– छाया दातार

‘निर्मला निकेतन’ या प्रथितयश महाविद्यालयाच्या प्राचार्य पदापासून ‘टाटा सामाजिक विज्ञान संस्थे’च्या संचालक पदावर काम करणाऱ्या डॉ. अरमायटी देसाई यांनी शैक्षणिक संस्था या संगमरवरी मनोरे राहता कामा नयेत आणि समाजसेवा हे ग्रामीण भागातही शिकवले जावे यासाठी तुळजापूर येथे १०० एकर ओसाड जमिनीवर ‘ग्रामीण कॅम्पस’ उभा केला. डॉ. अरमायटी देसाई यांचे नुकतेच (२७ सप्टेंबर) निधन झाले. त्यानिमित्ताने त्यांनी स्त्री अभ्यासाला दिलेल्या नव्या परिमाणाविषयी…

वर्तमानपत्रांमध्ये डॉ. अरमायटी देसाई गेल्याचे वृत्त वाचले आणि काहीसे गलबलल्यासारखे झाले. त्या आजारी होत्या आणि कधी तरी जाणार हे कळत होते परंतु त्यांनी केलेले काम आणि त्यानिमित्ताने माझ्या वैयक्तिक आयुष्यावर उमटवलेला सखोल ठसा मला खूप काही देऊन गेला, म्हणून त्यांचे जाणे जरा जास्तच चटका लावणारे होते. त्यांच्या कामाबद्दल आदर व्यक्त करण्यासाठी हा खास लेख.

आजच्या वर्तमानपत्रांमध्ये आमच्या सहकाऱ्यांनी त्यांच्याबद्दल अतिशय मोलाचे मत व्यक्त केले आहे. ‘निर्मला निकेतन’ या मुंबईतील समाजसेवा शिकवणाऱ्या अतिशय प्रथितयश महाविद्यालयाच्या प्राचार्यपदापासून ते ‘टाटा सामाजिक विज्ञान संस्था’(TISS) या जागतिक कीर्तीच्या संस्थेच्या संचालक पदावरचे त्यांचे प्रशासकीय कार्य खूप काही सांगून जातेच पण त्यानंतर त्यांनी ‘विद्यापीठ अनुदान आयोग’ वा University Grant Commission (UGC), म्हणजेच भारतातील सर्व विश्वविद्यालयांच्या संचालनाचे काम बघितले, त्या त्याच्या अध्यक्षपदी नेमल्या गेल्या आणि तेथे त्यांनी आपला अमीट ठसा उमटवला.

