‘आई’पणाची महती सांगणं आणि तिच्यावर ‘मदर्स डे’ च्या दिवशी भेटवस्तूंचा वर्षाव करणं, याच्या पलीकडेही मातृत्वाचे विविध कंगोरे आहेत. मातृत्व ही प्रत्येक स्त्रीमध्ये मुळातच असलेली भावना आहे, की समाजानं खोल रुजवलेला संस्कार आहे? सामाजिक नियम न पाळता प्राप्त झालेलं मातृत्व हे आईपण नसतं का? मातृत्व खऱ्या अर्थानं स्त्रीची ‘निवड’ होईल का? अशा प्रश्नांच्या अनुषंगानं आजवर अनेकांनी मातृत्वाची चिकित्सा केली. टोकाचं उदात्तीकरण वा टोकाची टीका, या दोन्ही भावना टाळण्यासाठी आधी विविध प्रकारची मांडणी तपासावी लागेल…

नुकताच आंतरराष्ट्रीय मातृदिन साजरा झाला. हा दिवस म्हणजे स्त्रीचं ‘आईपण’ साजरं करायचा दिवस. यंदाही सेलिब्रिटींपासून ते सामान्य माणसांपर्यंत अनेकांनी समाजमाध्यमांद्वारे आपल्या आईप्रति कृतज्ञता व्यक्त केली. तिचं प्रेम, वात्सल्य, ममता, तिनं केलेला त्याग, तडजोडी, कुटुंबासाठी स्वत:च्या स्वप्नांना घातलेली मुरड किंवा कुटुंबाला सांभाळून तिनं जाणीवपूर्वक स्वत:ची साधलेली प्रगती, अशा सगळ्याबद्दल गोडवे गायले गेले. मातृत्वाचा गौरव करणारे संदेश सगळीकडे पाठवले गेले. क्वचित एकल, अविवाहित, घटस्फोटित, दत्तक पालक, समलिंगी संबंधांत असलेल्या स्त्रिया आणि त्यांचं पालकत्व यांबद्दलही बोललं गेलेलं दिसलं. जाणीवपूर्वक अथवा परिस्थितीवश आई न झालेल्या स्त्रियांविषयीही थोडीबहुत चर्चा झाली, परंतु अर्थातच त्याचं प्रमाण उल्लेखनीय म्हणावं असं नव्हतं. आई होण्याचे आज अनेक कृत्रिम मार्गही उपलब्ध आहेत. नवनवीन शोध लागत आहेत. त्यावरसुद्धा मोकळी चर्चा अभावानंच पाहायला मिळते. कारण हा दिवस मुख्यत: पारंपरिक मातृत्व ‘सेलिब्रेट’ करणारा आहे. त्यात अशा ‘वेगळ्या’ स्त्रियांची किंवा मातृत्वाबाबतच्या वेगळ्या संकल्पनांची दखल घेतली जाणं दुर्मीळच. जगभरातल्या स्त्रीवादी चळवळी नेहमीच मातृत्वाबद्दल बोलत आलेल्या आहेत. या चर्चा विचारसरणीनुसार आणि कालानुरूप बदलत गेलेल्या आहेत. त्यातून एक नक्की लक्षात येतं, की मातृत्व ही वैश्विक संकल्पना नाही. त्याला अनेक पदर आहेत, कंगोरे आहेत. प्रत्येक संस्कृतीत, समाजात, धर्मात त्याचा अर्थ निराळा आहे. या सगळ्या विविधतेला सामावून घेईल, अशी मातृत्वाची व्याख्या करणं कठीण आहे. आणि तरीही ती तशी केली, तर ती अनेकजणींवर अन्याय करणारी ठरेल.

हेही वाचा : पाळी सुरूच झाली नाही तर?

