अभिलाषा बेलुरे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘थरथरली जरी ज्योत तरी

बनलास तू कधी तेल, कधी वात

सलते काही, फुलते काही

असू दे हसू, आला जरी झंझावात’

हो! सहजीवन असंच असतं.

लग्नाच्या एकविसाव्या वर्षी खऱ्या अर्थानं प्रेम तरुण झालेलं असतं. सहवासानं उमललेलं, फुललेलं, गंधित झालेलं असतं. लग्नानंतर शिक्षण घेऊन संसाराचा पाया स्वकर्तृत्वानं मजबूत करणं आणि अनेकांना आपलं कौतुक वाटेल असं काम करून दाखवणं क्वचितच घडतं. माझ्या बाबतीत हे घडलं याचा मला सार्थ अभिमान आहे.

    उंबरठय़ावरचं माप ओलांडून मी मनोजरावांच्या साथीनं नवख्या घरात प्रवेश केला. नव्या सांसारिक जगात आशा-अपेक्षांची, समर्पणाची, त्यागाची स्वप्नं आनंदानं रुजवली, वाढवली, जपली. सगळं असलं तरी काहीतरी कमी असतंच! सतत काहीतरी करत राहाण्याच्या उमेदीनं गाव सोडून पुण्यनगरीत विद्यार्जन अन् अर्थार्जन दोन्हीच्या शोधात आमचं आगमन झालं. आपल्या परिसरात आपण ‘गावचं राजं’ असतो! पण नव्या ठिकाणी मात्र आपलं अस्तित्व आपल्याला सिद्ध करायचं असतं. तेव्हा खरी परीक्षा असते नवरा-बायकोंमधील प्रेमाची. मी ‘बी.एस्सी.’ करून पुण्यात आले होते, पती, मनोज एका रुग्णालयात ‘रेडिओथेरपी टेक्नॉलॉजी’ विभागात कार्यरत होते. मी अधिक शिकावं ही त्यांचीच इच्छा. ‘असिस्टंट’ म्हणून ते काम करत असलेल्या रुग्णालयातच मी सुरुवात केली. दरम्यान, लेक ओंकार जन्माला आला, सुख सुखावलं!

   बाळ सहा महिन्यांचं असताना मी पुण्यामध्ये ‘सी.टी. स्कॅन टेक्नॉलॉजिस्ट’चा कोर्स पूर्ण केला आणि ‘आनंदपूर ट्रस्ट’मध्ये एक वर्ष आणि PET Scan Technologyमध्ये एक वर्ष काम केलं. त्याच अनुभवाच्या जोरावर पुन्हा जुन्याच रुग्णालयात ‘सिम्युलेटर टेक्नॉलॉजिस्ट’ म्हणून रुजू झाले. दरम्यान रेडिओथेरपीचा अभ्यासक्रम केला आणि रेडिओथेरपी टेक्नॉलॉजिस्ट म्हणून काम करू लागले. नंतर त्याच विभागात मनोज यांची सिनियर रेडिओथेरपी टेक्नॉलॉजिस्ट म्हणून नियुक्ती झाली. आम्ही ‘प्रोफेशनल’ जीवनातही एकत्र काम करू लागलो. आमचा एकत्रित प्रवास पुन्हा एकदा सुरू झाला.

  मनोज यांची मला प्रत्येक गोष्टीत साथ मिळत होती. मी सगळं काही शिकावं, मला ते यावं यासाठीची त्यांची धडपड मला आज मागे वळून बघताना खूप जाणवते. सुरुवातीच्या काळात सकाळी अगदी जेवणाच्या डब्याच्या तयारीपासून ते कार्यालयात आधुनिक आणि सुधारित गोष्टी शिकवणं, अभ्यास घेणं, नोट्स काढणं, कॉम्प्युटराइज्ड टेक्निकल आणि बँकिंग कामं करताना बारकाईनं, काळजीपूर्वक प्रत्येक गोष्ट पार कशी पाडावी याचं मार्गदर्शन करणं हे सारं ते करत होते. खूप काही शिकवलं, मनोधैर्य वाढवलं, आत्मविश्वास मजबूत केला.

 माझ्यामागे ठामपणे उभ्या असलेल्या नवऱ्यातला कणखर बापही प्रसंगी मला दिसत राहिला. एकमेकांच्या साथीनं आणि अनुभवातून अनेक गोष्टी आम्ही शिकत होतो. मी करत असलेल्या प्रत्येक गोष्टीला साथ होती त्यांच्या खंबीर अन् मजबूत हातांची. मनोज गुरुतुल्य पाठबळ देत होते. तीच खरी ताकद होती आमच्या संसाराच्या भक्कम पायाची. आज त्याच विभागात ते सिनियर टेक्नॉलॉजिस्ट आणि मी ज्युनियर टेक्नॉलॉजिस्ट म्हणून कार्यरत आहोत आणि आजही सर्वत्र एकत्र, साथीनं प्रगती करत आहोत.

  घर, गाडी, स्थावर मालमत्ता या स्वरूपात सर्वानाच कष्टाचं फळ मिळतं. पण त्याहीपेक्षा एकमेकांची कार्यक्षमता ओळखून एकमेकांना खंबीरपणे दिलेली साथ आणि त्यातून मिळणारा आनंद जास्त महत्त्वाचा असतो. याच साथीतून, एकत्रित विचारातून समाजभान जपणारा ‘महाराष्ट्रीयन लेडीज असोसिएशन’ हा तळागाळातल्या प्रत्येक स्त्रीला स्वावलंबी बनवण्याची महत्त्वाकांक्षा असलेला खूप मोठा ‘मार्केटिंग प्लॅटफॉर्म’ मिळवून देणारा ‘फेसबुक ग्रुप’ तयार झाला. आज हा ग्रुप देशापुरता मर्यादित न राहाता जगात इतरत्रही उत्तुंग भरारी घेत आहे.

 स्वर्गात बांधलेल्या आमच्या जोडीला कर्तृत्वाचा असा बहुमान मिळाला यापेक्षा सुख वेगळं काय हवं!

भाग्यवान या शब्दाचा अर्थ मला मनोज यांच्या सोबत  असण्यानं कळला.

संसाराची सप्तपदी चालताना नकळत शब्द मनात येतात-

‘दररोज सुगंधातून तुला शोधते

आज फुलांची मिठी घेऊन आलास

खरं सांगू तेव्हा, सुगंध मी, अन् फूल तू झालास’ abhilashabelure.ab@gmail.com

मराठीतील सर्व चतुरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Saptapadi abhilasha belure couple marriage wife husband family love ysh
First published on: 01-10-2022 at 00:02 IST