त्यांनी प्रत्येक विश्वविद्यालयामध्ये स्त्री अभ्यासाच्या दृष्टिकोनातून स्थान निर्माण करण्यासाठी उत्तेजन दिलेच, पण दर पाच वर्षांनी होणाऱ्या मूल्यांकनासाठी जाणाऱ्या टीममध्ये आवर्जून स्त्री अध्यापकांचा अंतर्भाव करण्यात आला की नाही हेही बघण्यास सांगितले. एवढेच नाही तर कामाच्या ठिकाणी लैंगिक छळासंबंधी ‘तक्रार निवारण समिती’च्या कायद्याचे पालन केले जात आहे की नाही हे बघण्याचा आग्रहही धरला. केवळ शैक्षणिक दर्जासंबंधीचे मूल्यांकन करून थांबणे हे त्यांच्या वैचारिक चौकटीमध्ये बसणारे नव्हते. समाजसेवेची पार्श्वभूमी असल्यामुळे, ज्यांच्यासाठी काम करायचे त्यांच्याबद्दल सहानुभूती असणे महत्त्वाचे आहे असे त्या मानत असत. म्हणूनच ‘टाटा संस्थे’मध्ये असताना त्यांनी दोन नव्या गोष्टींना सुरुवात केली. एक तर विद्यार्थ्यांना वर्षातून एकदा दहा दिवस ग्रामीण भागांत राहून लोकांच्या गरजा आणि परिस्थिती समजून घेण्याची संधी देण्यात आली. दुसरे म्हणजे समाजसेवा हे शहरी भागातील समुदायांपुरते काम न राहता, ग्रामीण भागामधील लोकांमध्येही सामुदायिक व्यवस्थापनाचे काम शिकवले जावे यासाठी ‘ग्रामीण कॅम्पस’ची निर्मिती केली. तुळजापूर येथे १०० एकर ओसाड जमिनीवर हा ‘कॅम्पस’ उभा असून ग्रामीण प्रश्नांच्या अभ्यासावर येथे भर दिला जातो. शैक्षणिक संस्था या संगमरवरी मनोरे राहता कामा नयेत. लोकांचे जगण्यातील अनुभव, त्यांचे महाविद्यालयीन वर्गामध्ये विश्लेषण आणि त्याचा उपयोग करून समुदायाच्या उत्थापनासाठी त्यांना उद्याुक्त करणे हा त्यांना समाजसेवेचा आदर्श वाटत असे. अमेरिकेमध्ये शिकण्यासाठी गेल्या असताना ‘आंतरराष्ट्रीय समाजसेवा विद्यालया’च्या वतीने दिले जाणारे कॅथेरीन केण्डेल यांच्या नावाचे महत्त्वाचे पारितोषिक त्यांना त्यांनी केलेल्या प्रत्यक्ष समाजसेवेबद्दल आणि नंतर समाजसेवा या शैक्षणिक शाखेमध्ये लिंगभाव समानता हा विषय सातत्याने लावून धरल्याबद्दल मिळाले होते. त्या अतिशय दक्ष प्रशासन चालविण्याबद्दल प्रसिद्ध होत्या.‘टाटा संस्थे’मध्ये असताना मी स्वत:ही त्यांच्या या स्वभावाचा अनुभव घेतला आहे. संस्थेच्या परिसरात असलेल्या आपल्या घराकडून स्वत:च्या ऑफिसमध्ये मुख्य इमारतीच्या कॉरीडॉरमधून जाता जाता सहजच विद्यार्थी व शिक्षकांसाठी असलेल्या प्रसाधनगृहात डोकावून त्या तेथील स्वच्छता तपासत असत. वसतिगृहाचे पडदे, त्यांचे रंग आवर्जून बघत असत. एवढेच नाही तर कोणतीही पीडित व्यक्ती त्यांच्या खोलीत जाऊन त्यांच्याकडे तक्रार करू शकत असे. सहकाऱ्यांबरोबर त्यांचे संबंध कमालीचे बरोबरीचे असत.

