दापोलीजवळील गव्हे गावात ४० वर्षांपूर्वी मुंबईतील नोकरी सोडून, खिशात फक्त नऊशे रुपये घेऊन आलेल्या अरविंद व शैला अमृते या जोडप्याने डोंगरावर नंदनवन फुलवलेलं आहे. आज दोन लाखांच्या वर कलमं तयार करण्याचं काम येथील लोकांच्या मदतीने केलं जातं, याचमुळे गव्हेला नर्सरीचं गाव म्हणूनच ओळखलं जातं. याशिवाय बचत गटाच्या माध्यमातूनही अनेक जणींना रोजगार मिळाला आहे. इथल्या गरीब-अशिक्षित गावकऱ्यांच्या जीवनात स्थैर्य आले आहे.
श्रावण महिन्याचा दुसरा दिवस. मांडवी एक्स्प्रेसने खेडला उतरून आम्ही मैत्रिणी गाडीने दापोलीच्या दिशेने निघालो. हवेत सुखद गारवा होता. पावसाचा लपंडावही सुरू होता. जिथं पाहावं तिथं हिरवाई उमलून आली होती. त्या ओल्या रानातून नागमोडी वळणं घेत आमची गाडी दापोलीजवळील गव्हे गावात शिरली आणि डोंगरउतारावरील गर्द वनराईत लपलेल्या एका टुमदार बंगल्यासमोर थांबली. यजमान अरविंद अमृते व शैलाताई दोघेही स्वागतासाठी दारातच उभे होते. जवळजवळ ४० वर्षांपूर्वी मुंबईतील नोकरी सोडून, खिशात फक्त, नऊशे रुपये घेऊन इथे आलेल्या या जोडप्याने डोंगरावर फुलवलेलं नंदनवन पाहायला आणि त्याबरोबर त्यांनी गावातील गरीब-अशिक्षित स्त्री-पुरुषांना दाखवलेला स्थैर्याचा, संपन्नतेचा मार्ग जाणून घ्यायला तर आम्ही इथवर आलो होतो.
सुग्रास भोजनाचा आस्वाद घेतल्यानंतर गप्पांना सुरवात झाली. काही घरगुती कारणांमुळे मुंबई सोडायची ठरल्यावर, कोकणचा कॅलिफोर्निया व्हावा हे स्वप्न बाळगणाऱ्या डॉ. गोळे यांनी अमृते यांना गव्हेला आणलं. १९७७ चा तो काळ. त्या वेळी हे गाव म्हणजे एक जंगलच होतं. तुरळक वस्ती..तीही लांब लांब डोंगरावर. गावात काडेपेटीचंही दुकान नाही. काही आणायचं तर ५/६ कि. मी.वरील दापोली गाठावं लागे. (या स्थितीत आज ४० वर्षांनंतरही फारसा फरक पडलेला नाही.) त्यातच दोघांनाही शेतीचा तसंच ग्रामीण जीवनाचा अनुभव शून्य. परंतु तारुण्याची रग आणि जिद्द मात्र पुरेपूर होती. त्या जोरावर त्यांनी ३२ गुंठे जागा भाडय़ाने घेतली व त्यावरील मातीच्या घरात, जंगली प्राण्यांच्या सोबतीने त्यांच्या संसाराची सुरवात झाली.
सर्वप्रथम त्यांनी घरासभोवतालच्या निगराणी न राखलेल्या नारळ, सुपारीची बाग नीट करण्याचं काम हाती घेतलं. त्याबरोबर गावातील शेतकऱ्यांना विचारून मिरची, टोमॅटो, फरसबी, असा भाजीपालाही लावला. यावर कशीबशी गुजराण सुरू झाली. मात्र दापोलीतील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने त्यांना मदतीचा हात दिला. विद्यापीठाच्या उद्यान विद्या विभागाचे प्रा. डॉ. गुंजाटे, सतत येऊन शंका विचारणाऱ्या अमृते यांची बाग बघायला एकदा गव्हेला आले आणि त्यांनी कलमं बांधण्याची नवी दिशा दिली. कलमांच्या विक्रीसाठी साहाय्य करण्याचंही आश्वासन दिलं. या टॉनिकमुळे अमृते दाम्पत्याला उभारी आली. आंब्याबरोबर गुलाबाची कलमं बांधणं सुरू झालं.. त्यानंतर शोभेची झाडं. अमृते यांची नर्सरी आकार घेऊ लागली.
