ॲड. रंजना पगार, गवांदे
आदिवासीबहुल भागांत आजही स्त्री-पुरुषांना डाकीण, चेटकीण ठरवून त्यांना अघोरी शिक्षा केल्या जातात. खरं तर जादूटोणाविरोधी कायद्यानुसार यासाठी सात वर्षांपर्यंतच्या शिक्षेची तरतूद केली आहे, तरीही अशा घटना समाजात घडतच आहेत. प्रकाशच्या आजोबांना चेटक्या तर आजीला चेटकीण ठरवलं गेलं. तेव्हापासून संपूर्ण कुटुंब याच समस्येच्या अनुत्तरित प्रश्नाशी झगडते आहे. म्हणूनच कायद्यासोबत गरज आहे ती व्यापक समाजप्रबोधनाची.
भारतातील कित्येक राज्यांमध्ये अनेक स्त्रियांना डायन, डाकीण, चेटकीण, चेटक्या, भुताळी ठरवून छळलं जातं, मारलंही जातं. महाराष्ट्रात ठाणे, गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर, धुळे, नाशिक, नंदुरबार येथील आदिवासीबहुल परिसरात डाकीण वा चेटकिणीचा प्रश्न सर्वाधिक छळतो आहे. या भागात यासाठी डाकीण हा शब्द रूढ आहे.
गावात कुणी सतत आजारी पडल्यास, अनपेक्षित मृत्यू ओढवल्यास, प्राण्यांचा अकाली मृत्यू झाल्यास, विविध रोगांच्या साथी येऊ लागल्या की गावात कुणी डाकीण किंवा चेटक्या आहे का यांचा शोध घेतला जातो. अनेकदा तर डाकीण शोधून काढण्यामागे छुपे हेतू असतात. मालमत्ता बळकावणं, भाऊबंदकी, कौटुंबिक वाद, राजकीय वैमनस्य, एखाद्या स्त्रीने शरीरसंबंधास नकार देणं, तथाकथित डाकीण स्त्रीच्या कुटुंबाची भरभराट ही त्यामागची काही कारणं. पंचक्रोशीतील भगताकडून एखाद्या व्यक्तीच्या चेटकीण-चेटक्या असण्यावर शिक्कामोर्तब झाल्यावर त्या गावाची जातपंचायत बसते. त्यात चर्चा होऊन संबंधित चेटकीण-चेटक्याला विविध शिक्षा ठोठावण्यात येतात. त्यात त्यांना बहिष्कृत करणं, गावाबाहेर हकलून लावणं, अंगावर चटके देणं, चप्पल तोंडात कोंबणं, मूत्र पाजणं, विष्ठा खाऊ घालणं, नग्न धिंड काढणं आणि शेवटचे टोक म्हणजे जीव घेणं, अशा अघोरी शिक्षांचाही समावेश असतो.
एखाद्या व्यक्तीला डाकीण ठरवल्यानंतर त्याचा सर्वात मोठा परिणाम होतो त्याच्या कुटुंबीयांवर. अशा स्त्री-पुरुषांच्या कुटुंबातील मुला-मुलींशी लग्न करायला कुणीही तयार होत नाही. अनेकदा तर संपूर्ण कुटुंबालाच वाळीत टाकलं जातं. त्यामुळे अनेकदा नवी सोयरिक जुळवण्यासाठी आलेले ‘पाहुणे’ कुटुंबात कुणी चेटकीण-चेटक्या तर नाही ना? याची पहिल्यांदा खातरजमा करतात. ‘डाकीण’ हा प्रश्न स्त्रियांच्या बाबतीत गंभीर आहेच, परंतु काही ठिकाणी पुरुषालाही ‘चेटक्या’ ठरवलं जातं. याचंच एक उदाहरण म्हणजे प्रकाशच्या कुटुंबाची झालेली होरपळ.
