18 September 2019

News Flash

शिव सगळ्यांच्या आवडीचा!

शिव साकारणारा रिशी सक्सेना मालिकेच्या प्रोमोपासूनच लोकप्रिय झाला होता.

सध्या रंजक वळणावर असलेल्या ‘काहे दिया परदेस’ या मालिकेतल्या शिवच्या प्रेमात समस्त तरुणी बुडाल्या आहेत. शिव साकारणारा रिशी सक्सेना मालिकेच्या प्रोमोपासूनच लोकप्रिय झाला होता. आता  मालिका सुरू होऊन दोन महिन्यांनंतर या लोकप्रियतेत कमालीची वाढ झाली आहे.

एखाद्या नव्या मालिकेची चर्चा सुरू होते ती त्याच्या प्रोमोवरून. शीर्षक, प्रोमोतला आशय यावरून मालिकेचा विषय, बाज साधारण लक्षात येतो. मग चर्चा थोडी पुढे सरकते. प्रोमोमध्ये साधारणपणे नायक-नायिकांना दाखवलं जातं. त्यातही ते नवे चेहरे असतील तर या चर्चेला आणखी उधाण येतं. ‘ती जरा लहान वाटते’, ‘तो किती क्यूट आहे’ किंवा ‘याला हिरो म्हणून का घेतलंय’ या आणि अशा अनेक प्रतिक्रिया उमटू लागतात. काही वेळा हे अंदाज बरोबर ठरतात तर काही वेळा चुकीचे. असेच अंदाज बांधले जात होते ते झी मराठीच्या ‘काहे दिया परदेस’ या मालिकेबाबत. शीर्षकावरून मालिकेबाबत उत्सुकता होतीच. शिवाय त्यातल्या चेहऱ्यांनी प्रेक्षकांना विशेष आकर्षित केलं. त्यातही नायक अधिक लोकप्रिय झाला. त्याच्या लोकप्रियतेत दिवसेंदिवस वाढच होते आहे. अमराठी असलेला रिशी सक्सेना मराठी प्रेक्षकांच्या विशेषत: तरुणींच्या गळ्यातील ताईत बनला आहे. त्याच्या चाहतावर्गात अधिकाधिक भर पडताना दिसतेय.

रिशी मूळचा जयपूरचा. तीन-चार वर्षांपूर्वी अभिनयाची कोरी पाटी घेऊन तो मुंबईत आला. नाटकांच्या काही कार्यशाळेत सहभागी झाला आणि पुन्हा जयपूरला निघून गेला. कार्यशाळेत सहभागी झाल्यानंतर जयपूरला गेलेला रिशी आता एका मालिकेचा नायक आहे. पण, तेव्हा मुंबईहून पुन्हा त्याच्या घरी गेल्यानंतर पुन्हा मुंबईत तो आला कसा, मालिकांकडे वळला कसा, त्यातही मराठी मालिका का, असे अनेक प्रश्न मनात डोकावणं अगदी स्वाभाविक आहे. पण हा प्रवास रिशी स्वत:च उलगडतो. ‘तीन-चार वर्षांपूर्वी मी मुंबईत आलो होतो. काही तरी प्रयोग करूया, असा विचार करण्याचं ते वय होतं. त्या वेळी अभिनयाबाबत अजिबातच काही माहीत नव्हतं. एका कार्यशाळेत सहभागी झालो. ती संपल्यानंतर पुन्हा जयपूरला गेलो. तिथे काही छोटी नाटकं, शॉर्टफिल्म केली. त्यानंतर अभिनय क्षेत्रातच करिअर करायचं पक्कं ठरवलं. प्रयोग करून बघण्याचा काळ संपला, आता गांभीर्याने विचार करू या असं ठरवलं. म्हणून पुन्हा दीडेक वर्षांनी मुंबईला आलो. मग खऱ्या अर्थाने या क्षेत्रातल्या प्रवासाला सुरुवात झाली. ‘सावधान इंडिया’, ‘इमोशनल अत्याचार’, ‘ये है मोहबतें’, ‘ये कहाँ आ गये हम’ या कार्यक्रमांमध्ये काही भागांसाठी काम केलं.’