संपूर्ण रत्नागिरी जिल्हय़ातील ही पहिली नर्सरी. आज गव्हय़ाला नर्सरीचं गाव म्हणून ओळखलं जातं. या बदलाचं श्रेय अमृते यांच्याकडे जातं. रोपवाटिकेच्या वाढत्या व्यापामुळे गावातील हातांना काम मिळालं. आपल्याकडे काम करणाऱ्या माणसांना बारमाही काम देता यावं यासाठी तयार रोपांची विक्री होणं गरजेचं होतं. यातून मार्ग काढण्यासाठी अमृतेंनी वेगळं पाऊल उचललं. दापोलीच्या राधाकृष्ण मंदिरात पहिलंवहिलं पुष्पप्रदर्शन भरलं. त्याला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. या यशानंतर दवर्षी जानेवारी-फेब्रुवारीतले सर्व शनिवार-रविवार खेड, चिपळूण, रत्नागिरी, महाड, रोहा, श्रीवर्धन, मुरुड-जंजिरा या आठ ठिकाणी प्रदर्शन आयोजित करण्याचा रिवाज सुरू झाला. या ‘फ्लॉवर शो’ना सुदृढ गुलाब स्पर्धा, पुष्परचना स्पर्धा, झाडांच्या निगराणीच्या कार्यशाळा.. अशा उपक्रमांची जोड दिल्याने त्यावर लोकप्रियतेची मोहर उठली. प्रदर्शनांमुळे अमृतेंच्या गुलाबांची कीर्ती मुंबई-पुणे अशा शहरापर्यंत पोहोचली आणि तिथून मागणी यायला सुरवात झाली. अरविंद अमृते म्हणाले, ‘‘ते दिवस भारलेले होते. आम्हा दोघांनाच नव्हे, तर आमची पूर्ण टिम, आमचे ग्राहक, परीक्षक सर्वानाच या हिरव्या नजराण्याने वेड लावलं होतं.’’ ते म्हणाले, ‘‘झाडे- वेली, पशु- पाखरे, यांच्यातील सामंजस्य समजून घेताना आयुष्य कधी पुढे सरकलं ते कळलंच नाही. निसर्गाचं मुक्तगान ऐकताना आमचंही जीवन सुरेल – सुमधुर होऊन गेलं.’’
नर्सरी आकाराला येत असतानाच शैलाताईंना जनस्वास्थरक्षक (आरोग्यविषयक समाजसेवेसाठी) म्हणून काम करण्याविषयी विचारणा झाली. यानिमित्ताने फिरताना त्यांना गावकऱ्यांच्या परिस्थितीची जाणीव झाली. पुरुष गडय़ाची काम करायला मुंबईत, मुलं गुरं चरायला आणि बायका लाकडाच्या मोळ्या बांधून विकण्यात गर्क.. हे दृश्य पाहून त्यांनी या महिलांना पुरेसा रोजगार मिळवून देण्याचं ठरवलं आणि त्यासाठी स्वत: फळप्रक्रियेचं ट्रेनिंग घेतलं. ‘आशीष फूड प्रॉडक्ट्स’ या त्यांच्या उद्योगाची सुरवात अशी लोकहितातून झाली. ४० महिलांच्या हातांना काम मिळालं. फणसाचे तळलेले गरे, काजू, कोकम, नाचणीचं सत्त्व, कैरीचं पन्हं, तऱ्हेतऱ्हेची पीठं, लोणची व सरबतं..असा कोकणी मेवा प्रदर्शनांबरोबर ठेवायला सुरुवात झाली. या कामांतून त्या स्त्रियांना चार पैसे रोख मिळू लागल्यावर शैलाताईंनी त्यांना स्वयंरोजगारासाठी प्रवृत्त केलं. ‘उत्कर्ष महिला मंडळ’ या बॅनरखाली या स्त्रिया कार्यरत झाल्या. त्यानंतर शैलाताईंनी गावागावांमधून बचतगट स्थापन करायला सुरुवात केली. असे ५०० हून अधिक गट त्यांनी दापोली व रत्नागिरी परिसरात स्थापन करण्यात पुढाकार घेतला.