एकदा प्रकाशचा मला फोन आला. तो म्हणाला, ‘‘माझ्या आजोबांनी आत्महत्या केली आहे, पण ते आत्महत्येचं प्रकरण वाटत नाही, त्यांचा खून झाला असावा, असा माझा संशय आहे.’’ त्याच्याकडून संपूर्ण घटना समजून घेतली. शे-दोनशे घरं असलेला छोटासा आदिवासी पाडा. या प्रत्येक आदिवासी पाड्यावर, पाड्याचं म्हणून एक छोटंसं मारुतीचं मंदिर असतं. त्याच मंदिरात इतर देवतांचे छोटे मुखवटे ठेवलेले असतात. त्या सर्व देव-देवतांची पूजा करण्यासाठी त्या पाड्यातील आदिवासी व्यक्तीच पुजारी म्हणून काम करत असते. प्रकाशचे आजोबा पुंजाबाबा. हे त्या मंदिरात गावाचे पुजारी म्हणून गेली अनेक वर्षं काम करत होते. प्रकाश आदिवासी कुटुंबात जन्मलेला हुशार, हरहुन्नरी मुलगा. त्या पंचक्रोशीतील तो एकमेव मुलगा असा होता की, जो महाविद्यालयीन शिक्षण घेत होता. शिक्षणासाठी तो तालुक्याच्या गावी राहात होता. प्रकाशची आजी चिमाबाई या अतिशय कष्टाळू, कामसू व स्पष्टवक्त्या होत्या. प्रकाशचे आईवडीलही त्यांच्या मालकीच्या शेतजमिनीत कष्ट करून व काम नसेल त्या काळात मजुरी करून उपजीविका करत होते.
सर्व काही सुरळीत सुरू असताना चिमाबाईंचे बैल शेजारच्यांच्या शेतात जाऊन त्यांनी पिकाचे काही नुकसान केल्याचं निमित्त घडलं आणि चिमाबाईंचे शेजारच्या मनसूच्या कुटुंबाशी वाद झाले. त्यावरून शेजाऱ्यांनी ती घरी एकटी असताना तिला मारहाण केली. प्रकाशचे आई-वडील त्या काळात मजुरी करण्यासाठी बाहेरगावी गेले होते. पुंजाबाबांनी घरी आल्यावर चिमाबाईंना मारहाण केल्याचे पाहिले. ‘‘ती घरी एकटी असताना मारहाण का केली?’’, असा जाब त्यांनी शेजाऱ्यांना विचारला असता शेजारी खूप संतापले परंतु त्यांनी त्यावेळी पुंजाबाबांशी फारसा वाद घातला नाही. पण त्यानंतर शेजारच्यांच्या कुरापती सुरू झाल्या. चिमाबाईंना त्रास द्यायची संधी ते सोडत नव्हते.
एक दिवस शेजारच्या मनसूचा बैल रानातच मरून पडला. मनसूने गावात अफवा पसरवली की, चिमाबाईंनी चेटूक केलं त्यामुळे माझा बैल मेला. संपूर्ण गावात कुजबुज सुरू झाली. चिमाबाईंकडे सर्वजण संशयाने पाहू लागले. पुंजाबाबांचा बराच वेळ मारुती मंदिरात जात होता. चिमाबाई एकट्या पडल्या होत्या. तरीही त्या खंबीरपणे काम करत सर्व निभावून नेत होत्या. या घटनेनंतर मनसूच्या घरी शेजारच्या गावच्या भगतांची वर्दळ वाढली. भगतांमार्फत मनसूला चिमाबाई चेटकीण असल्याचं शिक्कामोर्तब करून घ्यायचं होतं. त्यात तो काही अंशी यशस्वीही झाला होता. सून आणि मुलगा मजुरीसाठी बाहेर आहेत. नातू बाहेरगावी शिक्षण घेतो. त्यांना काळजी वाटायला नको म्हणून पुंजाबाबांनी त्यांना काही कळवलेच नाही. या सर्व प्रकरणात सुमारे एक महिन्यापेक्षा जास्त काळ गेला.