काही हिंदी मालिकांमध्ये काम करूनही रिशी मराठीकडे कसा वळला हे आणखी एक कोडं. हिंदीतल्या चांगल्या ब्रॅण्डच्या कार्यक्रमांमध्ये काम केल्यानंतर इतर प्रादेशिक मालिकांमध्ये काम करणं तसं कलाकाराला सर्वदृष्टय़ा कठीण वाटतं. पण, रिशीच्या बाबतीत गोष्ट थोडी वेगळी आहे. मराठी मालिकेत काम करण्याचा रिशीचा प्रसंग तो सांगतो, ‘याच क्षेत्रात माझा एक मित्रही काम करतो. पण, मधल्या काही काळात आमचा एकमेकांशी संपर्क तुटला होता. हिंदी मालिकांमध्ये काम केल्यानंतर लगेचच कोणतंही काम माझ्याकडे नव्हतं. त्यामुळे त्या दरम्यान काही प्रोजेक्ट असतील तर मी करू शकत होतो. म्हणून मी त्या मित्राला फोन केला आणि त्याला कामाबद्दल विचारलं. त्याला बऱ्याच महिन्यांनी संपर्क साधूनही त्याने लगेच ‘काहे दिया परदेस’च्या ऑडिशनबद्दल सुचवलं. एका मराठी मालिकेत हिंदी व्यक्तिरेखा साकारणारा अभिनेता हवा असल्याचंही त्याने सांगितलं. त्यासाठी मी ऑडिशन दिली. अगदी शेवटच्या दिवशी मी ऑडिशन दिली आणि माझी निवड झाली.’ अशा प्रकारे रिशी शिव साकारू लागला.

‘गोरी हो या गौरी.. है तो शिव की नवरी’ आणि ‘दुधी नई गं.’ प्रोमोमधली ही त्याची दोन वाक्यं अतिशय लोकप्रिय झाली होती. मालिका सुरू होण्यापूर्वीच्या प्रोमोमधली ही वाक्यं असली तरी ती आजही तितकीच लोकप्रिय आहेत. निरागसपणे ‘गोरी हो या गौरी’ असं म्हणणं किंवा ‘दुधी नई गं’मधलं ‘नई’ हे उच्चारणं तरुणींना जास्त आवडायचं. एकूणच शिव या व्यक्तिरेखेच्या प्रेमात पडणाऱ्या तरुणी वाढताहेत. मालिकाही आता वेग घेऊ लागली आहे. त्यामुळे पुढे काय होणार ही उत्सुकता आहेच. रिशीलाही प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचं तो सांगतो. मराठी प्रेक्षकांच्या स्वीकारण्याच्या वृत्तीचं त्याला खूप कौतुक वाटतं. ‘मी अमराठी असूनही मला एका मराठी मालिकेत नायकाच्या भूमिकेत मराठी प्रेक्षकांनी स्वीकारलं याचा मला आनंद वाटतो. प्रेक्षक मला स्वीकारतील की नाही याबात मी जरा साशंक होतो. पण माझी ती काळजी मालिका सुरू झाल्यावर लगेचच मिटली. प्रेक्षकांनी मालिकेतल्या शिव या व्यक्तिरेखेसह ती साकारणाऱ्या मलाही स्वीकारलंय’, असं तो सांगतो.

हिंदी मालिकेत एखाद्या प्रादेशिक कलाकाराने काम करणं आणि एखाद्या विशिष्ट प्रादेशिक मालिकेत अन्य प्रादेशिक कलाकार काम करणं या दोन्हींमध्ये खूप तफावत आहे. हिंदी राष्ट्रभाषा असल्यामुळे त्याबाबत प्रत्येकाला किमान माहिती असते. कलाकाराला तर ती असावीच लागते. म्हणून प्रादेशिक कलाकाराला हिंदी मालिकेत काम करणं तुलनेनं थोडं सोपं जातं, पण एका प्रादेशिक कलाकाराला दुसऱ्या प्रादेशिक मालिकेत काम करणं तसं थोडं अवघड असतं. भाषेचा तर मुद्दा असतोच, पण आजूबाजूचा परिसर, राहणीमान, काम करण्याची पद्धत या सगळ्यात बदल होत असतो. रिशीच्या बाबतीत थोडं वेगळ्या पद्धतीने गोष्टी घडत गेल्या. रिशीला मालिकेत हिंदी व्यक्तिरेखाच साकारायची असल्यामुळे मराठी भाषेसंदर्भात फारशी अडचण आली नाही. ‘मराठी कलाकारांसोबत काम करण्याचा न्यूनगंड माझ्या मनात कधीच नव्हता. पण मला या सगळ्यांमध्ये जमून घेता येईल ना, मराठमोळ्या वातावरणात मला जुळवता येईल की नाही, याबाबत थोडा न्यूनगंड होता. पण ते थोडा वेळच मनात राहिलं. माझ्या सहकलाकारांनी मला खूप सांभाळून घेतलं,’ रिशी सांगतो. मोहन जोशी, शुभांगी जोशी, शुभांगी गोखले अशा अनुभवी कलाकारांसोबत काम करण्याचा अनुभवही बरंच काही शिकवणारा असल्याचं रिशी सांगतो. ‘मोहन जोशी यांचे सिनेमे मी लहानपणापासून बघत आलोय. मोहन जोशींना बघितलं की मला ‘गंगाजल’ हा सिनेमा आठवतो. मालिकेत नायिकेच्या वडिलांची म्हणजे माझ्या सासऱ्यांची भूमिका मोहन जोशी करणार आहेत असं सांगितल्यावर तर मला काय करावं काही सुचेनाच. ज्या कलाकाराला सिनेमांमधून बघितलं, त्यांच्यासोबत आता मी मेकअप रूम शेअर करतोय हेच खूप मस्त आहे. माझ्या सहकलाकारांसोबत काम करणं म्हणजे शिकण्याची प्रक्रिया आहे,’ रिशी स्पष्ट करतो. मालिका सुरू होण्यापूर्वी मालिकेची नायिका सायली संजीव हिच्यासोबत रिशीचा एक वर्कशॉप घेण्यात आला होता. त्या दोघांमधली मैत्री वाढावी, टय़ुनिंग जमावं यासाठी हा वर्कशॉप होता. याचा फायदा झाल्याचं रिशी सांगतो.