द्वाकरा (Development of women and children rural area) ही २५ वर्षांपूर्वी आलेली सरकारी योजना. या माध्यमातून शैलाताईंनी तीन गट तयार केले. एकाला पापड उद्योग, दुसऱ्याला पिठांचा व्यवसाय आणि तिसऱ्याकडे विक्रीव्यवस्था अशी कामं वाटली आणि त्यासाठी त्यांना सक्षम केलं. त्यामुळे आज या स्त्रियांची मातीची घरं जाऊन तिथे पक्की घरं उभी राहिली आहेत. इतकंच नव्हे तर अनेक घरात टी.व्ही., फ्रिज, मिक्सरही आले आहेत. २००८ मध्ये शैलाताईंनी ‘भरारी दापोली तालुका बचत गट महासंघा’ची स्थापना केली. यातून ५०० स्त्रियांना काम मिळालं. या ‘भरारी महासंघा’च्या भरारीचा एक किस्सा शैलाताईंनी सांगितला. २००३ दापोली कृषी विद्यापीठाने आयोजिलेल्या एका सहा दिवसांच्या महोत्सवात सहभागी झालेल्या ७ ते ८ हजार शेतकऱ्यांच्या पोटपूजेचं शिवधनुष्य भरारी महासंघाने समर्थपणे उचललं. पुण्यात भरणाऱ्या भीमथडी जत्रेतही ‘भरारी’चा पीठं, पापड याबरोबर आंबोळी, उसळ व मोदक असा एक स्टॉल लागतो. त्या वेळी तर रोजचे १०० नारळ फोडून मोदक बनवले जातात. एवढंच नव्हे तर शैलाताईंच्या मार्गदर्शनालाखाली ‘भरारी’च्या स्त्रिया बिग बाझार, बांद्रा सरस.. इथपर्यंत पोहचल्यात.
गावात अंगणवाडी सुरू व्हायच्या किती तरी आधी चालू केलेली बालवाडी आणि संघटित स्त्री-शक्तीला हाताशी धरून साधलेली दारूबंदी हे त्यांच्या कार्याचे आणखी दोन ठळक विशेष. शासनाच्या विविध कल्याणकारी योजना या स्त्रियांपर्यंत पोहचाव्यात यासाठी अरविंद अमृते यांची साथ मिळाली. ज्यामुळे शिवणाच्या मशीन, निर्धूर चुली घरोघर पोहोचल्या. ग्रामीण स्त्रियांच्या सक्षमीकरणासाठी शैलाताईंना अनेक पुरस्कार मिळाले. त्यापैकी जागतिक पर्यावरणतज्ज्ञ
डॉ. वंदना शिवा यांच्या हस्ते मिळालेल्या इंडियन र्मचटस् चेंबरच्या जानकीदेवी बजाज पुरस्काराने त्यांचं नाव सर्वदूर पोहोचलं. नाचणी, कुळीथ यांसारखी पौष्टिक धान्य लोकांना खायला घालते म्हणून डॉ. शिवा एवढय़ा खूश झाल्या की त्यांनी शैलाताईंची इटलीतील टुरिनो येथे भरलेल्या स्लो फूड परिषदेसाठी (फास्ट फूडच्या विरोधी) भारतातर्फे जाणाऱ्या चमूत निवड केली. सेंद्रिय उत्पादनांचा प्रसार करणाऱ्या डॉ. शिवा यांच्या डेहराडून येथील संस्थेचं काम बघायला शैलाताई दर वर्षी ‘भरारी’च्या एकेका ग्रुपला घेऊन जातात. या सात-आठ जणींना डेहराडून बरोबर दिल्ली-आग्रा-मथुरा (तेही कमीत कमी खर्चात) दाखवण्याची जबाबदारी अरविंद अमृते यांची.
शिक्षण सचिव कुमुद बन्सल यांनी कृषी विद्यापीठामार्फत गव्हे येथील काम बघितल्यावर शैलाताईंना मराठवाडय़ातील शेतकऱ्यांच्या मेळाव्यासमोर बोलण्यासाठी निमंत्रण दिलं. विषय होता, ‘ग्रामशिक्षणाने होणारा बदल.’ शिक्षण सचिवांकडून मिळालेली ही अप्रत्यक्ष पावती त्यांना लाखमोलाची वाटते.
