अनेक जण वेगवेगळ्या गोष्टींसाठी पर्यटनाला जात असतात. मैत्रेयी यांचा प्रवास होतो तो देश-विदेशातील विणकाम-भरतकाम करणाऱ्या कलाकारांच्या कलाकृती पाहण्यासाठी, ते काम जाणून घेण्यासाठी. गुजरातमधल्या सुमरासर, कुकमा, खमीर, अजरकपूर गावातल्या विणकरांचं पाको काम, शुप भरतकाम, खारेक, नरोनी, कच्छी टाका पाहाणं असो, की ओडिशातील कला अभ्यासक सुमित्रा पहारींकडून डोगरा आर्ट, कोटपाड साड्यांचा इतिहास जाणून घेणं असो. इतकंच नाही तर हाच ध्यास त्यांना नेदरलँडमधल्या सुंदर नक्षीकाम केलेल्या रंगीबेरंगी गोधड्या, टेबल रनर, स्कार्फ, पडदे करणाऱ्या क्विलटिंग स्टुडिओच्या दारीही नेतो. अनेक कलाकारांच्या, तिथल्या प्रेमळ माणसांच्या भेटी घडवणारा, मनमोराचा पिसारा फुलवणारा हा प्रवास लेख ‘जागतिक पर्यटन दिना’निमित्ताने…

फिरायला जाणं याबाबतीत मी अगदी भटकी म्हणावी अशा प्रकारातली जरी नसले तरी मुक्त प्रवासी नक्कीच आहे. हवं त्या ठिकाणची स्थळं निवडून फिरायला जाणं मला आवडतं. मग त्याच्यासाठी कितीही कष्ट घ्यावे लागले तरी बेहत्तर! प्रवास आखताना, तिथली प्रवासवर्णनं वाचताना, त्यांची माहिती मिळवताना, मानसिक पातळीवर ती ठिकाणं अनुभवताना जी समृद्धता येते ती मला अधिक मोहात पाडते. याशिवाय परतल्यावर इच्छित ठिकाणी जाऊन आल्याचं समाधान तर फारच वेगळं असतं, मग तो देशांतर्गत प्रवास असो की देशाबाहेरचा !

गुजरातमधील भूजला जेव्हा मी जायचं ठरवलं तेव्हा ‘रणोत्सव’ बघायचं माझ्या मनात होतं. पण त्याचबरोबर मला बघायचं होतं ते भूजचं अंतरंग. त्यासाठी काय करावं याचा विचार करत मी स्वत:च एक आराखडा तयार केला. त्यात रणोत्सव होताच, पण त्याबरोबर मोगल माता मंदिर, जेसल तोरल, नारायण सरोवर अशी धार्मिक ठिकाणंही होती. सोबतच मांडवी बीच, श्यामजी कृष्ण वर्मा स्मारक, काला डुंगर, शीश महल अशी इतिहासाशी जोडलेली ठिकाणंही होती. महत्वाचं म्हणजे काही जणांना मला व्यक्तिश: भेटायचं होतं ते म्हणजे तिथले विणकर. भुजोडीमधल्या मुख्य गावातल्या ठरावीक मोठी दुकानं थाटलेल्या विणकरांना नाही, तर भूजमधल्या छोट्या छोट्या गावातल्या विणकरांना.

आजकाल आंतरजालाच्या अर्थात, इंटरनेटच्या मदतीने असा शोध घेणं सहज जमतं. मी त्याचाच उपयोग करत भूज शहरापासून लांब असलेली गावं शोधली. सुमरासर, धामाडका, कुकमा, खमीर, अजरकपूर अशा गावातल्या विणकरांचा मागोवा घेतला. त्यांचं काम पाहिलं. कुठे पाको काम, म्हणजे पक्क्या भरतकामाचे नमुने मिळवले, तर कुठे कच्छ-पाकिस्तान सीमेवरील फाळणीनंतर उदयाला आलेलं शुप वर्क म्हणजे सुप भरतकाम समजून घेतलं. कुठे खारेक, कुठे नरोनी तर कुठे कच्छी टाका समजून घेतला. भुजोडीच्या प्रसिद्ध साड्या हातमागावर तयार होताना पाहिल्या. साड्यांना गोंडे तयार करणाऱ्या मुली, चरख्यावर सूत कातणाऱ्या स्त्रिया, काला कॉटनचं कापड हातमागावर विणणारे तरुण अशा सगळ्यांची भेट घेऊन त्याचं काम समजून घेणं यातला आनंद अपरिमित होता.