मुंबईत येऊन काम करण्याचं अनेकांचं स्वप्न असतं. ते पूर्ण करण्यासाठी मुंबई तुम्हाला मदतही करते आणि बरंच काही शिकवतेही. रिशी मुंबईबद्दल नेमकं हेच मांडतो, ‘मुंबई बरंच काही शिकवते. जबाबदारीची जाणीवही करून देते. हे अनुभव जगण्यासाठी अतिशय महत्त्वाचे असतात. प्रत्येकाने थोडय़ा काळासाठी का होईना मुंबईत राहावं. तुमच्या व्यक्तिमत्त्वात त्यामुळे अनेक बदल होतात. मी काही वेळ मुंबईत राहिलो नसतो तर कदाचित मला माझ्या करिअरमध्ये नेमकं काय करावं हे कळलं नसतं. इथल्या लोकांची स्वीकारण्याची वृत्ती मला आवडली. मुंबईबाहेरून आलेल्या लोकांनाही मुंबई हसत स्वत:मध्ये सामावून घेते.’ वाणिज्य शाखेतून पदवी घेऊन सीएसच्या दुसऱ्या टप्प्यांपर्यंत रिशी पोहोचला आहे. अभिनयासोबतच त्याला क्रिकेटचं प्रचंड वेड आहे. वयाच्या बाराव्या वर्षांपासून तो क्रिकेट खेळतोय. दरवर्षी बावीस वर्षांखालील क्रिकेटपटूंसाठी संपूर्ण भारतात नॅशनल टुर्नामेंट होतात. या स्पर्धेसाठी राजस्थानच्या टीममधून रिशी खेळला आहे. इतर अनेक कलाकारांप्रमाणेच रिशीचंही हिंदी सिनेमात काम करण्याचं स्वप्न आहे. वेगवेगळ्या भूमिका करण्याचीही त्याची इच्छा आहे.

मालिकेतल्या नायकांचा चाहतावर्ग अफाट असतो. यात हिंदी मालिका सगळ्यात पुढे असतात. हा ट्रेंड आता मराठीकडे झुकतोय. मराठी मालिकांचा हिरोही आता कुठे कमी पडत नाही. सध्या मालिकांमध्ये अनेक नवे चेहरे दिसताहेत. काहींना प्रेक्षकपसंती मिळते तर काहींना नाही. या नव्या चेहऱ्यांचा प्रेक्षक स्वीकार मात्र करताहेत. रिशी सक्सेना हा तर नवा आणि मराठी मालिकेतला अमराठी चेहरा. तरी प्रेक्षकांनी त्याला स्वीकारून पसंती दर्शवली. शांत, समजूतदार, निरागस, स्पष्टवक्ता, धीट असा शिव प्रेक्षकांना हवाहवासा वाटू लागलाय!
चैताली जोशी
response.lokprabha@expressindia.com
@chaijoshi11

First Published on June 10, 2016 1:22 am

Web Title: shiv from kahe diya pardes