13 July 2020

News Flash

सत्संगाचे डोही आनंद तरंग?

समाजात अनेक बाबा, महाराज, बापू, माँच्या सत्संगाचं प्रस्थ वाढताना दिसत आहे. अक्षरश: हजारो, लाखोंच्या संख्येने त्यांचे अनुयायी असतात.

| August 29, 2015 02:00 am

समाजात अनेक बाबा, महाराज, बापू, माँच्या सत्संगाचं प्रस्थ वाढताना दिसत आहे. अक्षरश: हजारो, लाखोंच्या संख्येने त्यांचे अनुयायी असतात. फक्त काही काळासाठी नाही तर वषरेनुवर्षे ते त्यांच्या भजनी लागतात. अशी वेळ त्यांच्यावर का यावी? स्वत:चे प्रश्न सोडवायला कुणा बाबा, महाराजांचाच आधार का घ्यावासा वाटतो? आजच्या आत्मविश्वास नाही, न्यूनगंड बळावला आहे अशा दयनीय स्थितीपासून ‘भक्ता’ला सुटका हवी असेल तर विवेकी विचार आणि साक्षेपी प्रयत्न करायला हवेत.
स ध्या वृत्तपत्रांमध्ये भोंदू साधू, साध्वी यांच्या बातम्या येत आहेत. हे साधू देवाचे नाव घेतात, धर्माचे कारण सांगतात, सत्संग भरवतात. तिथे हजारो चाहते जमा होतात. साधू चमत्कार करून दाखवितात, भक्त मंडळी जयजयकार करतात. त्यांच्या पाया पडतात. तथाकथित साधू-साध्वी स्वत:ची तुंबडी भरून घेतात. या सर्वामागे खूप मोठे अर्थकारण, समाजकारण आणि राजकारण असते, पण ते क्वचितच उघडकीला येते. यांच्या अनुयायांमध्ये भारी पदधारी, श्रीमंत व्यापारी, राजकीय पुढारी, बडे कारखानदार असेही असतात. पण बहुसंख्य असतात ते मात्र सामान्य, साधे लोक. कधी चुकूनमाकून एखाद्या बाबाचे गैरव्यवहार प्रकाशात येतात. जनमानसामध्ये तेवढय़ापुरती चलबिचल होते. थोडय़ा काळात ती निवळते. सर्व उद्योग पूर्ववत चालू लागतात. या सर्व प्रकारामागे आहे ती वैयक्तिक आणि सामाजिक मानसिकता, ज्याचा मात्र कुणीही गांभीर्याने विचार करत नाही.

माणसाचे मन हे व्यक्तिमत्त्वाचे मुख्य कार्याधिकारी आहे. काही मने सशक्त असतात, काही अशक्त. काही निरोगी तर इतर रोगी; काही स्वावलंबी, इतर काही परावलंबी. काही धाडसी, काही भित्री. काही विचारी तर इतर अविचारी. काहींचे डोळे उघडे तर कुणाच्या डोळ्यावर झापडे. या विशेषणांपैकी दुसऱ्या क्रमांकावर जी आहेत ती बुवाबाजी व भोंदूगिरीला बळी पडतात. म्हणजे अशक्त, रोगी, परावलंबी, भित्री, अविचारी आणि डोळ्यावर झापडे लावलेली मने बुवाबाजीला बळी पडतात. जे सशक्त आहेत ते स्वत:च्या बळावर जगतात.

‘शक्तीने मिळती राज्ये। शक्ती नसतां विटंबना।’ असे रामदास म्हणाले होते. शक्तिमान माणसे छाती पुढे काढून जगतात. निर्बल बिचारे सपाट छातीने खांदे टाकून जिणे खेचत राहतात. ज्यांचा स्वत:च्या मनगटावर विश्वास आहे ते बाहुबलावर विजय मिळवतात. पण ज्यांची मनगटेच पिचली आहेत ते काय खाक लढणार? ते हात बांधून शरण जातात. कधी जेत्या राजाला- आता राजे तर उरले नाहीत- मग ते शरण जातात बुवांना आणि बाबांना. बुवा आणि बाबांचे बरे फावते. ते या भोळ्याभाबडय़ा शरणागतांना पूर्ण लुटून घेतात. नोकरी व्यवसायातील प्रश्न, त्यातील यशापयश, नातेसंबंधातील हेवेदावे, त्यातील दु:खं, निराशा हे आयुष्यातले अपरिहार्य घटक असतात. ते आपल्या बळावरच सोडवण्याचा प्रयत्न प्रत्येकाने करायला हवा मग या बुवाबाजीच्या मागे धावण्याची गरज नसते.