रोज सकाळी लवकर उठून आम्ही या फिरस्तीवर निघायचो. दुपारी तिथल्याच एखाद्या कलाकाराच्या घरी जेवायचो. तिथल्या स्थानिक लोकांबरोबर जेवताना त्यांच्याशी अगदी सहज मैत्री होऊन जायची. थंडीच्या दिवसांत फिरत होतो. त्यामुळे प्रत्येक घरात बाजरानो रोटलो (बाजरीची भाकरी) तर असेच. त्याबरोबर सुकी किंवा पातळ भाजी आणि तोंडी लावणं म्हणून वेगवेगळी लोणची. चविष्ट जेवण व्हायचं. त्या साध्या जेवणात मोठा जिव्हाळा होता. जेवण झाल्यावर परत आमचं काम सुरू व्हायचं. ज्या घरात आम्ही थांबायचो त्यांच्या आजूबाजूला असलेल्या घरातून मुली आणि बायका गोळा व्हायच्या. त्या आपलं काम सोबत घेऊन यायच्या. नवीन टाके, नवी रंगसंगती असं बरंच काही बघायला मिळायचं. कधी त्यात भरतकाम केलेल्या राख्या असत, तर कधी अप्रतिम शाली. काही जणी थोड्या पुढारलेल्या होत्या. आपल्या कलेचं मोल त्यांना कळलेलं होतं. पण काही जणी मात्र या सगळ्यापासून थोड्या अनभिज्ञ होत्या. त्यात अनेक तरुणीही होत्या. त्यांनी कधी गावाबाहेर एकट्याने प्रवासही केला नव्हता. घरातला एखादा पुरुष सोबत घेऊनच त्या कापड, दोरे वा त्यांना आवश्यक वस्तू असं काहीबाही घ्यायला मोठ्या बाजारात जायच्या. एरवी घरातले पुरुषच त्यांना हवं ते आणून द्यायचे.

एका दुपारी सुमरासर गावात पोहोचलो. नमुने बघत होतो. भोवती मुली, बायकांचा घोळका होताच. एवढ्यात त्यातल्या एका मुलीने, उमाने मला चटकन विचारलं, ‘‘ही बाहेर उभी असलेली गाडी तुमची आहे ना?’’ मी ‘हो’ म्हणताच तिला खूप कौतुक वाटलं. ती त्यापूर्वी कधीच मोटारीत बसली नव्हती. तिने फक्त बसचा प्रवास केला होता. भूजला परत जाताना मी उमाला गाडीत बसवून लांब फिरवून आणलं. त्या छोट्याशा फेरीनेसुद्धा उमा इतकी आनंदून गेली होती की मी सुखावून गेले. या सगळ्या जणींनी मला भरतकामाचे टाके तर शिकवलेच, पण हातावर भाकरी कशी थापायची तेही शिकवलं. मुंबईत परतले तेव्हा हातावरच्या भाकरी करण्यात मी तरबेज झाले होते.