सर्वसाधारणपणे आई होणं ही घटना आनंददायक मानली जाते. परंतु त्यासाठी आपल्या समाजात अनेक पूर्वअटी घातल्या जातात, ज्यांची चर्चा होत नाही. उदाहरणार्थ- आई होण्यासाठी स्त्रीनं विवाहित असणं गरजेचं असतं. मातृत्वासाठी विवाहाचा सामाजिक आणि कायदेशीर पाया महत्त्वाचा ठरतो. याबाबतच्या धारणांमध्ये देशांनुरूप फरक असला, तरीही आई होऊ घातलेल्या स्त्रीनं विवाहित असणं हे कधीही उचित मानलं जातं. एखादी स्त्री आई ‘कशी’ झाली, हेही पाहिलं जातं. म्हणजेच मातृत्व हे नैसर्गिक आहे, दत्तक आहे, की इतर वैद्याकीय मार्गानं आहे, हेही महत्त्वाचं ठरतं.

काही आठवड्यांपूर्वी याच लेखमालेत आपण गर्भपाताच्या कायद्यांची चर्चा केली होती. मातृत्व नाकारणाऱ्या आणि आपल्या शरीरावर हक्क सांगणाऱ्या स्त्रियांना कायद्यानं पाठबळ दिलं, तरीही समाज त्यांच्याकडे कसं पाहतो, हाही चर्चेचा विषय आहे. अनेक देशांमध्ये यासंदर्भातले कायदे कडक झाल्याची उदाहरणं आहेत. थोडक्यात, मातृत्वाचं गौरवीकरण करताना हे काही महत्त्वाचे मुद्दे दुर्लक्षून चालणार नाहीत.

मातृत्वासंदर्भात खळबळजनक म्हणावीत अशी विधानं केली ती सिमॉन द बोव्हार या लेखिकेनं- पंचाहत्तर वर्षांपूर्वीच्या तिच्या ‘द सेकंड सेक्स’ या जगप्रसिद्ध पुस्तकात. ‘मातृत्व’ या संकल्पनेकडे चिकित्सक दृष्टिकोनातून बघण्यास तिच्यामुळे सुरुवात झाली, असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. ‘स्त्री ही जन्मत:च तशी नसते, जशी ती घडवली जाते,’ या सूत्राभोवती हे पुस्तक फिरतं. तिच्या मते, मातृत्वाची भावना स्त्रीच्या ठायी नैसर्गिकरीत्या असते या समजुतीला आव्हान देण्याची गरज आहे. स्त्रियांना मातृत्व जणू काही त्यांच्यासाठी नेमून दिलेलं काम आहे असं वाटतं, ते समाजानं सातत्यानं त्यांच्यावर तसे संस्कार केल्यामुळेच. त्यामुळे मातृत्वाशिवाय आयुष्याला पूर्तता येऊ शकत नाही, अशी भावना बहुतेकजणींच्या मनात बळावते. त्यांचं स्त्रीत्व सिद्ध करण्यासाठी हा सगळ्यात महत्त्वाचा आणि एकमेव मार्ग आहे, असा विचार कळत-नकळत खोलवर रुजतो. सिमॉनच्या मते यामुळेच आई होण्याचा निर्णय ही स्त्रियांची खरोखरच ‘निवड’ असते, की विशिष्ट सामाजिकीकरणाच्या प्रभावाखाली हे निर्णय घेतले जातात, याचा विचार व्हायला हवा. हा विचार इतका कठीण आहे, की त्यासाठी केवळ कायदे किंवा सामाजिक संस्था बदलणं पुरेसं नाही. कारण मातृत्वाचे स्त्रीच्या शरीरावर होणारे परिणाम हे तसेच राहणार आहेत. सिमॉन ‘मातृत्व’ या संकल्पनेला ‘लादलेलं आईपण’ म्हणते. ‘जोपर्यंत स्त्रिया हे नाकारत नाहीत, तोपर्यंत त्या खऱ्या अर्थानं स्वतंत्र होऊ शकत नाहीत,’ असं प्रतिपादन तिनं त्यावेळी केलं होतं.

हेही वाचा : ‘शुभंकर’ रुग्णांचा आधार!

