कर्नाटकातील कन्नूर येथील गणपतराव महाराज यांच्या, ‘आत्माभ्यास करण्यास प्रापंचिक कामं आड येत नाहीत की प्रापंचिक कामं करण्यास आत्माभ्यास आड येत नाही!’ या वचनाच्या आनुषंगानं आपण विचार करीत आहोत. आपण पाहिलं की, आंतरिक जागृती ठेवून जगण्याचा जो अभ्यास आहे त्याच्या आड प्रपंच येत नाही की तो आत्माभ्यासही प्रपंचाच्या आड येत नाही. आता सुरुवातीला तर आपण सूक्ष्म असा, वृत्तिपालटाला चालना देणारा अभ्यास वगैरे काही करीत नाही. जमेल तितपत साधना तेवढी करतो. म्हणजे जप वगैरे जे काही सांगितलं गेलंय, ते करतो. तेदेखील तन्मय होऊन, एकरूप होऊन नव्हे, तर एखाद्या कृतीसारखी ती गोष्ट करून टाकण्याकडेच कल असतो. मग ती साधना प्रापंचिक कामांच्या आड कशी येईल? बरं तेवढीही सबब राहू नये म्हणून सर्वच सत्पुरुषांनी मानसिक साधनेवरच अधिक भर दिला आहे. म्हणजे मानसिक जप, मनन, चिंतन, स्मरण आदी. तर, माळ हातात घेऊन बसायचं नाही. मानसिक जप करण्यात काय अडचण आहे? चिंतन, मनन, धारणेचा अभ्यास काय कठीण आहे? प्रपंच करता करता काळजी आपण किती स्वाभाविकपणे करतो! लालसापूर्तीची स्वप्नं किती सहजपणे पाहत असतो आणि ते चिंतन प्रपंचाची कामं पार पाडण्याच्या आड येत नाही! तेव्हा परमार्थ न होण्यासाठी प्रापंचिक जबाबदाऱ्यांची सबब नाकारून महाराज सुलभ अभ्यासाची काही सूत्रं सांगत आहेत. त्यातलं महत्त्वाचं सूत्र आहे, व्यक्तिगत प्रापंचिक परिस्थितीला फाजील महत्त्व देत मन:स्थिती गोंजारत न बसण्याचं! आता एक गोष्ट खरी की सर्व सृष्टी आनंदरूप अशा परमात्म्यानंच साकारल्यानं माझ्यासकट प्रत्येक अंश हा मूलत: पूर्ण आनंदरूपच आहे. त्या पूर्णत्वापासून विलग झाल्याच्या भावनेनं तो अपूर्ण मानत आहे आणि आनंदरूपापासून विलग झाल्यानं दु:खमिश्रित सुखाभासात जगत आहे. ही विलगता कशानं आली? तर ‘मी’पणामुळे! पशू-पक्ष्यांमध्ये माणसासारखा ‘मी’भाव दृढ नसल्याने ते निसर्गक्रमावर जीवित सोपवून जगतात आणि म्हणून माणसाच्या तुलनेत अगदी नगण्य काळजी, चिंता करतात! हा ‘मी’पणा आहे म्हणून ‘माझे’ही निश्चित झाले आहे. मग जे ‘माझे’ आहे ते टिकण्या न टिकण्यावर सुख आणि दु:ख अवलंबून राहत आहे! त्यातूनच ‘माझी’ परिस्थिती माझ्या समस्त मनोव्यापारात चिंतनाचा आणि चिंतेचा अविभाज्य भाग झाली आहे. इथं अभिप्रेत असलेली परिस्थिती ही केवळ आणि केवळ ‘मी’केंद्रित आहे. ती माझ्या आसक्ती, मोह आणि भ्रमातूनही आकारली आहे. मग ती परिस्थिती माझ्या आसक्तीला अनुकूल असते तेव्हा ती ‘सुखा’ची असते आणि आसक्तीला प्रतिकूल असते तेव्हा ‘दु:खा’ची होते. त्या परिस्थितीच्या प्रभावाचं जोखड भिरकावण्यासाठी अन्य सत्पुरुषांप्रमाणेच गणपतराव महाराज सांगतात की, ‘मागे (भूतकाळात) होऊन गेलेल्या गोष्टींची आठवण करू नकोस आणि भविष्यात काय होईल याची कल्पना करू नकोस.’ आता जे घडून गेलं त्याची आठवण ठेवायची नाही म्हणजे काय? खोडरबरनं खोडून टाकल्याप्रमाणे ते मनातून पुसून तर टाकता येत नाही. आपल्या भौतिक विकासातदेखील ज्यांचा हातभार लाभला, ज्यांनी भौतिक जगण्यालाही वळण लावणारे उदात्त संस्कार केले, त्यांचं विस्मरणही योग्य नाहीच. ती कृतघ्नता ठरेल. मग घडून गेलेलं विसरायचं म्हणजे नेमकं काय विसरायचं?