या प्रवासादरम्यान नाजूक, मण्यांचे दागिने बनवणाऱ्या अनेक स्थानिक कलाकार मुलींशी ओळख झाली. त्यातल्या वनिताबेनशी तर माझी घट्ट मैत्रीच झाली. अतिशय कल्पक, सुबक मणीकाम करणाऱ्या निगर्वी वनिताबेन, त्यांचं काम पहाताना त्यांच्या बोलण्या, वागण्याने, कलाकृती दाखवण्याच्या त्यांच्या उत्साहाने मी स्तिमित झाले. ‘सृजन’सारख्या संस्थांमध्ये ज्या महाग मोलाच्या कलाकृती मी पाहिल्या होत्या त्या वनिताबेननी माझ्या पुढे मांडल्या. त्यातलं वैविध्य थक्क करणारं होतं. रात्री बारा वाजेपर्यंत मी आणि माझा चालक धर्मेश दोघंही अव्याहतपणे मणीकामाचे नाना नमुने बघत होतो. धर्मेश हा होतकरू तरुण ड्रायव्हर मला भूजच्या एका सफरीत भेटला. पुढे आमची इतकी छान ओळख झाली की आता मी येतेय एवढं जरी कळवलं तरी धर्मेश गांधीनगरला मला घ्यायला येतो.

प्रवास म्हटला की फक्त एखाद्या ठिकाणची प्रसिद्ध स्थळं पाहणं, तिथल्या प्रसिद्ध पदार्थांचा आस्वाद घेणं आणि खरेदी करणं एवढंच नसतं, त्यापलीकडे तिथली माणसं, तो प्रदेश, तिथली संस्कृती निरखली तर तो भाग जास्त कळतो आणि भावतोही. त्यामुळे प्रत्येक प्रवासाआधी माझा गृहपाठ अगदी व्यवस्थित असतो. लक्षद्वीपला गेले त्या वेळी तिथल्या टूरची आखणी करताना अनेक यूट्यूबवरचे व्हिडीओ पाहिले होते, पण म्हणावी तितकी कल्पना आली नाही. प्रवासवर्णनंसुद्धा फारशी उपलब्ध नव्हती. मग थेट ‘लक्षद्वीप टूरिझम’ या सरकारी संकेतस्थळावरून माहिती मिळवली. तिथे मिळालेल्या दूरध्वनी क्रमांकावरून संपर्क करून संपूर्ण सहल आखली. बंगारम बेटावर सहा दिवस राहण्याचं निश्चित केलं. आजूबाजूची बेटं बघितली, पण मुक्काम मात्र बंगारमलाच ठेवला. ग्लास बोट राइड, स्नॉरकेलिंग, बनाना बोट राइड यांसारख्या छोट्या समुद्रखेळांची मजा घेतली, पण मनातून स्कूबा डायव्हिंग करायचं होतं. सारंग कुलकर्णींच्या मार्गदर्शनाखाली तारकर्लीच्या सरकारी संस्थेत पद्धतशीर स्कूबा डायव्हिंगचं प्रशिक्षण घेतलं होतं, त्यामुळे डायव्हिंगचा अनुभव होता. लक्षद्वीपला तर स्वच्छ सुंदर समुद्र, प्रवाळांनी भरलेली बेटं. इथे डायव्हिंगची खरी मजा होती. म्हणून उत्साहाने तयार झाले डायव्हिंगचा पोशाख चढवला, ऑक्सिजन सिलेंडर पाठीवर अडकवला, मास्क घातला, आता पाण्यात उडी मारायची, तीही उलटी. त्या वेळी का कोण जाणे पण खूप भीती वाटली. पाण्यात उतरलेच नाही. डायव्हिंग न करताच परतले. दुसऱ्या दिवशी नाश्त्याच्या टेबलवर सरबत हातात घेऊन मी शांतपणे अथांग पसरलेला तो निळा सागर पाहात बसले होते. मनात प्रवाळ पाहता न आल्याचं, डायव्हिंग हुकल्याचं सल होतं. एवढ्यात दूरवरून चालत येणारा कालचा इन्स्ट्रक्टर शमाज दिसला. त्यांच्या हातात डायव्हिंगची सगळी साधनं होती. माझ्याशी इकडच्या तिकडच्या गप्पा मारत त्याने माझ्याही नकळत, माझं मन वळवलं आणि डायव्हिंगसाठी मला तयार केलं. मग काय सराईतपणे पाण्यात उतरले. काल ज्या अफाट अनुभवाला मी मुकले होते तो आज घेता आला. ती सुंदर कोरलस्, त्यांचे ते मनोहारी रंग, सी-अॅनिमोन, भले मोठे जांभळे स्टार फिश, इकडून तिकडे सुळकन जाणारे विविध रंगी, ना ना आकारांचे मासे, सगळं बघत बघत मी मस्त फिरले. पाण्यातून येऊन बोटीवर बसले तेव्हा शमाज माझ्यापेक्षा खूश झाला होता. एक संपन्न करणारा अनुभव गाठीशी आला होता. इथे माझ्या गुणीजनांच्या यादीत आता शमाजचं नाव जोडलं गेलं होतं.