एक दिवस सकाळी नेहमीप्रमाणे पुंजाबाबा मारुतीच्या मंदिरात पूजेसाठी गेले होते. तिथं मारुतीची मोठी मूर्ती सोडता इतर एकही देव जागेवर नव्हते. सर्व देवांचे मुखवटे गायब होते. पुंजाबाबांनी गावात जाऊन ही बातमी लोकांना सांगितली. लोक मुळातच चिमाबाईंवर संशय घेत होते. आता देव गायब झालेत म्हटल्यावर गावकऱ्यांनी शेजारच्या गावातील भगताला गावात बोलावून आणलं. त्या भगताने सांगितलं, ‘‘देव पुंजाबाबांनीच चोरले आहेत. पुंजाबाबा चेटक्या आहे. त्याची बायको चिमाबाईसुद्धा चेटकीण आहे. चेटूक विद्योत अडथळा येत होता, म्हणूनच त्यांनी देव गायब केले आहेत.’’ झालं. संपूर्ण गाव पुंजाबाबांवर उलटला. त्यांनी बाबांचं देवाची पूजा-अर्चा करणं बंद केलं. संपूर्ण गावाने पुंजाबाबा व चिमाबाई यांना बहिष्कृत केलं. दोन वेळा रात्रीच्या वेळी त्यांच्यावर जीवघेणे हल्ले झाले. ही चर्चा हळूहळू पंचक्रोशीत पसरली. पुंजाबाबांच्या सून, मुलगा आणि नातवालाही समजली. ते तिघेही गावी परतले. त्यांनी गावकऱ्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. परंतु गावकरी ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हते.
पुंजाबाबा व चिमाबाईंना गावात वावरणं तर सोडाच, पण वस्तीवर राहाणंही मुश्कील झालं होतं. एक दिवस गावकऱ्यांनी त्यांना गाव सोडणं भाग पाडलं. ते दोघेही चिमाबाईंच्या भावाच्या गावी त्यांच्या घरी राहायला गेले. तिथंही आठ-चार दिवस बरे गेले. परंतु भावाच्या गावातील लोकांपर्यंतही पुंजा व चिमाबाई ‘चेटके’ असल्याची चर्चा पोहोचली. तिथले लोकही संशयाने पाहायला लागले. चिमाबाई तशी निर्भय व धाडसी होती. ती भावाच्या घरीही काम-धंदा करत आलेल्या संकटाला सामोरी जात होती. पुंजाबाबा मात्र पूर्णपणे खचला होता. सुमारे पंधरा दिवसांचा कालावधी गेला. एक दिवस पुंजाबाबांच्या गावातला एक तरुण भल्या पहाटे शेजारच्या पाड्यावर जाण्यासाठी निघाला. त्याला पुंजाबाबा झाडाला टांगलेले दिसले. पुंजाबाबांच्या घरी निरोप गेला. काही वेळातच घरचे लोक तिथं पोहोचले. पोलीस पाटलाने पोलिसांना खबर दिली. सर्व सोपस्कार पार पडले. पुंजाबाबांचा अंत्यविधीही झाला.
पण पुंजाबाबांनी आत्महत्या केली की त्यांचा खून झाला? हा प्रश्न अनुत्तरित होता. दुसऱ्याच दिवशी प्रकाशने आमच्याशी संपर्क साधला. माझे सहकारी महेश दातरंगे, अशोक गवांदे व मी प्रकाशच्या गावी जाण्यासाठी निघालो. प्रथम आम्ही त्यांच्या तालुक्याच्या गावी जाऊन पोलीस ठाण्यामध्ये पोलीस निरीक्षकांना भेटलो. पुंजाबाबांच्या प्रकरणाबद्दल चर्चा केल्यानंतर प्रकाशच्या गावी गेलो. आम्ही गावात प्रवेश केला त्यावेळी दुपारचे बारा वाजले होते. संपूर्ण पाड्यावर स्मशानशांतता होती. आम्ही गावात प्रवेश करताच कुडाच्या झोपड्यांतून लोक आमच्याकडे पाहात होते. रस्त्यावर कुणी दिसत नव्हतं. बराच वेळ प्रयत्न करूनही दूरध्वनीला तिथं ‘रेंज’ मिळत नव्हती.