आत्मविश्वास
माझ्या स्वत:च्या बळावर माझे जीवन मी घडवीन असे ज्यांना वाटते ते धडाडीने पुढे जातात व यशस्वी होतात. जगण्यावर स्वत:चा ताबा आहे, असे ते मानतात. त्यांना कोणाचे पाय धरावे लागत नाहीत. पण दुसराही एक वर्ग आहे. यामधील लोकांना असे वाटते की आपल्या ताब्यात काहीच नाही, बाहेरची कोणीतरी शक्ती आपले जीवन चालवते. अशा लोकांना कुणाचा तरी आधार लागतो, म्हणजे देवाची कृपा किंवा कुणा बुवा महाराजांचा आशीर्वाद. ही माणसे भोळसट असतात. जिथे कुठे आश्वासन मिळते तिथे हे लगेच वाकतात. भोंदू महाराजांच्या शिष्यांमध्ये अशा लोकांचे प्रमाण खूप असते.
विवेक वापरा
माणूस इतर सजीवांपेक्षा वेगळा आहे. कारण तो विचार करू शकतो. जो विचार प्रधानतेने जगतो त्याला कुणाच्या आधाराची गरज लागत नाही. पण विचाराचा योग्य वापर करून जगणे सोपे नाही. आपला प्रत्येक विचार तर्कसंगततेच्या निकषावर पारखून घ्यावा लागतो. विवेकी विचाराची पाच लक्षणे थोर मानसशास्त्रज्ञ अल्बर्ट एलिस यांनी सांगितली आहेत. ती अशी- (१) तर्कप्रधानता- विचार तर्काला धरून असावा. (२) पुरावा- विचाराला व्यवहारामधील पुरावा असावा (३) कल्याण- त्या विचाराने भले व्हावे (४) जगण्याचा उत्साह- त्या विचाराने जगण्याची उभारी वाढावी. (५) शरीर व मन यांची वृद्धी त्या विचारामुळे व्हावी. शरीर व मन यांची प्रगती व्हावी, विकास घडावा. या पाच निकषांवर जो खरा ठरतो तोच विचार विवेकी मानावा. त्यानुसार जगावे म्हणजे उत्कर्ष होतो. पण फारच थोडी माणसे हे नियम पाळून विवेकीपणे जगतात. हे नियम न पाळता जगणे म्हणजे अविवेकी जगणे. अविवेकापाठोपाठ अपयश. त्यापाठोपाठ पराभूत मनोवृत्ती येते. अशी माणसे निरनिराळ्या बुवांचे मठ, महाराजांचे आश्रम- तथाकथित सत्संगसभा अशा ठिकाणी गर्दी करतात. व्यावहारिक यशाचे आश्वासन देणारे ते साधू महाराज भाबडय़ा भक्तांना देवदूतच वाटू लागतात. याचा फायदा बाबा आणि बुवा घेतात.विवेक या शब्दाचे अनेक अर्थ आहेत. माणसाची बुद्धी कितपत विकासली आहे, यानुसार ते लागू पडतात. विवेक शब्दाचा साधा अर्थ आहे की, त्या त्या प्रसंगाला योग्य असा विचार करावा, त्यानुसार वागावे. यापेक्षा वेगळे वागणे म्हणजे अविवेक. त्याच्या पुढच्या पायरीवर संतांनी सांगितले आहे की, टिकाऊ व टाकाऊ यात भेद करायला शिक. टिकाऊ ते घेणे, टाकाऊ ते टाळणे म्हणजे विवेक. याउलट टिकाऊ टाकणे आणि टाकाऊघेणे म्हणजे अविवेक. त्याच्या पुढच्या पायरीवर म्हणतात खरे काय व खोटे काय यातील फरक जाण. खरे ते घेणे म्हणजे विवेक. जे खोटे आहे ते उचलणे म्हणजे अविवेक, पुढे सत्य-असत्य विवेक, आत्म-अनात्म विवेक, नित्य- अनित्य विवेक अशा चढत्या क्रमाच्या पायऱ्या सांगितल्या आहेत. याचा उल्लेख येथे अशासाठी केला आहे, की जो माणूस विवेकाने चालतो त्याची प्रपंचामध्ये प्रगती तर होतेच, पण तो अध्यात्म मार्गावरही पुढे जातो. पण जो अविवेकी आहे तो प्रपंचसुद्धा धड करू शकत नाही. अध्यात्म तर दूरच राहिले. तो हरतो, त्याची फसगत होते. असा माणूस निराशेपोटी भोंदू बाबांच्या जाळ्यात अडकतो.