या भूमिकेवर अर्थातच त्याकाळी भरपूर टीका झाली आणि अनेक स्त्रीवाद्यांनीच ती केली. मातृत्वाला अगदीच रद्दबातल ठरवण्यावर अनेकांनी आक्षेप घेतले. मातृत्व ही खरं तर स्त्रीपाशी असलेली शक्ती आहे आणि त्याद्वारे अनेकींना एकत्र येण्याचा मार्ग सापडू शकतो, अशीसुद्धा मांडणी केली गेली. परंतु एका तत्त्वावर मात्र खूप जणांनी शिक्कामोर्तब केलं, की मातृत्व हा स्त्रीमधला नैसर्गिक म्हणावा असा गुण नाही. आईपण आणि निसर्ग यांचा जवळचा संबंध हा सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक परिघात जाणीवपूर्वक बांधला जातो आणि त्याद्वारे स्त्रीचं दमन करण्याचे, तिला दुय्यम ठरवण्याचे वेगवेगळे मार्गही शोधले जातात. ही पुरुषप्रधान समाजाची एक प्रकारची चतुराई आहे. एकदा का मातृत्वाला ‘नैसर्गिक’ म्हटलं, की आईपणाच्या सामाजिक जबाबदाऱ्याही आपोआपच स्त्रीच्या खांद्यावर दिल्या जातात. मुलांच्या सगळ्या प्रकारच्या विकासाची जबाबदारी तिचीच आहे असं गृहीत धरलं जातं. ‘काळजी घेण्याची’ जबाबदारीही स्त्रियांचीच आहे हा समज रुजतो. या काळजी घेण्यात सगळं काही येतं- स्वयंपाक करणं, आजारी माणसांची सेवा करणं, साफसफाई करणं, मुलांचं आरोग्य सुदृढ कसं राहील याकडे लक्ष पुरवणं, मुलांच्या अभ्यासाकडे आणि त्यांच्यावर चांगले संस्कार व्हावेत म्हणून लक्ष देणं, वगैरे. ही कामं ‘केवळ’ स्त्रियांचीच आहेत, हे याद्वारे पुन:पुन्हा अधोरेखित होतं. त्यामुळे स्त्रीवाद्यांनी या ‘नैसर्गिक’ आणि ‘सामाजिक’ मातृत्वात आग्रहपूर्वक फरक करायला सुरुवात केली. मुलं असतानाही स्त्रियांना मोकळा आणि समान अवकाशकसा मिळेल यावर चर्चा घडवली.

मार्क्सवादी स्त्रीवाद्यांनी मातृत्वाला ‘उत्पादना’च्या परिघात पाहिलं. त्यांनी असं प्रतिपादन केलं, की पुरुषप्रधान संस्कृतीत पुरुषांना मातृत्व हे काम वाटत नाही, ती स्त्रियांची नैसर्गिक जबाबदारी वाटते. त्यामुळे या कामासाठीचा योग्य मोबदला स्त्रियांना कधीही मिळत नाही. उलट त्यांनी मोबदल्याची अपेक्षाच करू नये, अशी सामाजिक-राजकीय व्यवस्था निर्माण केली जाते. त्यामुळे भांडवली-पितृसत्ताक व्यवस्थेत मातृत्व हे स्त्रियांच्या शोषणाचं एक माध्यम होतं. उत्पादनाच्या मोठ्या परिघात मातृत्वाला ‘अनुत्पादक’ मानलं जातं आणि त्याद्वारे स्त्रियांचं आणखी दमन केलं जातं.

हेही वाचा : सांदीत सापडलेले : प्रेमाची थेरं!

गेल्या तीस-चाळीस वर्षांत मात्र या दृष्टिकोनात मोठ्या प्रमाणात बदल झालेला दिसून येतो. हल्लीच्या काळातल्या बऱ्याच स्त्रीवादी विचारांचे लोक मातृत्वाला जोखड किंवा शोषणाचं माध्यम मानत नाहीत. याउलट मातृत्वाला ते ‘एजन्सी’ म्हणून पाहतात. असं काही तरी, ज्याद्वारे स्त्री अधिक बळकट होते, अधिक सक्षम होते, अशी मांडणी आता केली जाते. मातृत्वाच्या भावनिक, सामाजिक, सांस्कृतिक आयामांवर भर दिला जातो. हे म्हणताना मातृत्व हे एकच आणि वैश्विक नसतं, तर मातृत्वाचे अनेक प्रकार असतात, हा विचारही पुढे आला आहे. मातृत्व आणि वर्ग, वर्ण, जात, प्रदेश, संस्कृती, इत्यादींचे आंतरसंबंधही मोठ्या प्रमाणात अभ्यासले जात आहेत. त्यामुळे आईपणाचं उदात्तीकरण आणि मातृत्वाचा पूर्णत: त्याग, अशा दोन टोकांच्या मधला विचार हळूहळू विकसित होत आहे. नव्या युगातल्या आई संतुलित आणि सारासार विचार करण्यास अधिक सक्षम झाल्या आहेत असं म्हणायला हरकत नाही.