ओडिशाला गेले असताना तिथली प्रसिद्ध स्थळे पाहिली. जगन्नाथाचं दर्शन घेतलं. पण ओढ लागली होती ती तिथल्या कलाकारांना भेटायची. तिथल्या पिपली गावात जाऊन एप्लीक वर्क करणाऱ्या कलाकारांना भेटले. रघूराजपूर या ‘हेरीटेज व्हिलेज’मधील पटचित्र कलाकारांना भेटले. परतताना कटकमध्ये जाऊन फिलिग्री कला पाहता आली. फिलिग्री म्हणजे हाताने तयार केलेले अगदी नाजूक काम असलेलं, जाळीदार चांदीचे दागिने. हे काम मोठं कौशल्याचं असतं. आज फिलिग्री काम करणारे कलाकार हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच उरले आहेत. कटकमध्ये फिरून मी अनेक कलाकारांना भेटले. दागिने कसे घडवले जातात ते पाहिलं. त्यांच्याविषयी, त्यांच्या कलेविषयी बरंच जाणून घेता आलं. याच प्रवासादरम्यान माझी सुमित्रा पहारींशी ओळख झाली. या कलाअभ्यासक आहेत. त्यांचं स्वत:चं यूट्यूब चॅनल आहे. सुमित्रादी भुवनेश्वरला राहतात. त्यांच्या घरी जाऊन मी ओडिशातील कलांविषयी जाणून घेतलं. डोगरा आर्ट, कोटपाड साड्यांचा इतिहास, याबद्दल त्या भरभरून बोलत होत्या, अनेक नमुने दाखवत होत्या. त्यांनी स्वत: फिरून, त्या त्या भागात जाऊन मिळवलेली माहिती, तिथल्या लोकांबरोबर राहून अनुभवलेले क्षण हे सगळं त्यांच्या गोड बंगाली वळणाच्या हिंदीतून ऐकताना छान वाटत होतं. आताही जेव्हा जेव्हा मी त्यांच्याशी संपर्क साधते तेव्हा तेव्हा माझी प्रत्येक वेळी नवनव्या कलेशी ओळख होते.