कणखर व्यक्तिमत्त्व
मानसशास्त्राने जिंकणारी माणसे व हरणारी माणसे अशा दोन्ही व्यक्तिमत्त्वांचा अभ्यास केलेला आहे. कणखर माणसे जिंकतात, लेचीपेची माणसे हरतात. कणखरांना कोणाचा आधार लागत नाही.जी मुळातच लेचीपेची आहेत ती भोंदूबाबांची शिकार बनतात. कणखर उभे राहतात; लेचेपेचे खचतात. पहिले लढतात, दुसरे पळ काढतात. पहिले जिंकतात, दुसरे नुसते हरतात असे नाही तर ‘दातींतृण धरून’ शरण येतात. पहिल्यांचे ब्रीदवाक्य असते, ‘आकाशम् अस्मत् सीमा’. दुसरे म्हणतात, ‘आता आम्हाला धरणी पोटात का घेत नाही?’. पहिले जिंकतात व हसतात. दुसरे हरतात व रडतात. हे लेचेपेचे, बिनकण्याचे लोक बुवा आणि महाराजांच्या नादी लागतात.कणखर माणसे स्वत:च्या विचारांची व वर्तनाची जबाबदारी घेतात. लेचीपेची माणसे स्वत:च्या विचारांची मालकी नाकारतात व आपल्या कृत्यांची जबाबदारी दुसऱ्यावर ढकलू पाहतात. म्हणून त्यांना दैव, नशीब, देवाचा कोप अशा प्रकारच्या भोज्जाची गरज भासते.
अंगावर उलटणारी भावविवशता
स्वत:च्या फायद्यासाठी अनेक लुच्चे व्यापारी, बनेल पुढारी आणि इरसाल दलाल भोंदू साधूच्या नादी लागल्याचे नाटक करतात. या सर्वाची एकमेकांत ‘मिलीभगत’ असते. सगळे मिळून भोळसट भक्तांना लुटतात. हे व्यापारी, पुढारी व दलाल हा वर्ग सध्या बाजूला ठेवू. त्यांचे मन कसे काम करते हे सांगता येईल. पण तो या लेखाचा विषय नाही. भोंदू साधूची मानसिकता सांगता येईल. तीसुद्धा बाजूला ठेवू. साधा भोळा भक्त बहुसंख्य आहे. मुख्य करून तो लुटला जात आहे. त्याच्या स्वभावाची अशी काय वैशिष्टय़े असतात की आपण लुटले जाणार आहोत, हे त्याला कळतसुद्धा नाही?भोळा भक्त नावाप्रमाणेच भोळा असतो. जगाचा चांगुलपणा त्याने प्रश्न न विचारता स्वीकारलेला असतो. तो दक्ष नसतो. दक्ष या शब्दाचा अर्थ आहे टक्क जागा, डोळ्यात तेल घालून पहारा देणारा आणि सर्व काही जलद गतीने समजून घेणारा. भोळा भक्त जागरूक तर नसतोच, उलट काहीसा स्वत:च्या तंद्रीत असतो. स्वत:च्या हितावर पहारा देणारा तर नसतोच. हिताबद्दलच्या त्याच्या कल्पनाच मुळात भोंगळ असतात. ‘माझ्या हाताचे काही हिरावले गेले तर जाऊ दे, त्याने कुणाचे तरी भले होत आहे ना, मग ठीक आहे’, असा ढिला युक्तिवाद त्याच्या डोक्यात असतो.त्याची समज जलद गतीने काम करणारी नसते. त्यामुळे चपळ बुद्धीचे दलाल आणि चलाख विचाराचे भोंदू बाबा त्याच्यावर सहज बाजी मारतात. भोळ्या भक्ताची बुद्धी प्रश्नाचे सर्व पैलू एकाच वेळी पाहू शकत नाही. त्याच्या अवधानाची रुंदी (स्पॅन ऑफ अटेन्शन) चुणचुणीतपणे वागण्यास आणि हजरजबाबीपणासाठी कमी पडते. म्हणून तो लबाड लोकांकडून हातोहात बनवला जातो.सर्व प्रश्नांची सोपी उत्तरे त्याला हवी असतात. ‘देवाचे नाव घे म्हणजे सगळे काही ठीक होईल. अमुक विधी कर म्हणजे संकटाचे निवारण होईल. इतके दान दे म्हणजे खूप पुण्य मिळेल. तमुक यात्रा कर म्हणजे पापाचा नाश होईल’ अशी कृतक साधी (सिंप्लिस्टिक) उत्तरे त्याला मनापासून भावतात. त्याच्या या अशक्तपणाचा फायदा बुवाबाज आणि त्यांचे चमचे पुरेपूर घेतात. पुण्य मिळविण्याच्या नादात तो स्वत:ला न झेपणारी दाने देत जातो आणि स्वेच्छेने निर्धन होतो. अर्थात, व्यवहारी जगात एकटा पडतो. आता मदतीला कोणीही येत नाही. भोळसट भक्ताची ही शोकांतिका आहे.