पण हे सक्षमीकरण पूर्णत: झालं आहे का? तर त्याचं उत्तर ‘नाही’ असंच आहे. उदाहरणार्थ, जगभरात सक्रिय राजकारणातल्या स्त्रियांचा टक्का हा पुरुषांच्या तुलनेत कमी आहे. याची कारणं पुरुषसत्ताक संस्कृतीत रुजलेली आहेत. स्त्रियांवर असणारी मातृत्वाची जबाबदारी, हेही यातलं प्रमुख कारण आहे. परंतु नगण्य असली, तरीही अपवादात्मक उदाहरणं आहेत. एक ताजं उदाहरण म्हणजे २०१७ मध्ये जेसिंडा आर्डन न्यूझीलंडच्या पंतप्रधान झाल्या आणि त्यानंतर एका वर्षानं त्यांनी बाळाला जन्म दिला. देशाच्या उच्चपदावर असताना बाळाला जन्म देणाऱ्या जेसिंडा या जगातली दुसरी स्त्री ठरल्या. पहिल्या होत्या पाकिस्तानच्या बेनझीर भुट्टो. विशेष सांगायचं म्हणजे जेसिंडा यांनी बाळंतपणाची रजाही घेतली. ती घेणाऱ्या त्या पहिल्याच स्त्री पंतप्रधान. थोडक्यात, मुलाला जन्म देणं आणि देशाचं नेतृत्व करणं, या दोन्ही गोष्टी एकाच वेळेस साधणं ही सोपी गोष्ट नाही. पण व्यवस्थांचा आणि समाजाचा पाठिंबा असेल, तर कदाचित तेही शक्य आहे. विविध महत्त्वाच्या क्षेत्रांत स्त्रियांचं प्रतिनिधित्व वाढवण्यासाठीच्या या शक्यतांचा अभ्यास सध्या होतो आहे.

हेही वाचा : मनातलं कागदावर : रंगीत जादूचा खेळ!

मातृत्वाचा उपयोग राजसंस्था आणि बाजारपेठ कसा करून घेते, याचाही अभ्यास होतोय. यासंदर्भात ‘मदर्स डे’चा इतिहास पाहणं रंजक आहे. बहुतेक देशांत हा दिवस अशा आईंसाठी साजरा केला जात असे, ज्यांची मुलं दुसऱ्या महायुद्धात त्यांच्यापासून दुरावली गेली. अमेरिकेत अॅना जर्विस या स्त्रीनं तिच्या आईच्या स्मरणप्रीत्यर्थ १२ मे १९०७ या दिवशी काही एक सेवाकार्य केलं. त्याचं अनुकरण इतर अनेकांनी पुढची काही वर्षं सातत्यानं केलं. अखेरीस शासनानं त्याची दखल घेतली आणि त्या दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर केली गेली. पुढे काही वर्षांनी अॅनानं या दिवसाबद्दल नाराजी व्यक्त केली, कारण तिच्या मते बाजारातल्या अनेक कंपन्या या दिवसाचा वापर करून घेत होत्या. भेटवस्तूंची विक्री करण्याची स्पर्धा लागत होती. तिनं शासनाकडे हा दिवस कॅलेंडरमधून सुट्टी म्हणून हटवण्याची मागणी केली. त्याचा अर्थातच काही उपयोग झाला नाही. आज हा दिवस जवळपास सगळ्या जगात धामधुमीत साजरा केला जातो.

थोडक्यात, मातृत्व ही फक्त भावना नाही, तर त्याकडे बघण्याचे अनेक दृष्टिकोन आहेत. बाळाचं आणि आईचं नातं हे जगातल्या सगळ्यात सुंदर आणि तरल भावनांपैकी एक आहे, हे खरंच. पण त्याबरोबर या बाकी कंगोऱ्यांचाही विचार व्हायला हवा.