मेघना जोशी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आजवरच्या आयुष्यात तुम्ही किती अर्थप्राप्ती केलीय, तो तुमच्या आयुष्याचा ‘अर्थ’ (यात अर्थप्राप्ती म्हणजे धनप्राप्ती) असा आजच्या विज्ञान-तंत्रज्ञानावर आधारित असणाऱ्या युगातला आयुष्याचा सोपा आणि सर्वमान्य अर्थ! निव्वळ याच अर्थानं पाहिलं, तर माझं आयुष्य फार ‘अर्थ’पूर्ण नाही. मग विचार येत गेला, की त्याशिवाय अर्थ नाही का आयुष्याला?

आयुष्याच्या अर्थाबद्दलची मला जाणवलेली पहिली शाश्वत गोष्ट भगवद्- गीतेवरच्या चर्चेवेळी माझ्या वडिलांकडून कायमच ऐकलेली होती, ती म्हणजे ‘आत्मा शाश्वत, देह नश्वर असे हे ओळखी अंतरी’. त्यामुळे या देहानं जे काही कृतीत आणायचं आहे ते त्या शाश्वत आत्म्याला मोक्ष मिळण्यासाठी. देहाच्या संवर्धनाचं तत्त्वही बाबाच कायम सांगायचे ‘मन करा रे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण’. मन म्हणजे विचार अशी मनाची व्याख्या माझी मीच जाणून घेतल्यावर जर आपल्या आवाक्यातल्या सिद्धी प्राप्त करून घ्यायच्या असतील, तर त्याच्यासाठी मन प्रसन्न असणं अत्यंत गरजेचं आहे हे आपसूकच समजलं. मन प्रसन्न असायला हवं तर विचार लवचीक असावेत. विचारांबाबत एक छोटीशी गोष्ट वाचली होती. उकळतं पाणी, गाजर, अंडं आणि कॉफी यांची ती गोष्ट! त्यात गरम पाणी म्हणजे प्रतिकूल परिस्थिती. गाजर गरम पाण्यात मऊ पडतं. मऊ पडणं म्हणजे खचून जाणं. तर ठिसूळ अंडं पाण्यात घट्ट होतं. आपली अनेकदा अशीच परिस्थिती होते. प्रतिकूल परिस्थितीत आपण खचून जातो किंवा ताठर बनतो. किंबहुना माझं असंच व्हायचं. पण कॉफी गरम पाण्यात विरघळते आणि त्याला आपलाच रंग, गंध, स्वाद देऊन जाते. प्रतिकूल परिस्थितीत असंच तर करायचं असतं! तिला स्वीकारून, तिचं विश्लेषण करत तिच्यावर मात करण्यासाठी निर्णय घेत, त्यातून बाहेर पडण्यासाठी प्रयत्न करायचा. मग आपोआप आपलं अस्तित्व सिद्ध होतं आणि आपण ठसा उमटवतो.

   ‘सर्वासी सुख लाभावे तशी आरोग्य संपदा। कल्याण व्हावे सर्वाचे कोणी दु:खी असू नये’ हेही माझ्या बाबांनी आचरलेलं तत्त्वज्ञान. ते म्हणायचे, की आपलं वर्तन असं असावं, कुणीही (अगदी स्वत:ही) दु:खी असू नये, पण त्याचबरोबर एक महत्त्वाची गोष्ट सांगायचे ती शाश्वततेची. काही वेळा कठोर, कटू सत्य बोललं, तर कदाचित काही काळापुरती माणसं दुखावतात, आपल्याला संघर्ष करावा लागतो, पण त्यातून पुढे जे साध्य होतं ते चिरकाल टिकणारं आणि मार्गदर्शनपर ठरतं. याचाही अनुभव मी आजवर अनेकदा घेतलाय. सत्य बोलताना शब्द विचारपूर्वक वापरावेत, हे कळण्यासाठी मात्र पन्नाशी यावी लागली वयाची! ‘अगं, शब्द वापरताना त्याची चव चाखून बघ. ती तुला आवडली, तरच तो शब्द वापर!’ हे माझ्या एका हितचिंतकानं सांगितलेलं वाक्य एक वेगळा आयाम सांगून गेलं. आचार, विचार आणि उच्चार यांना एक पक्कं तत्त्व असावं. त्यामुळे आयुष्याला एक अर्थ प्राप्त होतोच, पण त्यातलं सत्य मांडताना ते गरजेपेक्षा कठोर आणि खूप कडू नसावं, हा नवा अर्थ त्यातून सापडला. हे सगळं तत्त्वज्ञान झालं.

 भौतिक परिस्थिती- जसं की परिसर, परिसरातल्या वस्तू, माणसं आणि त्यांचे विचार, यांचा प्रभाव तर कधीच टाळता येत नसतो. अनेकदा आयुष्य उतरणीला लागतं, सगळय़ा बाजूंनी उतारावरून कुणी खोलवर ढकलून दिल्यासारखं वाटतं, अशा वेळी एखादं वाक्यही त्या दरीत सूर्यकिरणासारखं पथदर्शक ठरतं. अनेकांनी माझ्या लेखनाला ‘अनुल्लेखानं मारणं’ या न्यायानं नजरेआड केलेलं असतानाच्या दिवसात एका संपादकांनी मी पाठवलेली कथा वाचून, ‘अहो, आजपर्यंत होतात कुठे तुम्ही!’ असा सकारात्मक प्रतिसाद दिला. मी माझं म्हणणं योग्य शब्दांत मांडू शकते याची जाणीव झाली आणि आयुष्याला वेगळाच अर्थ प्राप्त झाला. एक मात्र आहे, जसं गंगा नदी भक्तांना म्हणते, ‘पाहिजे ते मागा, हरवलेलं शोधा आणि जे हवं ते मिळवण्यासाठी परत परत दरवाजा खटखटवत राहा’ असं आपण केलं तरच आयुष्याचा अर्थ सापडत जातो. एकंदर काय, तर आयुष्य हे प्रकाशकिरणांसारखं आहे. समोर प्रिझम धरला, तर त्यातले सप्तरंग उलगडून दिसतील, अन्यथा किरण जसा येईल तसाच कुठून तरी परावर्तित होईल आणि अवकाशात विरून जाईल!

मराठीतील सर्व चतुरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ayushyacha artha meghana joshi chaturang article financial gain receiving money of life ysh
First published on: 17-12-2022 at 00:12 IST