स्वयंसूचनेचा बळी
दुर्दैव हे आहे, की भोळा भक्त स्वयंसूचनेचा बळी असतो. पुण्याबद्दल श्रेय भावना आणि पापाबद्दल अपराधी भाव हे दोन्ही स्वत:च्या मनात काही वाक्ये वारंवार उच्चारून त्याने तयार केलेले असतात. देवाची कृपा, देवाचा कोप, पापापासून सोडवणूक काही विधी करून विकत घेता येते, तसेच पुण्यही खरेदी करून आपल्या खात्यात जमा करता येते असली विधाने स्वत:शी अनंत वेळा बोलून मनात ठोकून बसवलेली असतात. भक्ताचे स्वत:शी भाषण होकारार्थी किंवा वस्तुनिष्ठ करून देणे हे त्यापासून सुटकेचे मूलसूत्र आहे. विवेकी स्वसंभाषण करायला शिकणे हे त्यावरचे उत्तर आहे.‘अरे रे, गरीब बिचारा मी. आता देवच माझा वाली आहे’ असे कमालीचे हताश उद्गार स्वत:शी अगणित वेळा बोलून त्याने आत्मसन्मान आमि आत्मविश्वास शून्यावर आणून ठेवलेला असतो. स्वत:बद्दल कमीपणाच्या भावनेने (न्यूनगंड) तो ग्रस्त असतो. निराशेचे मळभ दाटून आलेले असते. अशा स्थितीत कोणी सोडवणुकीचे शब्द उच्चारले तर ते त्याला खरे वाटतात. ते शब्द आमिष ठरतात आणि भक्ताचा मासा भोंदूंच्या गळाला लागतो.सगळे मिळून भाविकाला जे जसे आहे ते तसे पाहायला शिकविणे, वस्तुनिष्ठ विचार आणि प्रयत्नवादी वर्तन करायला शिकविणे हे या समस्येचे उत्तर आहे. विचारांना विवेकाची आणि वर्तनाला संयमाची चाळणी लावायला तो शिकला तरच या फसवणुकीतून तो बाहेर पडू शकेल.
भोंदूंचा न्यस्त स्वार्थ –
समाजात अनेक कर्मकांडे रुजलेली आहेत. अंधविश्वासाचा अंधार पसरलेला आहे. घातक रूढी धिंगाणा घालत आहेत, कर्मठपणाचे विळखे इतके पक्के झाले आहेत की मोकळा श्वास घेणे अवघड झाले आहे. धर्माधता जोपासली जात आहे. असहिष्णुतेला खतपाणी घातले जात आहे. बुवाबाजी चालू ठेवण्यात अनेक गटांचा आर्थिक फायदा आहे. भोंदूगिरीचे प्रस्थ वाढवायचे, त्यातून अर्थकारण, सत्ताकारण, राजकारण आणि समाजकारण या सर्वावर ताबा ठेवायचा असा दुष्ट बेत अमलात आणणे चालू आहे. समाजातील शहाण्या सुष्टांनी या दुष्टांना वठणीवर आणणे जरुरीचे झाले आहे. भोळसट भाविकाचे हे शोषण थांबवले पाहिजे.
उपाय काय?
