निर्मला गोडसे
वयवर्षांच्या शिडीच्या आठ पायऱ्या चढून आता नवव्या पायरीवर मी पाय ठेवला आहे! ‘मोबाइल’ नामक यंत्र माझ्या हातात आलं ते वर्ष बहुधा २०११ असावं. तो मोबाइल साधाच होता. फोन करणं-घेणं, इतपतच काम करणारा; पण काळाची गरज म्हणून माझ्या मुलींनी तो माझ्या हातात दिला. मलाही त्याचं महत्त्व पटलं आणि अशा प्रकारे नवीन तंत्रज्ञानाशी माझी पहिली ओळख झाली. तंत्रज्ञान बदलत गेलं. जीवनमानात उलथापालथ होत होती, नवनवीन शोध, संशोधन होत होतं आणि आहेही. त्यातला एक भाग म्हणजे ‘स्मार्टफोन’. ते तयार करणाऱ्या कंपन्या एकापेक्षा एक वरचढ सुविधांनी युक्त असे फोन बनवताहेत आणि आपापलं वैशिष्टय़ जपून व्यवसायात टिकण्यासाठी धडपडताहेत. अशा मोबाइलच्या किमतीही तशाच! आमच्या पिढीला तर ते आकडे ऐकूनच गांगरायला होतं; पण काय करणार! गरजेपुढे मान तुकवावी हेच खरं.




असा एक स्मार्टफोन वाढदिवसाची भेट म्हणून माझ्याही हातात आला २०१६ मध्ये अन् खऱ्या अर्थानं माझी शिकवणी सुरू झाली. आजी नामक शिष्याला शिकवायला एक नाही, तर दोन गुरू पुढे सरसावले. नात मानसी अन् नातू सोहम. दोघांना मला धडे देता देता खूप मजा येत होती. सुरुवातीला माझ्याकडून अनेक गमतीजमती (अर्थात चुका!) होत. घडत-बिघडत दोन्ही गुरूंकडून ‘टचस्क्रीन’चं तंत्र शिकून घेतलं. मेसेज करणं, व्हिडीओ-ऑडिओ बनवणं, यूटय़ूब, फेसबुक बघणं, कॅल्क्युलेटर वापरणं, गजर लावणं, गेम खेळणं, गूगलवर हवी ती माहिती मिळवणं हे शिकून घेतलं. हळूहळू या नव्या खेळण्याशी गट्टी जमली. छोटय़ा, पण ज्ञान-माहितीनं ‘मोठय़ा’ गुरूंकडून अजूनही शिकत आहे!
गूगल हा प्रकार मला आश्चर्यकारकच वाटला. जी जी म्हणून माहिती हवीय ती टाइप केली की क्षणांत उत्तर मिळणार! समाजमाध्यमं हे कथा-कविता-लेखनासाठीचं खुलं दालनच. ‘‘बरं का आजी, गाणी, नाटकं, सिनेमे, तुला आवडतील ते.. हिंदी, मराठी, अगदी इंग्रजीही तुझ्या दिमतीला हजर आहेत!’’ माझे ‘गुरुजी’ सांगत होते, तेव्हा मला हसूच फुटलं. किती काळजी करतात दोघंही आजीची! ‘गुरुविण नाही दुजा आधार’ म्हणतात ते मला पटलं. अजूनही मोबाइल नावाचा जादूचा दिवा घासत मी काही ना काही धडे मी शिकतेच आहे.
करोनाची साथ जगभर पसरलेल्या जीवघेण्या काळात निराशेनं लोक त्रस्त झाले होते. मोबाइलमुळे त्यांना किती मदत झाली ते तेव्हा बघितलं. जुन्या कथा-गोष्टींमध्ये कबुतरांच्या पायाला चिठ्ठी बांधून त्यांना ‘संकेतस्थळी’ पाठवत, असा उल्लेख असे. घोडेस्वारही निरोप पोहोचवत. तार, ट्रंककॉल, ‘वायरलेस’ मेसेज.. प्रवास होत राहिला. आता तारेचं ‘कट्ट कडकट्ट’ फक्त कानांत घुमतंय! ‘पोस्टमनकाका’ फार कमी येऊ लागले आहेत, कारण पत्र लिहिण्यातला निखळ आनंद हरवलाय. तरीही ‘कालाय तस्मै नम:’ म्हणत नवीन तंत्रज्ञानाचं स्वागत करणं, ते आत्मसात करून काळाबरोबर पुढे जाणं, यालाच जीवन ऐसे नाव! नुकतीच ‘चांद्रयान-३’च्या निमित्तानं ‘इस्रो’ची कामगिरी आपण घरबसल्या स्क्रीनवरच तर बघितली. सध्याचं ‘ज्येष्ठपर्व’ आहे, असं कुणी कुणी म्हणतात. त्यांच्यासाठी खास सांगावंसं वाटतं- ‘ज्येष्ठांनी जरूर करावी मोबाइलशी मैत्री.. ‘न हरवण्याची’ त्यांना नक्कीच मिळेल खात्री!’