‘टाटा सामाजिक विज्ञान संस्थे’मध्ये माझा प्रवेश माझ्या काहीशा कार्यकर्ती असण्याच्या पार्श्वभूमीमुळे झाला. आदिवासी संघटनेबरोबर थोडे काम, मग कापड कामगार संघटना, त्यातच आंतरराष्ट्रीय स्त्रीवर्षानंतर सुरू झालेली ‘स्त्रीमुक्ती चळवळ’ आणि नंतर दोन छोटे संशोधन प्रकल्प, एक निपाणी येथील तंबाखू कामगार स्त्रियांची संघटना, आणि दुसरी ‘रोजगार हमी योजने’च्या अंतर्गत स्त्रियांची आर्थिक स्थिती अभ्यासणे. कोणत्याही अध्ययनविषयक दर्जाच्या नोकरीसाठी हा अनुभव फार मोलाचा नव्हता. पण मला १९८०-८१ मध्ये एक शिष्यवृत्ती मिळाली व मी हेग येथील ‘इन्स्टिट्यूट ऑफ सोशल स्टडीज’ येथून १८ महिन्यांचा एम.ए.चा कोर्स करून आल्याने मला शैक्षणिक दर्जाचा टिळा लागला. ‘यूजीसी’ने मान्य केलेले ‘स्त्री अभ्यास केंद्र’ नुकतेच सुरू झाले होते,परंतु त्या केंद्राचे कार्य मुख्यत: संशोधनाचे होते. संपूर्ण एम.ए. शिकविण्याचे उद्दिष्ट नव्हते. हे माझ्या पथ्यावर पडले आणि माझ्या नशिबाने आमच्या संचालक डॉ.अरमायटी देसाई यांनी माझी कार्यकर्त्याची नाडी ओळखून मला अनेक संधी दिल्या. विशेषत: ग्रामीण भागाकडे माझा ओढा लक्षात घेऊन पिण्याच्या पाण्याच्या प्रकल्पामध्ये त्यांनी मला स्थान दिले आणि सात वर्षे तो प्रकल्प चालू होता त्यासाठी सर्वतो प्रकारची मदत केली. जळगाव धुळे या दोन जिल्ह्यांतील २०० गावांना पाणीपुरवठा करण्याचे काम या प्रकल्पामध्ये करण्यात आले होते. मात्र केवळ सरकारी मदतीने नाही तर लोकांच्या सहभागातून, आणि त्यातही मुख्यत: स्त्रियांच्या सहभागातून. डॉ. अरमायटी देसाई यांच्या समाजसेवेच्या दृष्टिकोनातून हा प्रकल्प राबविला जाणार होता. ब्रिटिश सरकारकडून एक अभियंता व एक मानववंश शास्राज्ञ या प्रकल्पासाठी नेमला गेला होता. लोकांच्या सहभागाचा, मन:स्थितीचा अभ्यास करून विशेषत: आरोग्य सेवेतील अधिकारी यांना या सहभागाचे शिक्षण देण्याचा प्रयत्न होता. त्याला बऱ्यापैकी यश मिळाले. विशेषत: सध्या जे पाणीविषयक कार्यक्रम घेतले जात आहेत, जेथे फक्त इंजिनीअरिंगला महत्त्व आहे, तेथे पाणी पोहोचते आहे की नाही. विशेषत: विहिरींना पाणी लागले की नाही याचीही पाहणी अनेकदा होत नाही. नुसतीच आकडेवारी प्रसिद्ध होत असते. मला आठवतेय की हे दोन ब्रिटिश अधिकारी आम्हाला भेटायला येत असत आणि त्यांचे निरीक्षण सांगत. डॉ. देसाई स्वत: त्या बैठकांना बसत असत आणि मलाही प्रश्न विचारत. त्यांचे योग्य ते प्रश्न विचारणे खूप मार्गदर्शक ठरायचे. त्या निमित्ताने मी दर महिन्याला १० ते १५ दिवस या गावांतून रात्रीच्या बैठकांना हजर राहत असे. यामुळे लोकांच्या मानसिकतेबद्दल खूपच शिकायला मिळाले. पुढे मला ’वॉटर वुमन’ असा किताब मिळाला आणि एकूण अशा प्रकारचे प्रकल्प अनेक देशांतून चालले होते, त्यावरील पुस्तकामध्ये नावही आले.

तीच गोष्ट तुळजापूर येथील ‘ग्रामीण कॅम्पस’चा शैक्षणिक प्रकल्प म्हणून विस्तार करण्याचे ठरल्यानंतरची. तिथे इमारत बांधून शैक्षणिक कार्याला चालना देण्याचा निर्णय झाल्यावर पुन्हा एकदा पाच वर्षांसाठी माझी नेमणूक करण्यात आली. जळगाव प्रकल्पासारखी मी १५ दिवस मुंबई व १५ दिवस तुळजापूर अशी फिरती पत्करली पण आनंदाने. तेथेही देसाई मॅडमची मदत महत्त्वाची होती. बचत गटाच्या बैठका, जलसंधारण कार्यक्रमाच्या बैठका यातून ग्रामीण भागातील प्रश्नांचे ज्ञान आणि गांभीर्य अधिकाधिक लक्षात येत होते. जोडीला श्रीपाद अमृत दाभोळकरांचे १० गुंठे शेतीचे प्रयोग, के. आर दाते यांचे पाण्याचे प्रयोग असे अनेक बाह्य चळवळींशी मी संबंध ठेवू शकले आणि जमेल तेवढे प्रयोग आमच्या तुळजापूरच्या जमिनीवर करू शकले. या अनुभवांचा फायदा पुढे ‘फुलब्राइट स्कॉलरशिप’ मिळून अमेरिकेलील पीट्सबर्ग येथील ‘चॅथम महाविद्यालया’मध्ये शिकवण्यासाठी गेल्यावर झाला. किंबहुना जेव्हा ‘चॅथम महाविद्यालया’ने मागणी केली होती की, आम्हाला नेपाळ किंवा भारतातील पर्यावरणीय अनुभव असलेल्या स्त्री प्राध्यापिका हव्या आहेत. तेव्हा देसाईंनी मलाच बायोडेटा द्यायला सांगितले.