 व्यक्तींना विवेकी विचारांचे महत्त्व पटवले पाहिजे आणि समाजात विवेकपूर्ण विचारांचे लोण सगळीकडे पसरवले पाहिजे. बेताल वागणे टाळायचे असेल तर वागण्यात संयम राखणे शिकावे आणि शिकवावे लागेल. परस्परांबद्दल समंजसपणा वाढवावा, वृत्ती सहिष्णु बनवावी. इष्ट ते करावे, अनिष्ट ते टाळावे अशा शिकवणुकीचा प्रचार व प्रसार सगळीकडे केला पाहिजे.वृक्षाचे उदाहरण घेऊ. जीवन ही भूमी आहे. जगण्याची इच्छा ही मुळे आहेत. खोड झाडाला धारण करते. खोड हे धर्म म्हणावे, जीवनाचा रस म्हणजे जगण्याबद्दलची आस्था रसवाहिन्यांमधून वृक्षभर फिरते. झाड आकाशाच्या दिशेने वाढते, वर वर आणखी उंच जाते. ही उन्नयनाची प्रेरणा ऊर्फ ईश्वरभेटीची आस आहे. फुलांचा बहरही जीवनाची उत्फुल्लता आहे. फलधारणा म्हणजे जीवनाची सफलता. फळ पिकते म्हणजे जगण्याचा सारांश कळणे होय. पिकलेले फळ झाडाला सोडते, ऊर्फ मृत्यू. पिकलेल्या फळाने झाडाला सोडणे हे घडावेच लागते. फळ झाडाला सोडते तेव्हा झाडालाही आणि फळालाही दु:ख होत नाही. उलट बंधमुक्त होणे आणि पुढील प्रवासास निघणे याचा आनंद होतो. फळ जमिनीकडे येते. मातीत मिसळते. जिथून आले तिथे परत येते. चक्र पूर्ण होते. हे कळणे हा मोक्ष. फळामधील बी ही पुढच्या प्रवासाची तयारी होय. बी रुजते, नवीन प्रवास चालू होतो. परिपूर्णतेचे एक आवर्तन पूर्ण होते. यात प्रत्येक पायरीवर समाधान आहे. दु:ख कुठेच नाही. जीवन अशा प्रकारे समजून घेणे हे अध्यात्माचे इंगित आहे. त्यामध्ये फसवाफसवी आणि भोंदूगिरीला कुठे वावच नाही.
साक्षेप
समर्थ रामदासांनी या सर्वाचा सारांश ‘साक्षेप’ या एका शब्दात सांगितला आहे. साक्षेप म्हणजे सतत. सदिश (ठरावीक दिशेने, स+दिश), सुनियोजित, सुनिश्चित प्रयत्न. कुठे पोहोचायचे आहे हे आधी ठरव. त्या दिशेने सतत प्रयत्न कर. स्वत: प्रयत्न कर आणि मध्ये अजिबात थांबू नकोस. प्रयत्नाचे नियोजन कर. योजनेनुसार काम कर म्हणजे श्रम वाया जाणार नाहीत. निर्णय केलास हे चांगले झाले, आता तो अमलात आणण्याचा नुसता निश्चय नाही, तर सुनिश्चय (चांगला आणि पक्का निश्चय) कर. आणि प्रयत्नाला लाग. प्रयत्न सोडू नकोस म्हणजे नक्की जिथे पोहोचायचे इच्छिले होते तेथे पोहोचशील. तिथे पोहोचलास की बस, जे हवे होते ते मिळते. हे समाधान कायमचे आणि अक्षय. कायमची समाधानाची स्थिती म्हणजे मोक्ष.समर्थानी सांगितलेल्या या रूपरेषेमध्ये फसवेगिरी, भोंदूगिरी याला कुठे वावच नाही. विचार शुद्ध कर आणि प्रयत्न सर्वस्व पणाला लावून कर; की नक्की पोहोचशील. सच्चा हेतू ठेवशील आणि प्रामाणिक प्रयत्न करशील तर स्वत:च्या बळावर पोहोचशील. स्वत:च्या बळाची खात्री असेल तर इतर कुणाची मदत मागावीच लागणार नाही. मदत मागितलीच नाही तर फसवाफसवी व भोंदूगिरी होणारच नाही. इच्छित ठिकाणी पोहोचशील हे मात्र नक्की.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 29, 2015 2:00 am

Web Title: why we should depend on satsang
Next Stories
1 असंही रक्षाबंधन
2 लग्न सांभाळताना..
3 अण्णा
Just Now!
X