बेरोजगारांना रोजगार मिळवून देण्यात अरविंद अमृते यांचं तेवढंच योगदान आहे. ती कथा अशी.. कलमं बांधणं आणि फळप्रक्रिया उद्योगात जम बसल्यास त्यांनी गव्हे गावातील एक डोंगरच खरेदी केला आणि त्यावर घर बांधून, विहीर खणून या नव्या जागी रोपवाटिका आणली. त्यानंतर ३/४ वर्षांनी एका संधीने दार ठोठावलं. एका बागाईतदाराकडून त्यांना द्राक्षांवर ‘डोळे भरण्यासंबंधी’ (कलम) विचारणा झाली. अभ्यासकरून दहा वेलींवर केलेला त्यांचा प्रयोग यशस्वी झाला. पुढच्या वर्षी २१०० कलमांची ऑर्डर मिळाली. तिसऱ्या वर्षी ही संख्या शंभर पटींत वाढली (२,१०,०००/- कलमं) तेव्हा त्यांनी माणसांना प्रशिक्षण द्यायला सुरवात केली. हंगामात दर वर्षी २०० ते २५० मुलांना प्रशिक्षण दिलं. याप्रमाणे २० वर्षांत ५००० माळी तयार झाले. त्यांनी आणखी काही जणांना शिकवलं. परिणामी, एकटय़ा नाशिक भागात दापोली परिसरातील साडेतीन ते चार हजार मुलं आता दर वर्षी ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात द्राक्षांची कलमं करून प्रत्येकी लाख ते सव्वा लाख रुपये मिळवतात.
अमृते यांच्या डोंगरावर आंबा, काजू, फणस, रातांबा (कोकमाचं झाड), जाम, लिंबू.. अशा फळ झाडांबरोबर औषधी वनस्पती, मसाल्याची झाडं, सर्व तऱ्हेची फुलझाडं (एकटय़ा गुलाबाच्या २५० जाती), नाना तऱ्हेचे बांबूवृक्ष.. असं बरंच काही आहे. डोंगरावर फुललेली आपली बाग ते ज्या तन्मयतेने दाखवतात ते पाहताना महाराष्ट्र शासनाने त्यांना दिलेल्या ‘उद्यान पंडित’ या सन्मानाचं मोल उमगतं. एक तत्त्व मात्र त्यांनी प्रथमपासूनच जपलंय ते म्हणजे माल परवडणाऱ्या किंमतीतच विकायचा. त्यांचं म्हणणं, ‘माल चोख असेल तर त्यासाठी किंमत मोजणारा विशिष्ट ग्राहकवर्ग असतोच ना!’
आजोबांपासून नातवापर्यंत अमृतेंचं संपूर्ण कुटुंब डोंगरावर रमलंय. हॉटेल मॅनेजमेंट केलेल्या त्यांच्या मुलाने आशीषने, आपल्या पत्नीच्या साथीने सुसज्ज घरकुल उभारून ‘निसर्ग सहवास’ नावाने अॅग्रोटूरिझम सुरू केलंय. अनेक झाडं, पक्षी यांच्या सान्निध्यात, घरगुती चविष्ट जेवणाचा आस्वाद घेत पुन्हा ताजंतवानं होण्यासाठी अगदी सामान्यांपासून नामवंत लोकही इथे येतात. त्याबरोबर मुंबईत दर वर्षी सहा ठिकाणी भरणाऱ्या रोपवाटिका व कोकणीमेव्याच्या प्रदर्शनाच्या आयोजनात सगळं कुटुंब गुंतलेलं असतं. अमृते यांची मुंबईतील फूड टेक्नॉलॉजिस्ट मुलगी आशिका चाचड ही देखील आपल्या कृषिक्षेत्रातील उच्च पदवीधर जोडीदारासह (शिशिर चाचड) सेंद्रिय भाज्या, धान्य फळफळावळ यांच्या निर्मिती व विक्रीत गर्क आहे. या दोघांचा अमृते यांच्या उद्योगातही सहभाग आहे. गव्हेसारख्या छोटय़ाशा गावी एका डोंगरावर उभं केलेलं हे विश्व पाहताना वाटलं, ‘नशीब काढण्यासाठी गावाकडची माणसं शहराची वाट धरतात पण मुंबई सोडून खेडय़ात जात, त्या गावाला ‘सुजलाम्-सुफलाम्’ करणाऱ्या अमृते दाम्पत्याचं पाणीच वेगळं!
संपदा वागळे
संपर्क : sales@nisargasahavas.com
waglesampada@gmail.com