देशांतर्गत प्रवास करताना जशा विविध गोष्टी अनुभवता आल्या, प्रेमळ माणसं भेटली अगदी तसाच अनुभव देशाबाहेरील प्रवासातही आला. प्रवास मग तो कुठलाही असो देशी किंवा परदेशी त्यांची आखणी स्वत: करायची आणि त्याप्रमाणे फिरायचं हे माझं ठरलेलं असतं. या शिरस्त्याने युरोपला निघाले तेव्हा हॉटेलमध्ये राहण्याचा पर्याय निवडायचा नाही हे आधीच ठरलं होतं. बॅग पॅकरसारखं होस्टेल किंवा मग एअर बीएनबीचा पर्याय निवडायचा हे नक्की केलं होतं. या दरम्यान जर्मनीहून ऑस्ट्रिया असा प्लीक्स बसचा रात्रीचा प्रवास करत मी भल्या पहाटे साल्सबर्गच्या शहराबाहेर असलेल्या स्टॉपवर उतरले. अजून उजाडलंही नव्हतं. कुणाला विचारावं तर रस्त्यावर चिटपाखरूही नाही. जी.पी.एस. तंत्रज्ञान शहरात जाणारी ३ क्रमांकाची बस घ्या असं सुचवत होतं. पण ३ नंबरचा स्टॉप काही दिसेना. एकटीने प्रवास करायचं धाडस तर केलंय ते अंगाशी येऊ नये म्हणजे झालं असा नाही म्हणता एक विचार चटकन मनाला शिवून गेलाच. आजूबाजूचं वातावरण कमालीचं सुंदर होतं. मी चालत राहिले. रस्ता नक्की सापडेल हा विश्वास होता. एका वळणावर स्टॉप दिसला. काही वेळात ट्रामही आली. मिराबेल प्लाट्सला उतरून युथ होस्टेल गाठलं. साल्सबर्गमधील दोन दिवस मजेत गेले. अॅम्स्टरडॅमला गेले तेव्हा आधी तिथली ट्राम गाठली. एक रूट पकडून पहिल्या ते शेवटच्या स्टॉपपर्यंत प्रवास केला. वाटेत लागणारे थांबे समजून घेत गूगलवर माहिती मिळवत परत जाताना कुठे कुठे उतरायचं ते नक्की केलं. हीच युक्ती बस आणि ट्रेनच्या बाबतीत वापरली. सगळ्या वाहनांनी फिरता येईल असा सर्वसमावेशक पास होस्टेलने भेट म्हणून दिला होताच. त्याच्या मदतीने आधी शहर फिरून घेतलं. मग निवांत एकेका ठिकाणी उतरून पायी हिंडले. यात अॅन फ्रँकच्या घराकडे जाताना रस्त्यावर अचानक एक क्विलटिंग(quilting) स्टुडिओ दिसला. फार निगुतीने आणि शांतपणे सगळं काम चाललं होतं. कापडाचा एक एक तुकडा कापून तो काळजीपूर्वक जोडला जात होता, त्यातून सुंदर कलाकृती तयार होत होत्या. डच बांधणीच्या, कॅनॉललगत असलेल्या त्या जुन्या घरवजा स्टुडिओत शिरून क्विलटिंगचं काम पाहताना आपल्या इथल्या गोधडी कामाशी त्यांचं असलेलं नातं जाणवत होतं. तयार गोधड्या, टेबल रनर, स्कार्फ, मोजे, पडदे, बेड कव्हर्स असं सगळं रंगांचा मेळ साधत नीट नेटकेपणाने मांडलेलं. इथून हलूच नयेसं वाटतं होतं. त्या घरालगत फुललेली फुलं, समोर वाहणारा कॅनॉल, त्यातून फिरणाऱ्या नावा, त्यावरील कमानी, दोन्ही काठावरलं सुबक लाकडी नक्षीकाम हे जितकं डोळ्यांना सुखावणारं होतं तितकंच या स्टुडिओतलं कापडाच्या तुकड्यांवरलं नक्षीदार जोडकामंही सुबक होतं. निसर्ग त्याच्या सौंदर्याने माणसाच्या चित्तवृत्ती फुलवतो. त्याला अधिक कसबी, कुशल बनवतो आणि मग त्याच्या हातून सुरेख कलाविष्कार घडवतो याचा प्रत्यय येत होता. ‘जागतिक पर्यटन दिना’निमित्ताने (२७ सप्टेंबर) हे इथे मांडलं इतकंच.

मात्र ही सगळी भटकंती करत असताना एक गोष्ट लक्षात आली ती ही की, प्रवास आपल्याला गुंतवून ठेवतो. नवी ऊर्जा देतो. ही ऊर्जा पुढच्या प्रवासाची प्रेरणा ठरते आणि मग हे असं चक्र अव्याहत सुरूच राहातं…

– मैत्रेयी केळकर

mythreye.kjkelkar@gmail.com