परंतु मला सगळ्यात मोठा आनंद तेव्हा झाला जेव्हा डॉ. देसाई ‘यूजीसी’च्या अध्यक्षा झाल्यावर एक मोठा प्रकल्प त्यांनी हाती घेतला तेव्हा. ‘कॉमन वेल्थ’ देशांकरिता उच्च शिक्षणासाठी असलेल्या संस्थांमध्ये, मुख्यत: महाविद्यालयांमध्ये संस्थेच्या कारभारामध्ये स्त्रियांनी भाग घेतला पाहिजे, अशी कल्पना पुढे आली. स्त्री प्राध्यापिकांची कार्यक्षमता वाढवणे आणि मुख्य म्हणजे ‘आम्ही महाविद्यालयाच्या अंतर्गत कारभारामध्ये मोठ्या प्रमाणात भाग घेऊन स्त्री प्राध्यापिकांना अनेक प्रकारचे फायदे मिळवून देऊ शकतो. तसेच विद्यार्थिनींनासुद्धा पुढे येण्यासाठी मदत करू शकतो,’ असा आत्मविश्वास निर्माण करणे. विशेषत: विज्ञानविषयक काम करणाऱ्या प्राध्यापिकांची तक्रार होती की, त्यांचे शोध प्रकल्प पुढे पाठवले जात नाहीत. शिवाय पुष्कळदा कात्री लावली जाते. इतकेच नाही तर लैंगिक अत्याचाराच्या किंवा भेदभावाच्या तक्रारींची दखलदेखील घेतली जात नाही. या सर्वांवर ते खरमरीत उत्तर होते. प्रा. देसाई यांनी ‘यूजीसी’तर्फे हा प्रकल्प सर्व भारतभर सुरू केला. पाच दिवस हे प्रशिक्षण दिले जाई. विश्वविद्यालयाच्या पातळीवर प्रकल्प चालू असे. त्यामुळे त्या विश्वविद्यालयाअंतर्गत महाविद्यालयाच्या प्राचार्यांना त्यांच्या प्राध्यपिकांना या प्रशिक्षणासाठी पाठवावे लागे. उत्तर, पश्चिम, दक्षिण व पूर्व असे चार विभाग केले होते आणि जवळजवळ पाच वर्षे हा प्रकल्प चालू होता. जवळजवळ सात-आठ विश्वविद्यालयांमध्ये मीही प्रशिक्षणे संघटित केली होती. मात्र प्रा. देसाईंचा कालावधी संपल्यावर नंतरच्या अध्यक्षांनी या प्रकल्पाला महत्त्व न दिल्यामुळे तो संपुष्टात आला आहे. स्त्री अभ्यास म्हणजे स्त्रियांसाठी समाजसेवा अशी सोपी व्याख्या करण्याचे प्रयत्न आता होत आहेत. स्त्री-पुरुष असमानतेचे स्त्रियांवर होणारे परिणाम व त्यासाठी काय करण्याची आवश्यकता आहे, स्त्रीवाद म्हणजे कोणती सैद्धांतिक विचारसरणी आहे, याची चर्चा हा स्त्री अभ्यासाचा गाभा हरवलेला आहे.

आज देसाई गेल्या, म्हणजे एका विचारसरणीला खत-पाणी घालणाऱ्या अनुभवी प्रशासक गेल्या. त्यांचा काळ संपला हे प्रामुख्याने जाणवत आहे. एक पारशी बाई अविवाहित राहून तिला समजलेल्या शैक्षणिक अभ्यासक्रमातून समाजाच्या उपेक्षित वर्गाच्या उन्नयनासाठी, पुढे जाण्यासाठी आहे त्या राजकीय चौकटीमध्ये जेवढे करता येईल, ती चौकट अधिक रुंद करण्याचा प्रयत्न करते हे मला खूप महत्त्वाचे वाटते. त्यांना अखेरचा प्रणाम.

chhaya.datar1944@gmail.com