शेवटी एका ठिकाणी मिळाली. प्रकाशला फोन केला. प्रकाशच्या घरी गेलो. कुडाच्याच दुपाखी झोपडीच्या छपरावर गवत पसरलेलं, झोपडीसमोर छोटासा ओटा होता. गरिबीचे दशावतार दाखवणारी परिस्थिती पाहून मन पिळवटत होतं. प्रकाशची आजी, आईवडील भेटले. विचारपूस केली. पुंजाबाबांबद्दल बोलणं झालं. घरच्या लोकांच्या मनातही ‘आत्महत्या की खून’ असा प्रश्न होताच. पोलिसांनी आत्महत्येची नोंद करून त्याचं काम सोपं केलं होतं. खुनाच्या दिशेने ते तपास करायला तयार नव्हते. जेवणाची वेळ झाली होती. घरात दु:ख, दारिद्र्य, पण अशाही स्थितीत माणुसकी जपणारं प्रकाशचं कुटुंब.
प्रकाशने आम्हाला शेजारच्या पाड्यावर राहणाऱ्या त्याच्या मावशीच्या घरी नेऊन खूप आग्रहपूर्वक जेवू घातलं, नाचणीची भाकरी नि वांग्याची भाजी! जेवण झाल्यानंतर प्रकाशला सोबत घेऊन आम्ही पुन्हा तालुक्याच्या गावी पोलीस ठाण्यामध्ये गेलो. पोलीस निरीक्षकांशी पुन्हा चर्चा केली. खुनाच्या दिशेनं तपास करावा म्हणून लेखी अर्ज दिला. वरिष्ठ अधिकाऱ्यांशीही फोनवर चर्चा केली आणि आम्ही परत निघालो. आम्ही सतत प्रकाशच्या संपर्कात होतो. प्रकाशमार्फत स्वतंत्र अर्ज दिल्याने निरीक्षकांना तपास करणं भाग होतं. आम्ही त्यांच्याही संपर्कात होतोच. परंतु आता पंचक्रोशीतील पुढाऱ्यांनी ‘तक्रार मागे घे’ असा दबाव प्रकाशवर टाकण्यास सुरुवात केली. प्रकाश आमच्या संपर्कात होता.
आम्ही त्याला बळ देत होतो. घाबरू नको, डगमगू नको, असं सांगत होतो. परंतु गावाने प्रकाशच्या आईवडिलांचा जास्तच छळ सुरू केला. दरम्यान, प्रकाशला महाविद्यालयीन शिक्षण संपवून स्पर्धा परीक्षेसाठी बाहेर जायचं होतं. हळूहळू प्रकाशचे जवळचे नातेवाईकही केस मिटवण्यासाठी त्याच्यावर दडपण आणू लागले. शेवटी आमचा आधार असूनही प्रकाश केस मागे घेण्याच्या निर्णयाप्रत आला. त्याला नातेवाईक, गावकरी, आमदार, पुढारी यांच्या दबावाला तोंड देणं कठीण जाऊ लागलं आणि अखेर त्याने तक्रार मागे घेतली. पुंजाबाबांच्या मरणाचं कारण अनुत्तरितच राहिलं.
एखाद्या व्यक्तीला डाकीण, चेटकीण, चेटक्या ठरवणे यासारख्या गंभीर समस्या ग्रामीण भागांत अधूनमधून डोकं वर काढतच आहेत. हे प्रश्न केवळ आदिवासीबहुल भागांतच नाहीत, तर कमी-अधिक प्रमाणात इतरत्रही मधूनमधून दिसतात. यावर उपाय म्हणून आपल्याकडे अस्तित्वात असलेल्या ‘जादूटोणाविरोधी कायद्या’त स्त्री-पुरुषांना चेटक्या-चेटकीण ठरवणं कायद्याने गुन्हा आहे. यासाठी सात वर्षांपर्यंतच्या शिक्षेची तरतूद केलेली आहे. मात्र कायद्यासोबतच यासाठी व्यापक समाज प्रबोधनाची खूप गरज आहे. प्रबोधन सुरू आहे. परंतु ज्या ठिकाणी एखाद्याला डाकीण ठरवलं जातं तिथं संवाद व संघर्षाची गरज असते. कायदेशीर कारवाईसाठी प्रशासनावर दबाव निर्माण करणं गरजेचं असतं. हे अधिक पटलं, कारण हा लेख लिहीत असतानाच अहिल्यानगर जिल्ह्यातील एका स्त्रीला चेटकीण ठरवल्याचा आणि मला तिथे बोलवण्यासंदर्भात दूरध्वनी आला.