या सरावाने कंबर, पाठ, मान यांतील स्नायू सक्षम होतात. आळस काढण्यासाठी, तणावमुक्तीसाठी हे आसन उपयुक्त आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आनंदाची निवृत्ती – इंटरनेटची किमया
छाया देशपांडे
मी टेलिफोन खात्यात ३७ वर्षे नोकरी केली. त्या काळात घर आणि नोकरी सांभाळून आपण काही तरी वेगळे शिकावे, अशी मनापासून इच्छा होती. पण रोजच्या तारेवरच्या कसरतीत ते काही जमले नाही. पण निवृत्तीनंतर मात्र बऱ्याच नवीन गोष्टी शिकण्यात रस घेतला. उदा. बागकाम, ब्रेललिपी शिकणे इत्यादी परंतु आजारपणामुळे त्या गोष्टीही अर्धवटच राहिल्या.
मग लक्षात आले, नवीन पिढीच्या बरोबर राहण्यासाठी संगणक येणे आवश्यक झाले आहे. योगायोग असा की माझ्या सुनेने कॅनडातून येताना, ‘आई तुमच्यासाठी काय आणू’, असे विचारले. मी तत्काळ तिला संगणक आणण्याची आज्ञा देऊन टाकली आणि ती खरोखरच नवा कोरा लॅपटॉप घेऊन आली.
 मी जरी नोकरी करीत होते तरी आमच्या आयुष्यात त्यावेळी इंटरनेटचा प्रवेश झाला नव्हता. त्यामुळे त्याबद्दल आमची पाटी कोरीच होती. सुनेने तिच्या धावत्या भेटीत मला संगणक कसा ओपन करावा, इंटरनेट सुविधा व स्काइप कसा चालू करावा इत्यादी प्राथमिक गोष्टी शिकविल्या. त्या माहितीच्या आधारे मी सर्वज्ञ झाले, असे मला वाटले, पण प्रत्यक्ष संगणक वापरताना अनेक अडचणी आल्याने ते सहज भाजी करण्याइतके सुलभ नाही हे लक्षात आले. मी संगणक माहितीचे पुस्तक आणले पण मला ते उमगेना. माझी ही फजिती पाहून अनेकदा माझी नातवंडे गालातल्या गालात हसत. पतिराज तर मी संगणक मागवून मोठा गुन्हा केलाय असेच जणू डोळे मोठे करून सांगायचे. आपली कुवत नसताना एवढय़ा महागडय़ा वस्तू आणण्याचा कशाला घाट घालावा, असे भाव मला त्याच्या चेहऱ्यावर दिसायचे.
 पण मी चिकाटी सोडली नाही. कोणी ‘वंदा वा निंदा’ मी प्रयत्न करीतच राहिले. अनेकांबरोबर चर्चा करून संगणकाच्या क्लासला दाखल झाले. त्या शिक्षिकेला माझे कौतुक वाटले. या वयात माझी नवीन शिकायची तयारी बघून तिने माझे अभिनंदन केले. शिकताना वर्गात सर्व समजले असे वाटायचे, पण बाई उजळणी घ्यायला लागल्या की ‘पुढे पाठ मागे सपाट’ अशी अवस्था होत असे. पण मी हार मानली नाही. मला ‘इंग्लिश विंग्लिश’ या सिनेमाची आठवण झाली. मग कारण नसताना मी अनेकांना मेल पाठवायला, सोबत फोटोज् पाठवायला सुरुवात केली. त्या बरोबरीने गुगल सर्च करणे त्यातून वेगवेगळय़ा साइट्स बघणे सुरू केले.
मी आता फेसबुक अकाऊंटही मी ओपन केले आहे. फेसबुकवर माझे नाव व फोटो बघून परदेशातील बालगोपालांनी कौतुक केले. प्रत्येक जण मला ‘हाय’ करीत होते, पण मला कुठे चॅटिंग करता येत होते! मग त्यासाठी मी मदत घेतली, माझ्या सोसायटीतील बालमित्रांची. प्रशांत आणि अक्षय यांना अनेक शंका विचारून मी त्रास देत असे, पण तेही कौतुकाने, न कंटाळता माझ्या शंकांचे निरसन करायचे, आजही करतात. आता मला बऱ्याच गोष्टी समजावयास लागल्या व चुकीच्या दुरुस्त्या करता येऊ लागल्या.
 एकदा गुगलवर सर्च करून प्र.के.अत्रे व पु.ल. देशपांडे यांची भाषणे ऐकली व मला संगणक शिकल्याचा मनापासून आनंद झाला. माझा मुलगा ‘कॅनडात ये’ असे आमंत्रण देतो तेव्हा ‘नायगरा फॉल्सचे दर्शन’ मी माझ्या संगणकावर घेते, असे विनोदाने सांगते.
 नवीन पिढीच्या बरोबर आपण राहिल्यास त्यांना मनापासून आनंद होतो, हे मी स्वानुभवाने सांगते. माझी सून तर तिने दिलेल्या संगणकाचा योग्य प्रकारे उपयोग करते त्यामुळे माझ्यावर फिदा आहे.

More Stories onयोगाYoga
मराठीतील सर्व आनंद साधना बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The best yoga poses
First published on: 19-07-2014 at 01:01 IST